नरेंद्र मोदी आणि अटल बिहारी वाजपेयी यांचं नातं कसं होतं?

अटल बिहारी वाजपेयी यांच्याबरोबर गुजरातचे तत्कालीन मुख्ममंत्री नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Hindustan Times / Getty Images

फोटो कॅप्शन, अटल बिहारी वाजपेयी यांच्याबरोबर गुजरातचे तत्कालीन मुख्ममंत्री नरेंद्र मोदी
    • Author, विजय त्रिवेदी
    • Role, ज्येष्ठ पत्रकार

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा आज (25 डिसेंबर) जन्मदिन. त्यानिमित्ताने ज्येष्ठ पत्रकार विजय त्रिवेदी यांचा अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांच्या नात्याबद्दलचा हा लेख पुन्हा प्रसिद्धा करत आहोत.

1980 साली भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. या पक्षस्थापनेमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचा महत्त्वाचा वाटा होता. या पक्षानं अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी असे दोन पंतप्रधान दिले आहेत.

27 मार्च 2015 ची संध्याकाळ. संधिप्रकाशानं आकाश व्यापला होता. सूर्य अस्ताकडे मार्गक्रमण करत होता.

दिल्लीतल्या कृष्ण मेनन मार्गावर गाड्यांची ये-जा थांबत नव्हती. एरव्ही फार शांत असणाऱ्या या भागात सुरक्षारक्षक आणि वाहतूक पोलिसांची वाहनांचं नियोजन करताना तारांबळ उडत होती.

तसं इथून राष्ट्रपती भवन फारतर दोन किलोमीटर लांब असेल, पण प्रोटोकॉल मोडून स्वतः राष्ट्रपती प्रणव मुखर्जी तिथे पोहोचणार होते. कारण त्यांना माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना देशाचा सर्वोच्च सन्मान 'भारतरत्न' द्यायचा होता.

सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसी वाहनांच्या सायरनमुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांवरून पक्षी अचानक उडू लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाड्यांचा ताफाही तिथे पोहोचला आणि त्यांच्या पाठोपाठ उपराष्ट्रपती हमीद अन्सारीसुद्धा तिथे पोहोचले.

6-A, कृष्ण मेनन मार्ग. तीन वेळा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणारे अटल बिहारी वाजपेयी यांचं हे निवासस्थान.

1999मध्ये जेव्हा वाजपेयी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनले, तेव्हा ते देशाचे नववे असे नेते होते जे काँग्रेस पक्षातून नसूनही या पदापर्यंत पोहोचले होते. तसंच पाच वर्षं बिगर-काँग्रेस सरकार चालवणारे ते पहिले पंतप्रधान ठरले.

केंद्रातल्या मोदी सरकारने 24 डिसेंबर 2014ला पंडित मदन मोहन मालवीय यांच्यासोबत वाजपेयी यांना भारतरत्न सन्मान देण्याची घोषणा केली. तेव्हा त्याला कोणीही विरोध केला नाही. उलट प्रत्येकानं सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं.

नरेंद्र मोदी आणि अटल बिहारी वाजपेयी

फोटो स्रोत, SAM PANTHAKY/GETTY IMAGES

16 ऑगस्ट 2018च्या सायंकाळीही अचानक कृष्णा मेनन मार्गावरील हालचाली वाढू लागल्या. कारण विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासारखे दिग्गज नेते या बंगल्यावर पोहोचणार होते.

पत्ता तोच 6-A, कृष्ण मेनन मार्ग. पण वाजपेयी निश्चल झाले होते. 60 वर्षं भारताच्या राजकारणात लोकांचं मन जिंकणाऱ्या वाजपेयींनी सायंकाळी 5 वाजून 05 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला होता.

यावेळी श्रद्धांजली वाहताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "अटलजी गेले, माझ्यावरचं वडिलांचं छत्र हरवलं. त्यांनी मला संघटन आणि शासन या दोघांचं महत्त्व समजावलं होतं. त्यांच्या जाण्याने एक अशी पोकळी निर्माण झाली आहे, जी कधीच भरून येणार नाही."

