ऑनर किलिंग : 'बाबाच नवऱ्याचा निर्घृण खून करतील असं वाटलं नव्हतं'

अमृता

फोटो स्रोत, Facebook

    • Author, दिप्ती बत्तिनी
    • Role, बीबीसी तेलुगू प्रतिनिधी

"प्रणय माझी खूप काळजी घ्यायचा. तो माझ्यासाठी जेवण बनवायचा, मला खाऊ घालायचा. तो माझं आयुष्य होता." 21 वर्षीय अमृता तिच्या दिवंगत नवऱ्याबद्दल आवंढा गिळत बोलत होती.

24 वर्षीय प्रणयचा ऑनर किलिंगच्या प्रकरणात खून होऊन आता चार दिवस उलटले आहेत. तेलंगणातील मिरयालगुडा गावात जेव्हा दवाखान्यातून ते दोघं बाहेर येतं होती तेव्हा दोन अज्ञात व्यक्तींनी प्रणयचा निर्घृणपणे खून केला.

अमृताच्या कुटुंबीयांनी भाडोत्री गुंडांकडून हे कृत्य केल्याचा संशय आहे. प्रणय आणि अमृताचा विवाह आंतरजातीय होता. प्रणय दलित तर अमृता उच्च जातीतील असल्याने अमृताच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता.

पाच महिन्यांची गरोदर असलेली अमृता अशक्त दिसत होती मात्र चेहऱ्यावर खंबीरपणा झळकत होता. प्रणय आणि अमृता दोघं लहानपणी कसे भेटले हे सांगताना तिला रडू आवरत नाही मात्र ती लगेचच स्वत:ला सावरते.

फेसबुकवर अमृताने त्यांच्या लहानपणीचा एक फोटो शेअर केला होता. 'लहानपणी भेटलेली व्यक्ती आयुष्यभराचा जोडीदार होणं यासारखं सुख नाही. आयुष्यभर एकत्र राहण्यासाठीच आमचा जन्म झाला आहे."

ती ज्या बेडरूममध्ये बसली होती, तिथे लोकांची ये-जा चालू होती. हे सुरू असतानाच ती अधूनमधून फोन बघत होती. मधूनच ती आपल्या विचारात गुंतून जाते.

ती प्रणयला कशी भेटली असा प्रश्न जेव्हा तिला विचारला तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. "तो माझा शाळेत सिनिअर होता. आम्ही एकमेकांना कायमच आवडलो. मी नववीत होते आणि प्रणय दहावीत होता. आमच्यात तेव्हाच प्रेम फुललं. आम्ही दोघं फोनवर खूप बोलायचो." ती सांगते.

अमृता
फोटो कॅप्शन, अमृता

हे सांगत असताना ती आपल्या पोटावरून हळूवारपणे हात फिरवते. हे मूल म्हणजे आमच्या प्रेमाचं प्रतीक असल्याचं ती सांगते. "माझं मूल माझ्याबरोबर आहे याचा मला आनंद आहे. या बाळाच्या रूपात का होईना प्रणय आधीसारखाच माझ्याजवळ असेल."

"एकमेकांना भेटायला आम्हांला दूर कुठेतरी जावं लागायचं," अमृता सांगते.

लग्नाआधी मारहाण

मुलगा मुलगी एकमेकांना भेटतात, प्रेमात पडतात आणि लग्न करतात, असं साधं आयुष्य अमृता आणि प्रणयच्या वाट्याला आलं नाही. त्यांना धमक्या आल्या, लग्न होण्याआधी त्यांना अगदी मारहाणसुद्धा झाली.

"हे अगदी छोटं गाव आहे. त्यामुळे माझ्या आईवडिलांना आमच्या नात्याबद्दल लगेच कळलं. मी प्रणयला भेटू नये, अशी धमकी त्यांनी मला दिली होती. पण त्यामुळे माझा निश्चय ढळला नाही."

"मी त्याची जात किंवा आर्थिक परिस्थिती पाहिली नाही. आमचं एकमेकांवर प्रेम होतं आणि एकमेकांना समजून घेत होतो इतकंच आमच्यासाठी पुरेसं होतं," अमृता सांगते.

त्यांनी पहिल्यांदा एप्रिल 2016मध्ये लग्न केले. तेव्हा अमृता इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला होती. मात्र या लग्नाची कुठेही नोंद झाली नव्हती. तिचं हे कृत्य तिच्या पालकांना आवडलं नाही आणि त्यांनी तिला एका खोलीत कोंडून ठेवलं.

