'पोलादपूर अपघात यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे' - प्रकाश सावंतदेसाई

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : अपघात चालकाच्या हलगर्जीपणामुळे नाही - प्रकाश सावंतदेसाई
    • Author, मुश्ताक खान
    • Role, बीबीसी मराठीसाठी दापोलीहून

पोलादपूरचा अपघात ड्रायव्हरने मागे बघितल्यामुळे झाला नाहीये, तर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला आहे, असा आरोप अंबेनळी अपघात बचावलेले आणि ३० मित्र गमावलेले प्रकाश सावंतदेसाई यांनी केला आहे.

ज्या ठिकाणी हा अपघात झाला तिथपासून दोन तीन कलोमीटर परिसरात रेलिंग बसवण्यासाठी मोठे मोठे खड्डे खणण्यात आले होते. त्या खड्ड्यातली मातीही तिथेच रस्त्यावर टाकण्यात आली होती. चढ असल्यामुळे आमच्या गाडीचा वेगही कमीच होता.

अचानक एका वळणावर आमच्या गाडीचं टायर त्या मातीवर गेलं, गाडी घसरायला लागली आणि होत्याचं नव्हतं झालं. त्याठिकाणी रेलिंग, कठडा असता किंवा माती नसती तर आज आम्ही सर्वजण सुखरूप असतो, अशा भावना प्रकाश सावंतदेसाई यांनी व्यक्त केली आहे. बीबीसी मराठीशी ते आपल्या दापोलीच्या राहत्या घरी बोलत होते.

प्रशांत भांबीड हा विद्यापीठात लागल्यापासून बस किंवा ट्रकच चालवत असे. प्रशांत भांबीड हा निष्णात चालक आहे, मी त्याच्या शेजारीच बसलो होतो. गाडीवरचा त्याचा ताबा सुटला हे धादांत खोटं आहे. गाडीमध्ये मागे बसलेली मंडळी नक्कीच गाणी म्हणत होती. त्यांची मजा मस्ती सुरू होती पण प्रकाशने मागे पाहिलं म्हणून हा अपघात, हे म्हणणं निव्वळ वेडेपणा आहे, अशा शब्दांत प्रकाश सावंतदेसाई यांनी या गोष्टी खोडून काढल्या.

चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला?

चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला, चालक मागे बघत होता, अशा चर्चा घडवून यंत्रणेला आपली सुटका करून घ्यायची असल्यामुळे हे प्रकार होत असावेत, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे.

"हा अपघात झाला तेव्हा मागे किंवा पुढे रस्त्यावर एकही गाडी नव्हती. त्या ठिकाणी कुणी व्यक्तीही उपस्थित नव्हती. त्यामुळे चालक मागे बघत होता हे कुठून आलं, हे मला कळायला मार्ग नाहीये.

प्रकाश सावंतदेसाई

महाबळेश्वर घाटात धुकं होतं. हलका पाऊसही पडत होता. माती रस्त्यावर बसली होती. गाडी पूर्ण भरली असल्यामुळे वजनही होतं. टायर मातीवर आल्यावर गाडी घसरली. मी क्लिनर सीटवरच असल्यामुळे माझ्याही ते लक्षात आलं आणि जोरात ओरडलो, अरे तिकडे मार पण तोपर्यंत उशीर झालेला होता.

गाडी दोन तीन गटांगळ्या खात खोल दरी फेकली गेली. आयुष्यभराची सल मनात कोरली गेलीये", अशा शब्दांत सावंतदेसाई यांनी आपलं दुःख व्यक्त केलं आहे.

पोलादपूर

फोटो स्रोत, UGC

"पोलादपूर - महाबळेश्वर संपूर्ण रस्ता हा अवघड वळणांचा आणि घाटमाथ्यावर आहे. या भागात बांधकाम विभागाने जास्त लक्ष पुरवणं आवश्यक होतं. ज्या रेलिंगचं काम खरं तर पावसाळ्याआधी व्हायला हवं होतं, ते जुलै महिना म्हणजे पावसाळ्याचे दोन महिने संपत आले तरी पूर्ण झालेलं नाहीये. यंत्रणेने आपलं काम चोखपणे न केल्यामुळे आमची काय हानी झाली आहे हे त्यांना तेवढ्या तीव्रतेने कळणार नाही.

आपल्याकडे अपघातांनंतर किंवा माणसं गेल्यानंतर प्रशासनाला जाग येते. सावित्री नदीवरील अपघाताच्या बाबतीतही हेच दिसून आलं. आता पुन्हा एकदा या अपघातातही तसंच झालं आहे. यंत्रणेनं आपला कारभार सुधारणे खूपच आवश्यक बनलं", अशा शब्दांत प्रकाश सावंतदेसाई यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

सावंतदेसाई यांच्या आरोपांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यांची प्रतिक्रिया आल्यावर बातमीत अपडेट करण्यात येईल.

दरम्यान महाडच्या पोलीस उपनिरीक्षक प्रांजली सोनवणे यांना याबाबत विचारलं असता, त्या म्हणाल्या, "प्रकाश सावंतदेसाई यांनी आम्हाला दिलेल्या जबाबात विद्यापीठाची बस रस्त्यावर खणून ठेवलेल्या मातीमुळे घसरली आहे. आम्ही त्याची नोंद घेतलेली आहे. पुढे त्यासंदर्भात तपास करण्यात येईल."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)