धुळे हत्याकांड : अफवांच्या आधारावर ही जीवघेणी गर्दी येते तरी कुठून?

धुळे हत्याकांड

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, शिव विश्वनाथन
    • Role, समाजशास्त्रज्ञ

देशभरात अनेक ठिकाणी जमावाकडून हत्या होण्याच्या घटना घडल्या आहेत. खोट्या अफवांमुळे अनेक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. पण प्रश्न असा आहे की, इतके लोक एकाच उद्दिष्टानं एकत्र येतात तरी कसे?

गर्दीचं मानसशास्त्र हा समाजशास्त्राचा एक छोटासा भाग आहे. समाजात स्थिरता आल्यावर गर्दीचं मानसशास्त्र ही संकल्पना आता लयाला जात आहे.

फ्रेंच राज्यक्रांती आणि किंवा कु खुक्स क्लान (अमेरिकेतली गुप्त चळवळ) च्या वेळेला जमलेली गर्दी हे गर्दीचं मानसशास्त्र समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे.

एखाद्या कृष्णवर्णीयानं गौरवर्णीयाला मारणं ही घटना गर्दीचं मानसशास्त्र समजून घेण्यासाठी उपयुक्त होती. प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ गॉर्डन अलपोर्ट आणि रॉजर ब्राऊन यांना सुद्धा या संकल्पनेला प्रतिष्ठा मिळवून देता आली नाही.

काही लोकांनी त्याला समाजशास्त्र आणि मानसशास्त्रापर्यंतच मर्यादित ठेवलं आहे आणि त्याचा पॅथॉलॉजी म्हणून वापर केला जातो. ही संकल्पनासुद्धा अभावानंच आढळते.

आज जमावाकडून होणाऱ्या हत्येला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. हिरोसारखी दिसणारी ही गर्दी दोन रुपात दिसते.

पहिलं रुप असं की बहुसंख्यांक लोक लोकशाहीला अशा पद्धतीनं पाहतात तिथं ते स्वत:च कायद्याचं काम करतात. खाण्यापासून कपडे घालण्यापासून सगळ्यावर त्यांचं नियंत्रण असतं. ते करत असलेल्या हिंसेला व्यावहारिक आणि गरजेचं ते ठरवतात.

अफराजूल आणि अखलाक या प्रकरणी गर्दीची प्रतिक्रिया दिसते तर त्याचवेळी कठुआ आणि उन्नाव प्रकरणात आरोपींचा बचाव होताना दिसतो. त्यामुळे ही गर्दीच न्यायाची आणि नैतिकतेची मर्यादा ठरवते असं चित्र उभं राहत आहे.

ही गर्दी (ज्यात जीवे मारणाऱ्या गर्दीचा समावेश आहे) हुकुमशाही व्यवस्थेचाच एक विस्तारित भाग आहे. गर्दी समाजाची विचार करण्याची क्षमता आणि चर्चेनं समस्या सोडविण्याचे सगळे मार्ग बंद करते.

गर्दीचं दुसरं रूप

पण मुलांचं अपहरण होण्याच्या अफवांच्या ज्या घटना घडत आहेत त्यात गर्दीचं एक वेगळंच रुप दिसतं. त्यात गर्दीच्या उद्रेकामागे एक मोठी चिंता दिसतेय.

मुलांचं अपहरण होणं ही कुणासाठीही काळजीचीच गोष्ट आहे. असा विचार केला तरी काळजाचा थरकाप उडतो. त्यामुळे गर्दीच्या उमटणाऱ्या प्रतिक्रियेचं कारण शक्ती नसून भीती आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

हत्या

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधीक फोटो

या हिंसेचा उद्देश अल्पसंख्य लोकांचं नुकसान करणं नाही तर अनोळखी आणि बाहेरच्या लोकांना जे स्थानिक समाजात फिट होत नाहीत अशा लोकांना शिक्षा देणं हा आहे. दोन्ही उद्दिष्टांमध्ये शंका हा एक समान धागा आहे.

पहिल्या बाबीत अल्पसंख्यांकांकडून सत्तेला आव्हान मिळतं आणि दुसऱ्या बाबतीत अनोळखी माणसावर कोणत्यातरी अपराधाचा आरोप होतो.

वाढत्यातंत्रज्ञानामुळे वाढत्या अडचणी

दोन्ही बाबतीत रोषाचं प्रमाण वाढण्यासाठी तंत्रज्ञान एक महत्त्वाचं कारण आहे. तंत्रज्ञानामुळे अफवा वेगानं पसरतात आणि एक-दुसऱ्याचं ऐकून त्यात आणखी वाढ होते.