प्रणय
फोटो कॅप्शन, प्रणयला श्रद्धांजलीचा ओघ सुरू आहे

"माझ्या काकांनी प्रणयला धमकी दिली होती. त्यांनी मला डंबेल्सने मारहाण केली. हे सगळं माझ्या नातेवाईकांसमोर आणि माझ्या आईसमोर घडत होतं. माझ्यासाठी कोणीही उभं राहिलं नाही. मला एका खोलीत कोंडलं होतं. प्रणय दलित असल्यामुळे मी त्याला विसरून जावं अशी त्यांची इच्छा होती," असं ती सांगते.

मी लहान असताना माझ्या आईला इतर जातीच्या मुलामुलींशी केलेली मैत्री आवडायची नाही. मला जेव्हा खोलीत कोंडलं तेव्हा फक्त थोडंसं लोणचं आणि भात मिळायचा. माझे काका मला मारायचे आणि प्रणयला विसरून जा असं सांगतं असत. त्यांनी माझं शिक्षण थांबवलं. प्रणयशी बोलण्यासाठीचे सगळे मार्ग बंद झाले होते. फक्त प्रणयच्या प्रेमामुळे मला हे सगळं सहन करण्याची ताकद मिळाली." अमृता हे सगळं निर्विकारपणे शून्यात पाहात सांगत होती.

अमेरिकेला जाण्याची योजना

या संपूर्ण काळात ती प्रणयला भेटली नाही. ती थेट 30 जानेवारी 2018 ला प्रणयला भेटली. त्या दिवशी त्यांनी आर्य समाज पद्धतीने लग्न केलं.

"माझी तब्येत तेव्हा सारखी खराब व्हायची. मी डॉक्टर किंवा हॉस्पिटलच्या लोकांकडे प्रणयशी बोलण्यासाठी फोन मागायचे. तेव्हाच काय तो दिलासा मिळायचा. मग आम्ही आर्य समाज मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला कारण आम्हाला आमच्या लग्नासाठी कायदेशीर कागदपत्रांची गरज होती."

"आमच्या प्रेमासाठी आम्ही दोघांनी संघर्ष करण्याचा निर्णय घेतला," अमृता सांगते.

प्रणयच्या कुटुंबाला लग्नाची काहीही कल्पना नव्हती. लग्नानंतर दोघंही हैदराबादला गेले. तिथे कदाचित सुरक्षित राहू असं त्यांना वाटलं.

उच्च शिक्षणासाठी आमची अमेरिकेला जाण्याची योजना होती. त्याच दरम्यान मी गरोदर राहिले. तो आमच्यासाठी सर्वोच्च आनंदाचा क्षण होता.

आम्ही मूल जन्माला येईपर्यंत भारतात राहण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत आम्ही मुल जन्माला आल्यानंतर कॅनडाला जाण्याची तयारी करत होतो.

प्रणय

अमृता सांगते, ती गरोदर असण्याची बातमी जेव्हा आली तेव्हा आशेचा आणि आनंदाचा नवा प्रकाश दिसू लागला. आम्ही जरी पालकत्वाच्या जबाबदारीसाठी वयाने लहान असलो तरी बाळाच्या आगमनामुळे माझ्या पालकांचं मत बदलेल असं प्रणयला वाटतं होतं.

अमृताने तिच्या आईवडिलांना गरोदर असल्याचं कळवलं होतं. "माझे वडील मला गर्भपात कर असं सांगत होते. मी त्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता, तेव्हाही त्यांनी मला गर्भपात करण्यासाठी सांगतिलं. माझे वडील आणि वडिलांचे गुंड आम्हाला इजा करतील, अशी भीती आम्हाला नेहमीच वाटत होती. पण ते इतका अमानुष प्रकार करतील असं वाटलं नव्हतं," असं ती सांगते. जे घडलं त्यावर अमृताचा अजूनही विश्वास बसत नाही.

मला प्रणय 'कन्ना' या टोपण नावाने हाक मारायचा, ती सांगते.

त्या दिवशी नक्की काय घडलं?

ती सांगते, "मी त्या दिवशी फार उशिरा म्हणजे 11 वाजता उठले. मी प्रणयला बोलवलं. मला त्याने 'येतोय कन्ना' असं म्हटलं होतं, हे मला चांगलं आठवतं. मी नाश्ता केला, पण प्रणयने काहीच खाल्लं नव्हतं. आम्ही हॉस्पिटलला गेलो. आम्ही माझ्या पाठदुखीवर बोलत होतो, ही दोघं जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा तिच्या वडिलांनी डॉक्टरना फोन करून गर्भपाताविषयी विचारणा केली होती."

