बुलडाणा ग्राउंड रिपोर्ट : 'जीवापेक्षा आधार लिंक असणं महत्त्वाचं वाटलं का?'

गोविंदा गवई यांच्या पत्नी पंचफुला गवई

फोटो स्रोत, Nitesh Raut

फोटो कॅप्शन, गोविंदा गवई यांच्या पत्नी पंचफुला गवई
    • Author, नितेश राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी बुलडाण्याहून

"रोज मजुरी करून कसेही चार पैसे ते घरी आणायचे. त्यातूनच घर चालायचं. अन्नधान्य जवळच्याच स्वस्त धान्य दुकानातून ते आणायचे. जुलै महिन्यापासून आधार लिंक नसल्यानं त्यानं धान्य देण्यास नकार दिला होता. त्या दिवशी आधार लिंक करायला ते तालुक्याला मोताळ्याला पायी गेले. आधार जोडून घरी आले आणि मरण पावले. असे अचानक धनी सोडून जातील, वाटलं नव्हतं."

बुलडाण्यापासून 30 किलोमीटर अंतरावर जयपूर गावात राहणाऱ्या पंचफुला गवई यांचे हे शब्द. मळकटलेलं लुगडं नेसलेल्या पंचफुला यांच्या चेहऱ्यावर आधारवड गेल्याचं दुःख स्पष्ट दिसत होतं.

त्यांचे पती गोविंदा गवई यांचा आधार लिंक नसल्यामुळे भूकबळी गेल्याची बातमी आल्यावर आम्ही त्यांच्या गावी भेट देण्याचं ठरवलं.

डांबरी रस्ते, कोरडी नदी, मान टाकलेली पिकं

जयपूर गावाकडे जाणारे डांबरी रस्ते विकासाच्या नांदीची सुरुवात याच गावापासून सुरू झाल्याचा गोंधळ पसरवतात. पण गावाशेजारी कोरडी पडलेली विश्वगंगा नदी गावची स्थिती स्पष्ट करते. गावशिवारात दोन्ही बाजूंनी अपुऱ्या पावसामुळे मान टाकलेली सोयाबीन आणि कापसाची पिकं शेतकऱ्यांची चिंता वाढवणारीच होती.

जयपूर गावामध्ये गोविंदा गवई यांचं घर शोधायला आम्हाला फार भटकंती करावी लागली नाही. भूकबळी गेला या चर्चेमुळे ते घर सर्वांच्या नजरेत आलेलं. एका गावकऱ्याने बोट दाखवत तट्ट्यांच्या घराकडे जाणारा मार्ग दाखवला.

गोविंदा गवई यांचं घर

फोटो स्रोत, Nitesh Raut

फोटो कॅप्शन, गोविंदा गवई यांचं घर

नाला पार करून आम्ही कुडाचं बांधकाम केलेल्या एका घराजवळ पोहोचलो. दोन जीव राहू शकतील अशी ती जागा होती. तिथं आमची भेट पंचफुला गवई यांच्याशी झाली.

काही म्हणायच्या आधीच त्या रडायला लागल्या. शेजारीच राहणाऱ्या एक महिलेनं त्यांना पाणी दिलं आणि काही वेळात त्या सावरल्या.

काय झालं त्या दिवशी?

जयपूर या गावापासून तालुक्याचं ठिकाण मोताळा 12 किलोमीटर लांब आहे. दोन-चार वेळा मोलमजुरी करून आधार लिंक करण्यासाठी मोताळा गाव गाठण्यातच पैसे संपून गेले. पण आधार लिंक झालं नाही.

पंचफुला गवई

फोटो स्रोत, Nitesh Raut

फोटो कॅप्शन, पंचफुला गवई

तीन दिवसांपासून गोविंदा गवई यांच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता. अशा परिस्थितीत 21 सप्टेंबरला ते आधार लिंक करायला 12 किलोमीटर पायी चालत गेले.

त्याचवेळी पाऊस थैमान घालत होता. कोपलेले ढग पिच्छा सोडत नव्हते. चिंब भिजलेल्या अवस्थेत आधार लिंक करून उपाशीच घरी परतले आणि जीव सोडला.

पंचफुला सांगतात, "दोन दिवसांपासून आम्ही उपाशी होतो. त्या दुकानदाराने मूठभर धान्य देण्यासही नकार दिला. जीवापेक्षा आधार लिंक असणं त्याला महत्त्वाचं वाटलं का? आमच्या हक्काचं धान्य देण्यासही त्यानं नकार दिला. अजूनही घरात धान्यांचा एक दानाही नाही. आता मलाही उपाशी मेल्याशिवाय पर्याय नाही."