आधी तंत्रज्ञानाचा विकास फारसा न झाल्यानं अफवा इतकं भयावह रुप घेत नसत.

इतकंच काय तर डिजिटल हिंसा छोट्या शहरात किंवा गावात जास्त भयावह पद्धतीनं काम करतात.

हिसेंची ही पद्धत एखाद्या साथीच्या रोगासारखी आहे हे अगदी स्पष्ट आहे. प्रत्येक वेळेला सुरुवात सारखीच होते. प्रत्येक प्रकरणात अफवा तथ्यहीन असतात. मग हीच पद्धत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पसरते.

हत्या

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधीक फोटो

त्रिपुरात मुलांचं अपहरण करण्याची शंका घेऊन तीन लोकांची जमावानं हत्या केली. एका खोट्या सोशल मीडिया मेसेजच्या आधारावर क्रिकेटची बॅट आणि लाथांनी मारहाण केल्यामुळे त्यांचा जीव गेला.

एक व्हॉटसअॅप मेसेजनं तामिळनाडूतील हिंदी बोलणाऱ्या लोकांना एकत्रित केलं. अगरतळामध्ये मुलांच्या अपहरणाच्या अफवेमुळे दोन लोकांची हत्या झाली. या सगळ्या परिस्थितीला सोशल मीडिया जबाबदार आहे.

हे सगळं अतिशय वेगानं होतं. कोणाला तरी शंका येते, तो मेसेज पाठवतो, जमाव एकत्र येतो. अशा परिस्थितीत न्याय होण्याची शक्यता जवळपास शून्य असते.

स्थलांतर : एक मोठी समस्या

जिथं स्थलांतर मोठ्या प्रमाणात होतं त्या भागात अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. या ठिकाणी दुसऱ्या राज्यांत रोजगार किंवा अन्य कारणांमुळे लोक तिथं स्थायिक होतात.

त्यांना रहायला जागा तर मिळते, पण लोक त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत. त्यांच्यावर विश्वास ठेवायला वेळ लागतो.

इतकंच काय तर काही ठिकाणी बाहेरून आलेल्या लोकांची संख्या आता मूळ लोकांपेक्षा जास्त झाली आहे.

प्रशासन यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतं. पण याचा संबंध नेहमीच कायदा सुव्यवस्थेशी नसतो. त्यामुळे ही समस्या कायदा आणि सुव्यवस्थेचा नाही तर समाजातली विसंगती सोडवण्याची गरज आहे.

स्थलांतर यापैकीच एक समस्या आहे. त्यामुळे एखाद्या परिसरात बाहेरच्या लोकांची संख्या वाढते. आता ही व्यक्ती बाहेरची तर असतेच पण खरंतर त्यांनाच धोका सगळ्यात जास्त असतो.

सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांमुळे त्यांच्याविरुद्ध आधीपासूनच तयार झालेली विचारसरणी आणखी घट्ट होते.

तंत्रज्ञान आणि तर्क

अगरतळाला ज्या लोकांना जागरूक करण्यासाठी ठेवलं होतं त्याचीच जमावानं हत्या केली. या घटनेमुळे आणखी एक पैलू समोर येतो.

पीडित सुकांत चक्रवर्ती अफवांपासून दूर राहण्यासाठी गावागावात फिरून लाऊड स्पीकरवरून लोकांमध्ये जागरुकता पसरवण्याचं काम करत होते. त्यांच्याबरोबर फिरणाऱ्या दोन लोकांवर जमावानं हल्ला केला.

इथं लाऊड स्पीकरवरून संदेश देण्याचा प्रयत्न आणि सोशल मीडियाचा वेग या सगळ्या गोष्टी जमावाच्या पुढे थिट्या पडल्या.

जमावाकडून हत्या

फोटो स्रोत, RAVI PRAKASH

फोटो कॅप्शन, झारखंडमध्ये रामगढ येथे जमावानं गायीच्या तस्करीच्या आरोपाखाली अलीमुद्दीन अन्सारी यांची हत्या केली.

जीव घेणारी गर्दी सोशल मीडियाच्या नियमांप्रमाणे चालते आणि हिंसेला पुढे नेते. गर्दी जमवणाऱ्या डिजिटल हिंसेला वेगळ्या पद्धतीनं हाताळण्याची गरज आहे.

भारतात मौखिक, लेखी, आणि डिजिटल युगात हिंसाचाराचा धोका आता आणखी वाढू शकतो. तंत्रज्ञानाचा वेग आणि गर्दीची तर्कहीनता बदलत्या समाजाचं धोकादायक लक्षण आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)