अमृतसर रेल्वे अपघात : रावणाची भूमिका साकारणाऱ्या नटाचा मृत्यू

रावणाची भूमिका साकारणारा अभिनेता दलबीर सिंग
फोटो कॅप्शन, रावणाची भूमिका साकारणारा अभिनेता दलबीर सिंग
    • Author, सरबजीत धालिवाल
    • Role, बीबीसी पंजाबी प्रतिनिधी, अमृतसरहून

अवघ्या काही मिनिटांत दलबीर सिंग हे दोनवेळा मृत्युमुखी पडले - एकदा रावण म्हणून स्टेजवर आणि दुसऱ्यांदा स्वतः रुळावर.

अमृतसरच्या धोबीघाट मैदानावर सुरू असलेल्या रामलीलेत रावणाचा वध झाला आणि मग ठरल्याप्रमाणे रावणदहन सुरू झालं. स्टेजवरून खाली उतरून रावणाचं पात्र साकारणारे दलबीर सिंग स्टेजपासून दूर गेले आणि रेल्वे रुळाजवळ उभे राहून रावणदहनाची आतषबाजी पाहू लागले. तेवढ्यात एक ट्रेन आली आणि त्यांना चिरडून निघून गेली.

शुक्रवारी रात्री झालेल्या या रेल्वे अपघातात 62 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी एक होते दलबीर सिंग.

अपघातानंतर दलबीर बेपत्ता झाले होते. त्यांना काय झालं, हे त्यांच्या कुटुंबीयांना माहीत नव्हतं. त्यांचा शोध घेत दलबीर यांचे भाऊ बलबीर सकाळी घटनास्थळी पोहोचले.

बलबीर यांनी बीबीसी पंजाबीला सांगितलं की मोबाईल फोनच्या टॉर्चचा वापर करून रेल्वे ट्रॅक आणि आसपासच्या झाडाझुडपांमध्ये त्यांना ते शोधू लागले. बलबीर यांच्याप्रमाणेच अनेक लोक आपआपल्या नातेवाईकांना शोधत होते.

बलबीर सिंग यांनी सांगितलं की त्यांच्या भावाला पतंग बनवण्याची आणि अभिनयाची खूप आवड होती, म्हणूनच ते रामलीलेमध्ये भाग घ्यायचे. त्यांनी सांगितलं की दलबीर सिंह दरवर्षी रामलीलामध्ये रामाचं पात्र साकारायचे. पण यावेळी त्यांच्या मित्रांनी त्यांना आग्रह केल्यामुळे त्यांनी रावण साकारला.

आपल्या भावाचा फोटो दाखवताना बलबीर
फोटो कॅप्शन, आपल्या भावाचा फोटो दाखवताना बलबीर सिंग

व्यासपीठावर भूमिका साकारून दलबीर आपलं धनुष्य उचलून गर्दीत मिसळले आणि तिथून ते रावण दहन पाहू लागले. व्यासपीठ आणि रेल्वे ट्रॅकमध्ये 25 मीटरचं अंतर आहे.

मंजित सिंग

दलबीर यांच्याप्रमाणे अनेक लोक ट्रॅकवर उभं राहून रावण दहन पाहू लागले होते. तेवढ्यात भरधाव रेल्वेखाली येऊन अनेक जण चिरडले गेले. अनेक जण बेपत्ता झाले. बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध त्यांचे नातेवाईक घेत आहेत.

एक मध्यमवयीन महिला आपला भाचा आशिषला शोधत होती. ती शहरातल्या अनेक रुग्णालयात जाऊन आली पण तिला आशिष काही सापडला नाही.

या दुर्घटनेतून थोडक्यात बचावलेले मंजित सिंग सांगतात की त्यांचा तर जीव वाचला, पण त्यांचे मामा त्यात गेले. मंजित यांनी ट्रेनला पाहिलं आणि ट्रॅकबाहेर उडी मारली. पण त्यांच्या मामांना तसं करणं जमलं नाही आणि त्यांना रेल्वेची धडक बसली.

एका मित्राच्या मदतीनं मंजीतनं आपल्या मामांना गुरूनानक रुग्णालयात नेलं, पण तिथं त्यांनी आपले प्राण सोडले. मंजित सांगतात की त्यांच्या मामांनीच त्यांना कार्यक्रम पाहण्यासाठी बोलावलं होतं.

रेल्वे ट्रॅकवर अपघातग्रस्तांच्या पडलेल्या चपला

मंजित सांगतात की रामलीला संपली आणि मग फटाक्यांचा आवाज आणि लोकांच्या गोंधळामुळे काही ऐकू येत नव्हतं. "मला ट्रेन येत आहे, अशी शंका वाटली आणि मी पटरीच्या बाजूला उडी मारली. पण अनेकांना हे जमलं नाही आणि त्यांचा जीव गेला. ज्या ठिकाणाला आनंदोत्सवाचं स्वरूप होतं, त्याच ठिकाणी रक्ताचे थारोळे पडले होते, सर्वत्र मृतदेह होते."

पोलीस महासंचालक सुरेश अरोरा यांनी म्हटलं की या घटनेचा तपास केला जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल. या कार्यक्रमासाठी प्रशासनाची परवानगी होती की नाही, याची त्यांच्याकडे माहिती नव्हती.

आतापर्यंत काय घडलं?

  • दशहरा मैदानाला दोन गेट आहेत. एक गेट व्यासपीठामुळं बंद होतं. तर दुसरं गेट लहान होतं आणि रेल्वे ट्रॅकच्या दिशेनं उघडत होतं.
  • ट्रॅकवर बसलेल्या लोकांना रावण दहन पाहता येईल, यासाठी पटरीच्या दिशेनं एक मोठी LED स्क्रीन फिरवूनलावण्यात आली होती, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
  • पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी घटनास्थळी भेट दिली. राज्यभरात एक दिवसाचा तर अमृतसरमध्ये तीन दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे.
  • विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. चार आठवड्यांत या समितीचा अहवाल येणार आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)