अमृतसर रेल्वे अपघात : 'माझी दीड वर्षांची नात माझ्या मांडीवर होती, जमावानं तिला चिरडलं'

अमृतसर हादसा

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, रविंदर सिंह रॉबिन
    • Role, अमृतसरहून बीबीसी पंजाबीसाठी

"माझी मुलगी अनू दसऱ्यासाठी माहेरी अमृतसरला आली होती. तिची दीड वर्षांची मुलगी नूर माझ्या मांडीवर बसलेली होती."

आम्ही रेल्वे ट्रॅकवर नव्हतो. त्यापासून थोड्या अंतरावर होतो. फटाक्यांचा आवाज आला आणि नूर खूश झाली. तेव्हा हे माहिती नव्हतं की तिचा हा आनंद काही क्षणांत दु:खात बदलून जाईल," अमृतसर येथील रेल्वे अपघाताविषयी सांगताना किमती लाल यांचे डोळे पाणावले होते.

त्यांच्यावर अमृतसरच्या गुरुनानक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

दुर्घटनेनंतर 15 मिनिटांतच त्यांना कळलं होतं की, रेल्वे अपघातात त्यांची मुलगी अनू आणि नात नूर यांचा मृत्यू झाला आहे.

अमृतसरमधल्या जोडा फाटक या ठिकाणी रावण दहनाच्यावेळी रेल्वेखाली सापडून 62 ठार तर 150वर जखमी झाले आहेत.

किमती लाल

फोटो स्रोत, BBC/RAVINDER SINGH ROBIN

फोटो कॅप्शन, किमती लाल

"मी आणि माझी मुलगी रेल्वे ट्रॅकवर नव्हतो. घटना घडली तेव्हा लोकांनी आम्हाला पायदळी तुडवलं," लाल सांगतात.

दरवर्षी दसरा मेळाव्याला येणाऱ्या किमती लाल यांना यावर्षी अशी घटना घडेल असं वाटलं नव्हतं.

याच अपघातात जखमी झालेल्या सपनासुद्धा गुरुनानक हॉस्पिटलमध्ये भरती आहेत. बहिणीसोबत त्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. सपना यांच्या बहिणीचा मृत्यू झाला आहे, तर सपना यांच्या डोक्यास इजा झाली आहे.

'रेल्वे येत आहे हे समजलं नाही'

"रावणदहनाच्या ठिकाणापासून आम्ही दूर होतो. रेल्वे ट्रॅकजवळ एक एलईडी स्क्रीन लावलेली होती आणि आम्ही त्यावर दहनाचा कार्यक्रम बघत होतो.

ट्रॅकवरून 3 रेल्वे गेल्या होत्या, पण ही ट्रेन आली तेव्हा आम्हाला काहीच समजलं नाही," सपना घडलेल्या घटनेबद्दल सांगतात.

सपना

फोटो स्रोत, BBC/RAVINDER SINGH ROBIN

फोटो कॅप्शन, सपना

गुरुनानक हॉस्पिटलमध्ये जवळपास 70 लोकांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

अपघातानंतर हॉस्पिटलमध्ये लोक आपापल्या नातेवाईकांना शोधण्यासाठी आले होते. शवागाराशेजारी गर्दी जमलेली होती.

अपघातात जवळच्या लोकांना गमावलेली माणसं रात्री उशीरापर्यंत तिथं होती. अजूनही तिथं 25 मृतदेह आहेत.

मदतीचा हात

अपघाताग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक लोक पुढे आले. कुणी रक्तदान केलं, तर कुणी रुग्णांसाठी जेवण दिलं.

गंभीर जखमी रुग्णांना आसपासच्या दवाखान्यांमध्ये पाठवण्यात आलं आहे.

गुरुनानक हॉस्पिटलमध्ये आम्हाला हृदयेश भेटले. अपघातात त्यांचे भाऊ जखमी झाले आहेत. त्यांचे भाऊ अनेक वर्षांपासून इथल्या कार्यक्रमाला येत असत.

नशीबानं वाचवलं

पवन यांच्या पत्नीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरुवात आहेत. तेसुद्धा रेल्वे ट्रॅकवर उपस्थित होते.

ते सांगतात, "माझी मुलगी माझ्या खांद्यावर बसलेली होती. पत्नी हातात हात घालून उभी होती. आम्ही रेल्वे ट्रॅकवरच उभे होतो. अपघातापूर्वी एक रेल्वे ट्रॅकवरून गेली आणि ट्रॅकवरील लोकांनी तिला रस्ता दिला. थोड्या वेळानंतर दुसरी रेल्वेही गेली."

"माझी पत्नीही या अपघाताची बळी ठरली असती पण मी हात घट्ट पकडून तिला ओढलं. पडल्यामुळे तिला जखम झाली. मीसुद्धा पडलो आणि डोळ्यांसमोर अंधार निर्माण झाला."

पवन

फोटो स्रोत, BBC/RAVINDER SINGH ROBIN

फोटो कॅप्शन, पवन

कुटुंबीयांचा जीव वाचला म्हणून पवन स्वत: ला नशीबवान समजतात.

"माझ्या पत्नीची जखम भरून निघेल पण या अपघातानं काही लोकांना अशी इजा पोहोचवली आहे जी आयुष्यभर टिकून राहिल," पवन त्यांच्या भावना व्यक्त करतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)