ब्रह्मोस क्षेपणास्त्राशी संबंधित वैज्ञानिकाला कथित हेरगिरीच्या आरोपाखाली अटक

फोटो स्रोत, Nishant Aggrawal/Facebook
- Author, संजय तिवारी
- Role, बीबीसी हिंदीसाठी नागपूरहून
नागपुरात 'डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन' (DRDO)च्या ब्रह्मोस मिसाईल युनिट प्रकल्पात कार्यरत असलेल्या एका तरुण वैज्ञानिकाला सोमवारी हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. निशांत अग्रवाल असं या वैज्ञानिकाचं नाव आहे.
उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रच्या दहशतवादविरोधी पथकानं गुप्तचर विभागाच्या देखरेखीखाली ही कारवाई झाली आहे.
उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाचे महानिरीक्षक असीम अरुण यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना सांगितलं, "मंगळवारपर्यंत कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यानंतर निशांतला लखनऊमध्ये नेलं जाईल."
गोपनीय गोष्टी स्वत:कडे ठेवल्याचा निशांतवर आरोप असल्याचंही ते म्हणाले.
"निशांतनं एखादी गुप्त माहिती बाहेर सांगितली आहे का? त्याचे पैसे मिळाले आहेत का? अशा प्रश्नांचा सध्या आम्ही शोध घेत आहोत."
हनीट्रॅपचं प्रकरण?
उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथक किंवा नागपूर पोलिसांपैकी कुणीही अग्रवाल यांच्यावर केलेल्या आरोपाबाबत खुलासेवार माहिती दिली नाही. सोमवारी संध्याकाळी उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
"गेल्या महिन्यात बीएसएफ जवान अच्युतानंद अग्रवालला अटक करण्यात आली होती. त्या जवानाच्या चौकशीदरम्यान निशांत अग्रवाल यांचं नाव समोर आलं. पाकिस्तानातील ISI साठी हेरगिरी केल्याचा आरोप अग्रवालवर आहे."
मिश्रा यांच्यावर पाकिस्तानातील पत्रकाराने हनी ट्रॅपमध्ये फसवलं असल्याचं उत्तर प्रदेश पोलिसांनी सांगितलं. या व्यक्ती अग्रवाल यांच्याशी दोन वर्ष संपर्कात आहे. उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने एखादी महत्त्वाची माहिती सांगितली का याबाबत पोलिसांनी काहीही सांगितलं नाही.

फोटो स्रोत, Nishant Aggrawal/Facebook
असीम अरुण यांच्या मते हे हनी ट्रॅपचं प्रकरण असू शकतं कारण महिलांच्या नावानं तयार करण्यात आलेल्या फेक फेसबुक अकाउंटवरून निशांत यांच्याशी झालेल्या चॅटचे पुरावे मिळाले आहेत. ही प्रोफाईल्स पाकिस्तानमधून मॅनेज केली जात असल्याचं त्यांच म्हणणं आहे.
या प्रकरणात कानपूर आणि आग्र्याहून आणखी एका व्यक्तीची चौकशी करण्यात आली असून त्या व्यक्तीचा लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे.
आयआयटीतून शिक्षण
निशांत अग्रवाल गेल्या चार वर्षांपासून ब्राह्मोस मिसाईल युनिट या प्रकल्पात काम करत होता. 2017-18 मध्ये त्याला तरुण वैज्ञानिक पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.
फेसबुकवर हा फोटो सुद्धा त्यानं शेअर केला आहे. कुरुक्षेत्र येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं असून IIT रुरकीत रिसर्च इंटर्न म्हणून काम केलं आहे.
निशांत मूळचा उत्तराखंडचा असून त्यांच्या फेसबुकच्या फोटोवरून त्याला उंची कपडे आणि बाईक्सचा छंद असल्याचं दिसून येतं.

फोटो स्रोत, Nishant Aggrawal/Facebook
निशांत नागपुरात उज्ज्वल नगर भागात एका भाड्याच्या घरात राहतो. घरमालक मनोहर काळे यांनी बीबीसीला सांगितलं, "निशांत गेल्या चार वर्षांपासून इथे राहत आहे आणि मार्च महिन्यात त्याचं लग्न झालं आहे. काही अधिकारी आले होते मात्र त्यांच्या या कारवाईबद्दल आम्हाला काहीही माहिती नाही."
दोन इतर अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात
या प्रकरणात कानपूरमधल्या Defence Materials and Stores Research and Development Establishment या संस्थेच्या आणखी दोन वैज्ञानिकांची चौकशी सुरू असून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
निवृत्त IPS अधिकारी आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक प्रबीरकुमार चक्रवर्ती यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचं सांगितलं आहे.
ते म्हणाले, "हेरगिरी केली तर ऑफिशिअल सिक्रेट अॅक्टची कलमं लागू शकतात. देशाविरुद्ध जर काही कारवाया झाल्या असतील तर देशद्रोहाचं प्रकरण होऊ शकतं. सगळं काही पुराव्यांवर अवलंबून असतं. हे पहिलं प्रकरण नाही. या आधी संरक्षण विभागाच्या अनेक अधिकाऱ्यांनी ही चूक केली आहे."
संरक्षण तज्ज्ञ कर्नल (सेवानिवृत्त) अभय पटवर्धन यांनी देखील हे प्रकरण गंभीर असल्याचं सांगितलं आहे. त्यांच्या मते, "या संपूर्ण प्रकरणात एखादा खबरी सामील असल्याची शक्यता आहे. ज्याला गुप्त माहितीचे प्रिंट आऊट दिले गेले असण्याची शक्यता आहे. कारण सरकारी संस्था इंटरनेट आणि सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहे."
ब्राह्मोस कमी अंतराचं सुपरसॉनिक क्रुझ मिसाईल भारत आणि रशियाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे तयार झालं आहे. रडारच्या नजरा चूकवून दहा मीटर उंचीवरून तसंच सर्व भूभांगावरून हे क्षेपणास्त्र सोडलं जाऊ शकतं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