अटल बिहारी वाजपेयींची अंत्ययात्रा

फोटो स्रोत, Getty Images

जवळपास 9 आठवड्यांपूर्वी 11 जूनला वाजपेयी यांना AIIMS हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून पंतप्रधान मोदी त्यांना चार वेळा भेटण्यासाठी गेले होते. त्यांची तब्येत बिघडल्याची माहिती मिळताच ते 24 तासांत दोनदा त्यांना बघायला गेले. त्याआधी मोदी दररोज फोनवरून AIIMSच्या डॉक्टरांकडून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत होते.

मोदी यांनी सांगितलं की जरी त्यांच्या आणि वाजपेयींमध्ये भाजप नेत्यांच्या एका पिढीचं अंतर आहे. पण दोघांच्या नात्यात एवढी जवळीक होती की हे अंतर कधी जाणवलं नाही.

अटल बिहारी वाजपेयींची अंत्ययात्रा

फोटो स्रोत, Getty Images

भाजपमध्ये मोदींना लालकृष्ण अडवाणी यांनी तयार केलं. गुजरातहून सुरू झालेल्या अडवाणी यांच्या रथयात्रेचे संयोजक मोदीच होते.

मोदी यांना गुजरातचे मुख्यमंत्री बनवण्यात अडवाणी यांची महत्त्वाची भूमिका होती. तसंच, अडवाणी यांचं गांधीनगर हे लोकसभा क्षेत्र मोदीच सांभाळत होते.

पण फार कमी लोक हे जाणतात की, वायपेयींनी केवळ मोदींना गुजरातचे मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णयच नाही घेतला तर, जेव्हा मोदी यांचा 2000 मध्ये पडता काळ होता, तेव्हा त्यांना अमेरिकेतून दिल्लीतून परतण्याचा त्यांनी आदेश दिला होता.

line

मोदींचा राजकीय एकांतवास

28 डिसेंबर 2014ला न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डन खचाखच भरलेलं होतं. या कार्यक्रमाला अनिवासी भारतीय आणि त्यातही गुजराती लोकांची संख्या प्रचंड होती.

केवळ न्यूयॉर्कच नाही तर अमेरिकेतल्या वेगवेगळ्या भागांमधून आलेली ही माणसं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघायला, त्यांना भेटायला आणि त्यांचं भाषण ऐकायला आली होती.

नरेंद्र मोदी आणि अटल बिहारी वाजपेयी

फोटो स्रोत, Getty Images

अख्ख्या प्रांगणात नरेंद्र मोदी यांच्या नावाचा जयघोष सुरू होता. व्हीडिओ स्क्रीनवर भारताच्या प्रगतीची कथा सांगितली जात होती आणि भाजपचे पहिले पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आणि त्यांच्या सरकारची प्रशंसाही सुरू होती.

मोदींनी भाषणात अनेकदा वाजपेयींचा उल्लेख केला. याच कार्यक्रमानंतर माझी भेट एका गुजराती व्यक्तीसोबत झाली. ही व्यक्ती भाजपची समर्थक तसंच नरेंद्र मोदी यांच्या जवळच्या मित्रांपैकी एक होती.

"2000मध्ये पंतप्रधान वाजपेयी जेव्हा अमेरिकेच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांचाही अनिवासी भारतीयांबरोबर एक कार्यक्रम झाला होता," असं ती व्यक्ती सांगत होती. "त्यावेळी नरेंद्र मोदी राजकीय एकांतवासात अमेरिकेतच होते, पण ते त्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. गुजरातच्या राजकारणात केशूभाई पटेल यांच्याविरोधात खेळी केल्याच्या आरोपाप्रकरणी मोदी यांना गुजरातमधून बाहेर जाण्याचा आदेश देण्यात आला होता."

लालकृष्ण आडवाणी, नरेंद्र मोदी आणि केशूभाई पटेल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लालकृष्ण आडवाणी, नरेंद्र मोदी आणि केशूभाई पटेल

तेव्हा "मोदी अमेरिकेत आहेत आणि तुम्हाला त्यांना भेटायला आवडेल का?" असं मोदींच्या या मित्रानं वाजपेयींना विचारलं आणि त्यांनी लगेच तयारी दर्शविली.

