रक्षाबंधन : पंतप्रधान नरेंद्र मोदींची ती बहीण जिचा जन्म पाकिस्तानात झाला

फोटो स्रोत, BBC/Mohasin Shaikh
- Author, अनंत प्रकाश
- Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत लोकांनी एक राजकीय नेता, एक मुलगा आणि भारताच्या लोकप्रिय पंतप्रधानांच्या रूपात पाहिलं आहे. आणि त्यांच्या अवतीभवतीच्या जवळच्या लोकांनाही आपण अनेकदा पाहिलं आहे.
पण या रक्षाबंधनाला आम्ही तुमची भेट घालून देणार आहोत नरेंद्र मोदींच्या मानलेल्या बहिणीशी. कमर मोहसीन शेख असं त्यांचं नाव आहे.
गेल्या वर्षी त्या दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधल्यावर त्यांनी बीबीसीला मुलाखत दिली. मोदी जेव्हा संघाचे एक सामान्य स्वयंसेवक होते तेव्हापासून त्या मोदींना राखी बांधत असल्याचं त्यांनी सांगितलं.
कमर यांचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला. तिथेच त्यांचं शिक्षणही झालं. एका भारतीयाशी लग्न केल्यावर त्या भारतात राहिल्या. पण त्यांच्या मनात पाकिस्तानच्या आठवणी ताज्या आहेत. दोन्ही देशांमध्ये सलोखा असावा, अशी त्यांची इच्छा आहे.
अजिबात बदलले नाही नरेंद्र भाई
खास उर्दूत शेर ऐकवणाऱ्या कमर मोहसीन शेख म्हणतात की त्या मोदींना गेली अनेक वर्षं राखी बांधत आहेत, मात्र खासगी आयुष्यात मोदी आधी जसे होते तसेच आता आहेत.
"एकदा मी नरेंद्र भाईंना राखी बांधायला दिल्लीत आली, तेव्हा ते माझ्याकडे पाहात हसत म्हणाले, 'अरे कमर, तू तर हल्ली टीव्हीवर चांगलीच चमकत आहेस. स्टार झालीस की तू.' मग त्यांनी माझ्या मुलाविषयी विचारलं आणि जलतरण क्षेत्रात तो काय करतोय, कुठे शिकतोय हे सगळं विचारलं," कमर आठवणींत रममाण होतात.
कसं जुळलं नातं?
मोदी आणि कमर यांच्यात हे बंध निर्माण होण्याची कहाणीसुद्धा तितकीच रंजक आहे.
पाकिस्तानातून जवळजवळ 37 वर्षांपूर्वी भारतात आलेल्या कमर शेख यांच्या मते भावाच्या रूपात त्यांना फक्त नरेंद्र मोदीच दिसतात.

फोटो स्रोत, BBC/Mohsin Shaikh
त्या सांगतात, "नरेंद्र मोदी यांची माझी पहिली भेट दिल्लीत झाली. तेव्हा ते गुजरातचे खासदार दिलीपभाई संघानी यांच्याकडे राहत होते. मी माझ्या पतींबरोबर दिल्लीला त्यांचे काही पेंटिंग्ज घेऊन गेले होते. तिथे माझी भेट नरेंद्र भाईंशी झाली. जेव्हा त्यांनी पेंटिंग पाहिले, त्यांना ते फारच आवडले."
मोदींबरोबर जुळलेल्या राखीच्या बंधनाविषयी त्या सांगतात, "गुजरातचे तत्कालीन राज्यपाल स्वरूप सिंह मला मुलीसारखं मानायचे. जेव्हा ते गुजरातमधून जायला लागले तेव्हा नरेंद्र मोदी त्यांना सोडायला एअरपोर्टवर आले. तेव्हा स्वरूप सिंह म्हणाले की 'कमर माझी मुलगी आहे आणि तिच्यावर लक्ष ठेवा.' यावर नरेंद्र मोदी म्हणाले की 'तुमची मुलगी म्हणजे ती आमची बहीण झाली.' त्यानंतर दरवर्षी नरेंद्र मोदींना त्या राखी बांधतात."
भारत-पाकिस्तान संबंधात सुधार व्हावा
पाकिस्तानच्या कराची शहरात बालपण घालवलेल्या आणि तिथेच शिक्षण घेणाऱ्या कमर सांगतात की दोन्ही देशांची जनता सारखीच आहे. दोन्ही बाजूचे लोक प्रेमळ आहे आणि एक दुसऱ्यावर प्रेम करतात.
त्या म्हणतात, "मी पाकिस्तानात राहते आणि भारतातही राहते, आणि मी दोन्ही देशांच्या लोकांनाही पाहते. जर तुम्ही पाकिस्तानात जाऊन लोकांना भेटलेत तर तुम्हाला कळेल की अगत्य करण्यात ते कोणतीही कसर सोडत नाही. इथेही तसाच माहोल आहे."
कला आणि क्रीडा दोन अनोळखी लोकांना आपलंसं करतं. सध्या भारताचे पंतप्रधान मोदी कलासक्त आहेत आणि पाकिस्तानचे पंतप्रधान माजी क्रिकेटपटू इम्रान खान आहेत. तेव्हा आता या दोन देशांतील संबंध सुधारतील का, असा प्रश्न आम्ही त्यांना विचारला.

फोटो स्रोत, BBC/Mohsin Shaikh
त्यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, "इम्रान खान एक क्रिकेटरच्या रूपात खूप चांगले आहेत. पण राजकारणातील निर्णय हे त्या व्यक्तीपेक्षा वेगळे असतात. मी प्रार्थना करते की दोन्ही देशात शांतता आणि सौहार्दता कायम रहावी."
जेव्हा वाजपेयींशी झाली भेट
त्या सांगतात, "1998 सालची ती गोष्ट. तेव्हा वाजपेयींनी अणुचाचण्या केल्या होत्या. तेव्हा नरेंद्र मोदींनी माझ्या पतीने केलेलं पेंटिंग तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना दाखवलं. आणि वाजपेयींना पेंटिंग दाखवत ते म्हणाले, 'हा पेंटिंग भारताचे सुपुत्र आणि पाकिस्तानच्या कन्येनं तयार केलं आहे.' वाजपेयींना ते पेंटिंग फारच आवडलं."

फोटो स्रोत, BBC/Mohsin Shaikh
मोहसीन शेख या घटनेच्या बाबतीत दावा करताना सांगितलं, "मी माझ्या पेंटिंगबरोबर एक कविता लिहिली होती आणि मी जेव्हा ती वाचून दाखवली तेव्हा वाजपेयींच्या डोळ्यातून अश्रू आले. ते म्हणाले की पोखरणच्या बाबतीत माझ्या मनात ज्या भावना होत्या त्या कविता आणि चित्राच्या रूपात मला दिसल्या."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