फळीवर ठेवलेली भांडी आणि त्यावर साचलेली धुळ

फोटो स्रोत, Nitesh Raut

फोटो कॅप्शन, फळीवर ठेवलेली भांडी आणि त्यावर साचलेली धुळ

कोण होते गोविंदा गवई?

गोविंदा हे भूमिहीन शेतकरी होते. त्यांच्या पत्नी पंचफुला यांना पायानं चालता येत नाही. त्यामुळे त्या मोलमजुरीही करू शकत नाहीत. वयोमानानं गोविंदाही थकलेच होते. पण काम करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. शेजारी मागून खाण्याइतका स्वाभिमान त्यांनी कधीच गहाण ठेवला नव्हता. पर्यायच नसला तेव्हा शेजारच्या शोभा इंगळे गवई दांपत्याला जेवायला घालायच्या.

गवई हे शोभा इंगळे यांचे चुलत मामा होते. शोभाताई वेळोवेळी त्यांना मदत करायच्या. शोभा म्हणतात, "मी मुंबईत होते, म्हणून मदत करू शकली नाही. किमान 10 किलो धान्य मी त्यांना मिळवून दिलं असतं."

त्यामुळे गवई दांपत्याची गैरसोय झाली. हतबल झालेल्या अवस्थेत भर पावसात गोविंदा आधार लिंक करायला मोताळ्याला गेले.

आधारलिंक न होऊ शकलेले रेशनकार्ड

फोटो स्रोत, Nitesh Raut

फोटो कॅप्शन, आधारलिंक न होऊ शकलेले रेशनकार्ड

पंचफुला सांगतात, "रोजरोज कुणी आपल्याला जेवायला देईल असं नाही. शेजारच्यांना रोज जेवायला मागायची लाज वाटायची. त्यादिवशी मी कुणापुढे हात पसरलेच नाही. भुकेने व्याकुळ होऊन ते आधार लिंकसाठी पायदळ यात्रा करून घरी आले. आणि रात्रीचे अडीच वाजता त्यांचा मृत्यू झाला."

"मृत्यूबाबत कुणालाच माहिती पडलं नाही. घरची परिस्थिती बेताची आहे. रोज मजुरीतही पाच-पन्नास रुपयेच हाती पडायचे. आठ किलो गहू, दोन किलो तांदूळ इतकंच स्वस्त धान्य दुकानात मिळायचं. साखर, तेल दूरच राहिलं. त्यात कशीबशी गुजराण व्हायची."

'आधार लिंक झाल्याशिवाय...'

स्वस्त धान्य दुकानदार राजेंद्र राठी यांनी दोन महिन्यांपूर्वी गोविंदा यांना शेवटचं धान्य दिल्याचं सांगितलं. "जोपर्यंत आधार लिंक होत नाही तोपर्यंत अंत्योदय कार्ड धारकांना धान्य देऊ नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यामार्फत आले होते. ऑफलाईन धान्य पुरवठा केल्यानंतर संबंधित व्यक्तीला धान्य पुरवठा झाल्याचं गणलं जात नाही. त्यामुळं धान्य देण्यास मी नकार दिला. आतापर्यंत त्यांचं आधार लिंक झालेलं नाही. माझ्यासह अनेक दुकानदारांना आधार लिंक झाल्याशिवाय माल देऊ नये, असं SMSद्वारे कळवण्यात आलं होतं," राठी सांगतात.

जयपूर इथलं स्वस्त धान्य दुकान

फोटो स्रोत, Nitesh Raut

फोटो कॅप्शन, जयपूर इथलं स्वस्त धान्य दुकान

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र या प्रकरणावर भाष्य करण्याचं टाळलं. निवासी जिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांच्याशी फोनवर संपर्क झाल्यानंतर सदर प्रकरणात प्रेसनोट प्रसिद्ध केल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जारी करण्यात आलेल्या या प्रेसनोटमध्ये म्हटलं आहे की, "21 सप्टेंबरला गोविंदा यांचा मृत्यू झाला, 22 तारखेला त्यांचा अंत्यसंस्कार झाले. पण त्याच वेळी तक्रार करण्यात आली नाही. नंतर तक्रारीत पंचफुला यांनी स्वस्त धान्य दुकानदार आर. राठी यांनी धान्य न दिल्यामुळे मृत्यू झाला, असं म्हटलं. त्याअनुषंगाने राठी यांनी ऑफलाईन पद्धतीनं धान्य वितरित करणे अपेक्षित होतं. आता जिल्हा प्रशासनानं राठी यांचा स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द केला आहे."

