कलम ३७७ : कोल्हापूर, सांगलीसारख्या लहान शहरांत समलिंगी असणं म्हणजे...

फोटो स्रोत, BBC/Swati Patil Rajgoalkar
- Author, स्वाती पाटील-राजगोळकर
- Role, बीबीसी मराठीसाठी
6 सप्टेंबर 2018 हा दिवस देशातल्या लैंगिक अल्पसंख्याकांसाठीचा स्वातंत्र्य दिवस ठरला. २ सज्ञान व्यक्तींमध्ये, संमतीनं होणारे समलिंगी संबंध हा गुन्हा नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टानं देताच देशभरातल्या समलिंगी व्यक्तींनी आनंद साजरा केला.
LGBTQ यांच्या अस्मितेचं प्रतीक असलेला सप्तरंगी ध्वज मोठ्या शहरांत डौलानं फडकू लागला. हे सगळं सुरू असताना कोल्हापुरातल्या एका छोट्या ऑफीसमध्ये समलिंगींनी त्यांच्या आनंद साजरा केला. फरक इतकाच होता त्यांचा आनंद रस्त्यांवर ओसंडताना दिसला नाही.
देशातल्या मोठ्या शहरांत समलैंगिक व्यक्ती, समलिंगी संबंध यांच्याबद्दल बरीच जागृती झाली असली तरी लहान शहरं आणि ग्रामीण भागांतली परिस्थिती दाखवणारं हे चित्र होतं.
कोल्हापुरात 'मैत्री' नावाची संघटना गेली काही वर्षं LGBTQच्या हक्कांसाठी काम करते. कोणताही गाजावाजा न करता, पण कामात सातत्य ठेवत संस्थेचं काम सुरू आहे. सुप्रीम कोर्टाने कलम ३७७ संदर्भात दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर बीबीसीनं या संस्थेच्या काही सदस्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला.
भाड्याने घर मिळत नाही
24 वर्षांचा दीपक गे आहे. तर मयुरी आळवेकर ट्रांसजेंडर आहेत. कोल्हापुरातल्या एका उपनगरात भाड्यानं घेतलेल्या घरात एकत्र राहातात. दोघांनी हे घर सजवलं आहे आणि नीटनेटकं ठेवलं आहे.
"हे घर शोधताना फार वेळ लागला. लोक आम्हाला घरही भाड्यानं देत नाहीत. आम्ही इथं गेल्या ३ वर्षांपासून राहातो," दीपक सांगत होता.
कायद्याने मान्यता दिली तरी समाजनं स्वीकारायला बराच वेळ लागेल, असं ते सांगतात.
दीपकचं शिक्षण बी. ए.पर्यंत झालं आहे. सोशल मीडियावरून एका व्यक्तीशी त्याचं प्रेम जुळलं. "प्रेम आहे, अगदी खरं प्रेम. समलिंगी व्यक्ती त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली देऊ शकत नाहीत. उघडपणे प्रेम व्यक्त करावं, अशी परिस्थिती इथं तरी नाही," असं तो सांगतो