"तेव्हा डॉक्टरने त्यांचा कॉल कट केला आणि आम्ही दवाखान्यात नाही, असं त्यांनी सांगितलं. त्यांनी मला मिस कॉल केला होता. तपासणी पूर्ण झाल्यानंतर आम्ही हॉस्पिटलमधून बाहरे पडलो. मी प्रणयला काही तरी विचारत होते, पण मला त्याचा आवाज ऐकू आला नाही. एक व्यक्ती त्याचा गळा चिरण्याचा प्रयत्न करत होता आणि प्रणय खाली कोसळला होता, इतकंच मला दिसलं," ती हुंदके देत सांगत होती.

प्रणय

माझ्या सासूने त्या व्यक्तीला दूर ढकलले. मदत मागण्यासाठी मी हॉस्पिटलमध्ये धावले. मी काही मिनिटांनी माझ्या वडिलांना फोन केला आणि त्यांना खडसावले. त्यावर ते म्हणाले, "आता मी काय करू? त्याला दवाखान्यात ने."

काही दिवसांपूर्वी माझ्या वडिलांवर छोटी शस्त्रक्रिया झाली होती. माझी आई आणि नातेवाईक मी वडिलांना भेटून यावं असं सांगत होते. पण मी नकार दिला. दुसऱ्या दिवशी एका पुरुष आमच्या घरी भाड्याने द्यायच्या कारबद्दल चौकशी करण्यासाठी आला होता. या व्यक्तीचा आवाज टिपिकल होता. माझे सासरे त्याच्याशी बोलत होते. प्रणयला हॉस्पिटलमध्ये मारणारा माणूस हाच होता, असं माझा विश्वास आहे.

हे सगळं लक्षात घेता माझे वडील प्रणयचा घातपात करण्याचा कट रचत होते, असं मला वाटतं. माझ्या माहेरच्या लोकांनी अजून मला फोन केलेला नाही, हे विशेष. माझी आई मला फोन करायची. मला वाटलं ती माझ्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी फोन करत असावी. पण मला असा संशय आहे की, ती माझ्याबद्दलची माहिती वडिलांना देत असावी.

प्रणयचे पालकच माझे पालक आहेत, त्यामुळे मी माहेरी जाणार नाही, असं ती सांगते.

भक्कम पाठबळ

दलित संघटना आणि महिला संघटना त्यांच्या घरी भेट देत आहेत. मिळणाऱ्या पाठबळाबद्दल अमृताने आनंद व्यक्त केला आहे. जात नसलेला समाज मला निर्माण करायचा आहे, असं ती सांगते.

"प्रणय नेहमी सांगत असे प्रेम करणाऱ्यांना जातीमुळे अडथळा येऊ नये. जातीमुळे आम्हाला फार त्रास झाला आहे. मी न्यायासाठी लढणार आहे. प्रणयचा पुतळा शहराच्या मध्यभागी उभा करायचा आहे, त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या मी घेणार आहे," असं ती सांगते.

निव्वळ तो आमच्या जातीतील नव्हता म्हणून माझ्या वडिलांनी माझ्या नवऱ्याला मारले. ते माझ्यासाठी प्रणयपेक्षा चांगला पती शोधू शकले नसते. प्रणय दलित होता या एका कारणामुळेच माझ्या वडिलांचा आमच्या लग्नाला विरोध होता, असं ती म्हणाली.

प्रणयची आई हेमलता, वडील बाळास्वामी आणि भाऊ अमोल कोलमडून गेले आहेत. सध्या अजय अमृताची सर्वतोपरी काळजी घेत आहे. अजय माझा भाऊ आहे, असं अमृता सांगते.

घराबाहेर प्रणय 'अमर रहे'च्या घोषणा सुरू आहेत.

प्रणय

हेच माझं घर आहे. इथंच माझ्या बाळाचा जन्म होणार आहे, पाणावलेल्या डोळ्यांनी अमृता सासूला आधार देत सांगते.

माझं बाळ आणि सासरच्या लोकांचा घातपात करण्याचा प्रयत्न होईल, असं मला आजही वाटतं, असं ती सांगते.

प्रेमासाठी अमृताने आपलं शिक्षणही सोडलं होतं, अशा स्थितीमध्ये अमृता आणि तिच्या बाळाच्या भवितव्याबद्दल माझ्या मनात काळाजी दाटली होती.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)