'तिसऱ्या दिवसालाही धान्य नव्हतं...'

गावातील सामाजिक कार्यकर्ते इरफान पठाण सांगतात, "गवई दांपत्य भूमिहीन असल्यामुळे शेजारचे काही लोक त्यांना जेवायला द्यायचे. मृत्यूपूर्वी सतत तीन दिवस उपासमार सहन करत ते आधार लिंक करायला दोन किलोमीटर शेंबा आणि तिथून मोताळ्याला गेले होते. पण आधार लिंक झालं, असं त्यांना सांगण्यात आलं. मात्र स्वस्त धान्य दुकानात ते अपडेट झालं नाही, म्हणून धान्य दुकानदारानं धान्य देण्यास नकार दिला. अत्यंत हलाकीचं जीवन जगत असताना दुर्दैवानं त्यांचं निधन झालं. मृत्यूनंतर तिसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमालाही त्यानं धान्य दिलं नाही. कुठल्याच परिस्थितीत धान्य देऊ शकत नाही, असं त्यानं खडसावलं."

इरफान पठाण

फोटो स्रोत, Nitesh Raut

फोटो कॅप्शन, इरफान पठाण

गवई यांच्या मृत्यूनंतर इरफान पठाण यांनी स्थानिक आमदारांना फोन करून ऑफलाईन धान्य देण्याची मागणी केली. "28 सप्टेंबरनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ऑफलाईन धान्य मिळण्याचा मार्ग सुकर झाला. मात्र तोच आदेश 21 सप्टेंबर पूर्वी आला असता तर गोविंदा यांचा नाहक बळी गेला नसता," असं त्यांनी सांगितलं.

मोहन सुराळकर

फोटो स्रोत, Nitesh Raut

फोटो कॅप्शन, मोहन सुराळकर

गोविंदा यांच्या शेजारी राहणारे मोहन सुराळकर सांगतात, "गोविंदा यांचा मृत्यू झाला त्यादिवशी मृत्युपूर्वी त्यांची सकाळी भेट झाली. ते मला सांगत होते की राशन दुकानदारानं राशन न दिल्यामुळे मी तीन दिवसांपासून उपाशीच आहे. माझ्याकडलेही गहू चक्कीवर दळायला नेले होते. स्वयंपाक अजून तयार झाला नव्हता म्हणून स्वयंपाक झाल्यावर जेवायला या, असं मी त्यांना म्हणालो. त्याच दिवशी उपाशी ते मोताळ्याला गेले. मला घरी परतायला 9 वाजले आणि त्यामुळं त्यांची माझी भेट झाली नाही. नाहीतर आम्ही समाजाचे लोक त्यांची मदत करत होतो."

जयपूर गावातले मोहन सुरळकर सांगतात, "चौकशीसाठी SDO, तहसीलदार, मंडल अधिकारी आणि तलाठी आले होते. त्यावेळी तिथं 15 ते 20 गावकरी जमले होते. रक्ताचे नातेवाईक सोडून इतरांना त्यांनी बाहेर केलं. स्वस्त धान्य दुकांदारावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा सल्ला त्यांनी दिला. तुम्हाला 50 हजाराची प्रशासनाकडून मदत मिळेल, असंही ते म्हणाले. गुन्हा दाखल करायला आम्ही नकार दिला."

पंचफुला गवई

फोटो स्रोत, Nitesh Raut

"त्यानंतर आम्हाला तहसील कार्यालयात बोलावण्यात आलं. नायब तहसीलदार चव्हाण यांच्या कार्यालयात जबाब नोंदवण्यात आले. जबाब घेणारा माणूस हा पुरवठा विभागाचा होता. ज्या पुरवठा विभागाविरोधात आमची तक्रार आहे, तेच लोक जबाब घेत होते. त्यामुळे त्यांनी जबाब योग्य पद्धतीने नोंदवला नाही. त्यांनी त्यांच्या सोयीने तो नोंदविले," असा सुरळकर यांचा आरोप आहे.

त्याच्या काहीच दिवसानंतर गावकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रामार्फत कळले की हा भूकबळी नाही.

पंचफुला यांना जगण्याचा मार्ग शोधूनही सापडत नाहीये. प्रशासनाने जगण्याचा मार्ग दाखवावा किंवा इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)