फोटो स्रोत, BBC/Swati Patil Rajgoalkar
प्रेमाची उघड कबुली देता येत नाही, ही काही दीपकची एकट्याची अडचण नाही. त्यामुळे LGBTQ व्यक्तींमध्ये एकतर्फी प्रेम आणि त्यातून येणार नैराश्य यांचं प्रमाण जास्त आहे, असं दीपक सांगतो. अनेकांच्या प्रेमाला निराशेची कडा असते, असं तो सांगतो.
मयुरी आळवेकर ट्रान्सजेंडर आहेत. "मोठ्या शहरातली परिस्थिती वेगळी आहे. लहान शहरात आणि खेडोपाडी आम्हाला देवाचा माणूस म्हणतात पण दूर लोटतात. समाज आमच्याकडे निकोपपणे न पाहाता विकृती म्हणून पाहतो. पण आज ना उद्या ही परिस्थिती बदलेल," असं त्या आशेनं सांगतात.
समाजात होत असलेल्या भेदभावाबद्दल त्या बोलतात. घर भाड्यानं घेताना अडचणी येतातच इतकंच काय तर बसमध्ये प्रवास करताना कुणी आमच्या शेजारीही बसत नाही, असं त्या सांगतात.
"धुळ्याहून मी एकदा कोल्हापूरला येत होते. बस पकडली आणि एका सीटवर जाऊन बसले. बाजूची सीट रिकामीच होती. पण प्रवासभर कुणीही माझ्या बाजूच्या सीटवर बसलं नाही. या प्रकाराने मनात कलवाकालव झाली. अजूनही हा प्रसंग आठवला तर नकोसं होतं," असं त्या सांगतात.
मयुरी आणि दीपक या दोघांनी त्यांचं स्वतःचं घर सोडलं आहे.
ज्या घरात जन्म घेतला, तिथंही परत जाता येत नाही. घरच्यांना दुरून पाहावं लागतं. घर सोडाच ज्या गल्लीत लहानाचे मोठे झालो तिथंही आम्ही जाऊ शकत नाही. मयुरी त्यांच्या मनातली भावना बोलून दाखवतात.
"आमच्यामुळे आमच्या भावडांची लग्न जमताना अडचण येऊ नये म्हणून आम्हीच घरातून बाहेर पडलो," असं त्या सांगतात.
मयुरी आणि दीपक यांच्या घरातून 'मैत्री'च काम चालतं.
मैत्री या संघटनेच्या माध्यमातून लोक एकत्र येतात हा मोठा आधार आहे, असं त्या म्हणाल्या.
पॅन कार्ड काढणे, आधार कार्ड बनवणे, सरकारी योजनांचा लाभ मिळावा म्हणून प्रयत्न करणे, असे उपक्रम ही संघटना राबवते. या उपक्रमांपेक्षाही आम्हाला आमचं मन मोकळं करण्यासाठी लोक भेटतात, हे फार महत्त्वाचं वाटतं असं त्या सांगतात.

फोटो स्रोत, BBC/Swati Patil Rajgoalkar
तर बाजूच्या सांगली जिल्ह्यात संपदा ग्रामीण महिला संस्थेच्या अंतर्गत काम करणारी 'मुस्कान' ही संस्था LGBTQसाठी काम करते. सुधीर या संघटनेचे सचिव आहेत. आरोग्याच्या अनुषंगानं या संस्थेचं काम चालतं. एचआयव्ही आणि एड्सच्या संदर्भात जनजागृती करणं, आरोग्य तपासणी शिबिरं घेणं अशी कामं ही संस्था करते.
निर्णय ऐतिहासिक
सुप्रीम कोर्टाचा निर्णय ऐतिहासिक आहे, असं ते म्हणतात.
हा एक ऐतिहासिक निर्णय असल्याचं सुधीर यांचं म्हणणं आहे. आता समाज आम्हाला स्वीकारेल याबाबत आशा वाढल्या आहेत.

"खरं सांगायच तर समलैंगिक व्यक्तींना घरातच स्वीकारलं जात नाही. घरात स्वीकारलं गेलं तर समाजही आम्हाला स्वीकारेल," असं ते सांगतात. सार्वजनिक स्वच्छतागृह सारख्या अगदी मूलभूत आणि महत्त्वाच्या सुविधांचीही अडचण असल्याचं ते सांगतात.
दिल्लीत एक नाटक पाहाण्यासाठी ते गेले होतं. तिथं स्वच्छतागृह वापरण्यावरून झालेला वाद त्यांच्या चांगलाच लक्षात आहे. पण बदल होईल, असं ते आशेने सांगतात.
आम्ही जे आहोत, त्यात आमचा काही दोष आहे का? आम्ही जे आहोत त्यात बदल होऊ शकतो का? समजाने आमच्याबद्दल चांगल्या भावननं पाहिलं पाहिजे, असं मयुरी सांगतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








