भीमा कोरेगाव : एल्गार परिषदेशी संबंधित पाच कार्यकर्त्यांना अटक

फोटो स्रोत, Getty / Getty / Facebook
पुण्याच्या एल्गार परिषदेनंतर भीमा कोरेगावात झालेल्या हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी देशभरात धाडी टाकून पाच कार्यकर्त्यांना अटक केली आहे.
पुणे, हैदराबाद, दिल्ली, मुंबई आणि रांची या शहरांमध्ये मंगळवारी सकाळी या धाडी टाकण्यात आल्या, असं एका पोलीस अधिकाऱ्याने बीबीसी मराठीला सांगितलं.
या धाडसत्राशी निगडित एका अधिकाऱ्याने बीबीसीला सांगितलं की मुंबईत व्हर्नोन गोन्साल्विस आणि अरुण फरेरा, दिल्लीचे मानवाधिकार कार्यकर्ते आणि पत्रकार गौतम नवलखा, नागरी हक्कांच्या वकील सुधा भारद्वाज, हैदराबादचे चळवळवादी आणि कवी वरावरा राव तसंच रांची येथील स्टेन स्वामी यांच्या घराची झडती घेण्यात आली.
त्यानंतर स्टेन स्वामी वगळता इतर पाच जणांना अटक करण्यात आली.
पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात एल्गार परिषदेविरुद्ध बेकायदेशीर कारवाया रोखण्यासाठी तयार केलेल्या कायद्याअंतर्गत FIR दाखल केला होता. ही एल्गार परिषद 31 डिसेंबर 2017 ला पुण्याच्या शनिवार वाड्यासमोर आयोजित करण्यात आली होती. पोलिसांचा दावा आहे की या परिषदेत देण्यात आलेल्या भाषणांमुळे दुसऱ्या दिवशी पुण्याजवळच्या भीमा कोरेगावात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जूनमध्ये अटक झालेल्या पाच कार्यकर्त्यांची चौकशी केल्यावर ही नावं समोर आली, म्हणून त्यांच्या घरांवर हे धाडसत्र झालं.

फोटो स्रोत, BBC Telugu
सुधा भारद्वाज यांची मुलगी अनुषा भारद्वाज यांनी बीबीसीला सांगितलं की पोलिसांनी त्यांच्या घरी सकाळी सात वाजता धाड टाकली आणि सुधा भारद्वाज यांचा फोन आणि लॅपटॉप जप्त केला आहे. सुधा भारद्वाज यांनाही हरियाणाच्या सुरजकुंड येथील पोलीस ठाण्यात घेऊन गेले आहेत.
सुधा भारद्वाज नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये गेस्ट फॅकल्टी आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
'...मग भिडेंना अटक का नाही?'
मुंबईतील 60 वर्षीय व्हर्नोन गोन्सालवीस यांच्या घरी आज सकाळी 6 वाजता पोलीस आले. दुपारपर्यंत चौकशी सुरू होती. दुपारी पावणे दोन वाजता पोलीस त्यांना अटक करून घेऊन गेले, असं त्यांच्या मुलाने सांगितलं. "त्यांनी आमचं अख्खं घर धुंडाळून काढलं, आमचे पेन ड्राईव्ह चेक केले आणि आमच्या काँप्युटरमधली हार्ड डिस्क आणि मोबाईल फोन घेऊन गेले. त्यांनी काही अशी पुस्तकंही नेली, जी बाजारात सहज उपलब्ध आहेत," असं सुनील गोन्साल्वेस यांनी सांगितलं.
हिंदू संस्थांशी संबंधित लोकांना झालेल्या अटकसत्रावरून लक्ष विचलित करण्यासाठीच ही कारवाई केली जात आहे, असा आरोप व्हर्नोन गोन्सालवीस यांच्या पत्नी सुझन अब्राहम यांनी बीबीसी मराठीशी बोलताना केला.
भीमा-कोरेगांव येथील दंगल भडकवणाऱ्या संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर काहीच कारवाई करण्यात आलेली नाही. पण जी माणसं निर्दोष आहेत, त्यांना नाहक त्रास दिला जातोय, असं सुझन पुढे म्हणाल्या.

फोटो स्रोत, सागर अब्राहम गोन्सालवीस
एप्रिल 2007 मध्येही व्हर्नोन यांना माओवादी ठरवून अटक करण्यात करणात आली होती. आर्थर रोड आणि नागपूर कारागृहात ते अडरट्रायल होते. जून 2013 मध्ये त्यांची सुटका करण्यात आली.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सिमेन्स कंपनीत नोकरी धरली होती. मात्र आणीबाणीच्या काळात नोकरी सोडून स्वतंत्रपणे काम करू लागले. त्यानंतर काही काळ ते मुंबईच्या डी. जी. रुपारेल महाविद्यालय आणि एच. आर. कॉलेजमध्ये कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना शिकवायचे. अलीकडे ते DailyO, The Wire या संकेतस्थळांसाठी विविध विषयांवर लेखन करत होते.

फोटो स्रोत, BBC Telugu
शिवाय, राजकीय कार्यकर्ते आणि वकील अरुण फरेरा यांच्या ठाण्यातील घरावर पोलिसांनी आज पहाटे धाड टाकून त्यांना दुपारी अटक करून पुण्याला नेलं. "मला त्याच प्रकरणात पुणे पोलिसांनी अटक केली आहे," एवढंच सांगत फरेरा यांनी आणखी काही सांगण्यास नकार दिला आहे.
पण यापूर्वीही 2007 मध्ये पोलिसांनी त्यांना नक्षलवादी ठरवून अटक केली होती. त्यांनी लिहिलेल्या 'Colours of the cage: A prison memoir' या पुस्तकात भारतीय तुरुंगात होणाऱ्या छळाचा लेखाजोखा मांडण्यात आला होता.

प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांनी बीबीसी तेलुगूशी बोलताना सांगितलं, "खुलेआम लोकांची हत्या करणाऱ्या, लिंचिंग करणाऱ्या लोकांऐवजी वकील, कवी, लेखक, दलित अधिकारांसाठी लढणाऱ्या आणि बुद्धिजीवी लोकांविरुद्ध धाडी टाकल्या जात आहेत. यावरून भारत कोणत्या दिशेने जात आहे, हे कळतंय. खुनी लोकांचा सन्मान केला जाईल परंतु न्याय आणि हिंदू बहुसंख्यांकवादाविरुद्ध बोलणाऱ्या लोकांना गुन्हेगार बनवलं जात आहे. ही आगामी निवडणुकांची तयारी आहे का?"
शिवाय, ज्येष्ठ इतिहासकार आणि लेखक रामचंद्र गुहा यांनीही हे धाडसत्र धक्कादायक असल्याचं सांगितलं.
"सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची नितांत गरज आहे. स्वतंत्र आवाजांची गळचेपी होत आहे. सुधा भारद्वाज तर कायद्याचं उल्लंघन आणि हिंसाचाराशी काहीही संबंध नाही. उलट (भाजप अध्यक्ष) अमित शाह याच्या जास्त जवळ आहेत," असं ते ट्विटरवर म्हणाले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील या कारवाईचा निषेध करत संघावर निशाणा साधला आहे.
"देशात फक्त एकाच गैरसरकारी संस्थेला जागा आहे - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. बाकी सर्व NGO बंद करा. सगळ्या कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबा आणि जे कुणी तक्रार करतात त्यांना गोळ्या घाला. या नव्या भारतात तुमचं स्वागत आहे," असं गांधी एका ट्वीटद्वारे म्हणाले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