नरेंद्र मोदी आणि अटल बिहारी वाजपेयी

फोटो स्रोत, Getty Images

दुसऱ्या दिवशी जेव्हा वाजपेयी आणि मोदींची भेट झाली तेव्हा वाजपेयींनी मोदींना म्हटलं की, "असं पळून जाऊन काम होणार नाही. किती दिवस इथं राहणार? दिल्ली आओ."

"या भेटीनंतर काही दिवसांनी मोदी दिल्लीला आले, तेव्हा त्यांचा राजकीय एकांतवास संपुष्टात आला आणि एक नवीन राजकीय इनिंग खेळण्यासाठी ते तयार झाले."

line

नवी जबाबदारी

ऑक्टोबर 2001 मधली एक सकाळ. शांत आणि सुन्न करणारं वातावरण. कोणत्याही उत्तराची अपेक्षा नसताना चेहरे मात्र एकमेकांना प्रश्न विचारत आहेत, असं वाटत होतं. दिल्लीतल्या एका स्मशानभूमीत एक चिता जळत होती.

नरेंद्र मोदी आणि अटल बिहारी वाजपेयी

फोटो स्रोत, PRAKASH SINGH/GETTY IMAGES

एका चित्रवाहिनीचे कॅमेरामॅन गोपाल बिष्ट यांच्या अंत्यसंस्कारात काही पत्रकार आणि राजकीय नेते सहभागी झाले होते. तितक्यात एका नेत्याचा फोन वाजला, पलीकडून आवाज आला, "कुठे आहात?"

"स्मशानभूमीत आहे," असं फोन उचलणाऱ्या व्यक्तीनं सांगितलं.

"मला येऊन भेटा."

यानंतर लगेच फोन कट झाला. स्मशानभूमीत आलेल्या त्या फोनने भारताच्या राजकारणाची दिशाच बदलली.

नरेंद्र मोदी आणि अटल बिहारी वाजपेयी

फोटो स्रोत, GETTY IMAGES/DIBYANGSHU SARKAR

फोटो कॅप्शन, नरेंद्र मोदी आणि अटल बिहारी वाजपेयी

ही राजकारणी व्यक्ती होती नरेंद्र मोदी. त्याकाळी ते दिल्लीतल्या अशोक रोडवर असलेल्या भाजपच्या कार्यालयामागील एका छोट्याशा खोलीत राहत होते. या खोलीत एक बेड आणि दोन खुर्च्या होत्या.

त्याकाळी भाजपमध्ये प्रमोद महाजन, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली या नेत्यांचा दबदबा होता. नरेंद्र मोदी जेव्हा गोपाल बिष्ट यांच्या चितेकडे पाहात होते तेव्हाच त्यांना पंतप्रधान वाजपेयींचा फोन आला होता.

मोदी वाजपेयींच्या निवासस्थानी पोहाचले तेव्हा त्यांच्याकडे गुजरातला जाण्याची जबाबदारी सोपवण्यात आली.

पक्षाचे दिग्गज नेते आणि गुजरातचे मुख्यमंत्री केशूभाई पटेल यांना हटवून मोदींना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली.

वाजपेयींचा आशीर्वाद

"मी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना राजधर्म पाळायला सांगितलं आहे," असं 2002मध्ये गुजरात दंगलींनंतर अहमदाबादला पोहोचल्यानंतर वाजपेयींनी म्हटलं होतं.

2002च्या गुजरात दंगलींनतर वाजपेयी आणि मोदींना घेतलेली ती पत्रकार परिषद

फोटो स्रोत, PIB

फोटो कॅप्शन, 2002च्या गुजरात दंगलींनतर वाजपेयी आणि मोदींना घेतलेली ती पत्रकार परिषद

"साहेब, आम्ही तेच तर करत आहोत," असं शेजारी बसलेल्या मोदींनी वाजपेयींना म्हटलं होतं.

"मला विश्वास आहे की नरेंद्रभाई तेच करत आहेत," असं वाजपेयींनी त्यानंतर म्हटलं. पण याबद्दल वाजपेयींच्या मनात द्विधा परिस्थिती होती.

अटल बिहारी वाजपेयी

फोटो स्रोत, Getty Images

यानंतर गोव्यात होणाऱ्या भाजपच्या कार्यकारिणी सभेत सहभागी होण्यासाठी दिल्लीहून निघालेल्या विमानात पंतप्रधान वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जसवंत सिंह आणि अरुण शौरी होते.

