You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'उद्धव साहेब, स्मशानाच्या चारही बाजूंना बिल्डिंग आहेत, आता कुठे जायचं?'
गणपतीच्या काळात होणाऱ्या आवाजावर मर्यादा आणायला हव्यात, अशी मागणी करणारी याचिका करण्यात आली आहे. त्यावर, ध्वनीप्रदूषणाच्या नावाखाली न्यायालयात जाऊन गणेशोत्सवात 'विघ्न' आणणाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी फटकारलं आहे.
'गणेशोत्सव हा धूमधडाक्यातच साजरा केला जातो. ज्यांना उत्सव आवडत नसेल त्यांनी खुशाल दहा दिवस स्मशानात जाऊन बसावं,' असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
या पार्श्वभूमीवर वाचकांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीनं केला. त्यावर अनेकांनी आपली मतं नोंदवली. त्याचा घेतलेला हा संपादित आढावा.
शिवाजी भोसले म्हणतात, "मातोश्रीच्या आजूबाजूला 40 डॉल्बी सेट आणि 40 ढोल पथक लावावेत मग होणारा त्रास काय असतो तो उद्धव साहेबांना कळेल."
तर "मुस्लिम लोकांच्या अजानामुळे लोकांना त्रास होतो, म्हणून त्यांची लाऊडस्पिकर बंद करण्याची मागणी करणाऱ्यांनी गणेशोत्सवाच्या काळात ज्यांना त्रास होतो त्यांनी स्मशानात जाऊन राहावं, असा सल्ला देणं योग्य नाही, असं मत अमित इंदूरकर यांनी व्यक्त केलं आहे.
विद्या मोहिते यांनी उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्या म्हणतात, "आमच्या अंधेरीत स्मशानाच्या चारही बाजूंनी बिल्डिंग आणि शाळा आहे. आता आवाज झाल्यावर स्मशानात जाऊन उपयोग नाही."
"गणपतीत 10 दिवस स्पीकर लावले तर ध्वनीप्रदूषण आणि बाकीचे जेव्हा रोज वाजवतात तेव्हा ती काय श्रद्धा?," असा प्रश्न तुषार भालेराव यांनी विचारला आहे.
दरम्यान, सागर शिंदे, समीर चव्हाण, किरण धोत्रे, नागेश पाटील आदींनी आपण उद्धव ठाकरेंच्या मताशी सहमत असल्याचं म्हटलं आहे.
"बरोबर आहे. नाहीतर चंद्रावर जाऊन रहा, असं मत नागेश पाटील यांनी व्यक्त केलं आहे. तर राहुल पाटील यांनी शिवसेना आता अतिरेक करत असल्याचं म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)