मोदींना या सभेत कमीतकमी राजीनामा देण्याची तयारी दाखवावी, असं वाजपेयींना वाटत होतं. पण अडवाणींना मात्र हे मान्य नव्हतं.

याचा काही फायदा होणार नाही, असं अडवाणींबरोबरच अनेक नेत्यांना वाटत होतं. पण कार्यकारणीची बैठक सुरू झाली आणि मोदींनी स्वत:हून राजीनामा देण्याची तयारी दाखवली.

राजीनामा स्वीकारण्यात येऊ नये, अशा घोषणा संपूर्ण सभागृहात ऐकू यायला लागल्या. यावेळी वाजपेयींचे विश्वासू प्रमोद महाजनही मोदींच्या पाठीशी उभे असल्याचे दिसून आले. वायजपेयींनी नेहमीप्रमाणे बहुमताचा स्वीकार केला आणि मोदी आपल्या मार्गानं समोर गेले.

अटल बिहारी वाजपेयी

फोटो स्रोत, Getty Images

यानंतर 2013मधील जूनचा महिना. गोव्यात भाजपच्या कार्यकारिणीची बैठक झाली आणि मोदींना भाजपच्या प्रचार समितीचं प्रमुख बनवण्यात आलं. त्यानंतर मोदींनी दिल्लीला येऊन सर्वप्रथम वाजपेयी यांचा आशीर्वाद घेतला.

मे 2014मध्ये पंतप्रधान बनल्यानंतरही मोदींनी सर्वप्रथम वाजपेयींची आठवण काढली. वाजपेयींच्या जन्मदिवसाअगोदर भारत सरकारनं त्यांना देशाचा सर्वोच्च पुरस्कार 'भारतरत्न' देऊन सन्मानित केलं.

वाजपेयींचा जन्मदिवस 'गुड गव्हर्नन्स डे' म्हणून साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि सरकारच्या पहिल्या बजेटमध्ये वाजपेयींच्या नावानं अनेक योजना सुरू करण्यात आल्या.

संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजप संसदीय दल आणि NDAचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर मोदी आपल्या भाषणादरम्यान भावनाविवश झाले होते.

"वाजपेयी इथे असते तर तो माझ्यासाठी सुवर्ण क्षण असता," असं मोदी म्हणाले. यानंतर मोदींच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. डोळ्यातल्या अश्रूंना पुसत त्यांनी पुन्हा एकदा वाजपेयींचं नाव घेतलं.

'मी निःशब्द आहे'

वाजपेयींचं पार्थिव शरीर त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर मोदी तिथे उपस्थित होते. ते वरून शांत वाटत असले तरी त्यांच्या आत मात्र चलबिचल जाणवत होती.

अटलजींना श्रद्धांजली वाहताना मोदी यांनी म्हटलं की, "मी निःशब्द आहे. मी शून्यात आहे. पण माझ्या भावना उचंबळून आल्या आहेत. आपल्या सर्वांचे प्रार्थनीय अटलजी आपल्याला सोडून गेलेत. आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण त्यांनी राष्ट्रासाठी समर्पित केला. त्यांचं निघून जाणं एका युगाचा अंत आहे."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

वाजपेयी यांचा वारसा मोदींशिवाय कुणीही मोठ्या प्रमाणावर पुढे घेऊन जाणार नाही, असं या दोघांच्या नात्याकडे पाहून प्रत्येकाला वाटेल.

वाजपेयींच्या मृत्यूच्या एका दिवसापूर्वीच 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून भाषण देताना मोदींनी अटलजींची आठवण काढली होती.

"काश्मीरप्रश्नी आम्ही अटलजींनी सांगितलेल्या मार्गावरून पुढे जाणार आहोत - इन्सानियत, जमुरियत, कश्मिरियत, हा मार्ग अवलंबवणार आहोत," असं मोदी म्हणाले होते.

कदाचित सर्वांचीही हीच अपेक्षा असेल.

(विजय त्रिवेदी यांनी वाजपेयींच्या जीवनावर आधारित 'हार नहीं मानूंगा - एक अटल जीवन गाथा' हे पुस्तक लिहिलं आहे. हार्पर कॉलिन्सनं हे पुस्तक प्रकाशित केलं आहे.)

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)