दामोदर धर्मानंद कोसंबी : भारताच्या शास्त्रोक्त इतिहासाचे जनक

दामोदर धर्मानंद कोसंबी
    • Author, डी. एन. झा
    • Role, इतिहासकार

भारतीय इतिहास लेखनाला नवी दिशा देणाऱ्या दामोदर धर्मानंद कोसंबी यांचा आज (31 जुलै) जन्मदिन.

भारतीय इतिहासलेखनात ज्या लोकांनी अभूतपूर्व कार्य केलं आहे, त्यांच्या यादीत दामोदर धर्मानंद कोसंबी यांचं नाव अग्रक्रमानं घ्यायलं हवं. गणिताचं औपचारिक शिक्षण घेतलेल्या कोसंबी यांनी भारतीय इतिहास लेखनाला नवी दिशा दिली. त्यांचा आज जन्मदिवस त्यानिमित्तानं त्यांच्या कार्याचा घेतलेला हा आढावा.

दामोदर कोसंबी यांचे वडील धर्मानंद दामोदर कोसंबी हे भारतातलं नावाजलेलं नाव. बौद्ध तत्त्वज्ञ म्हणून त्यांची कीर्ती सर्वदूर होती. या ज्ञानी व्यक्तीला 31 जुलै 1907 रोजी गोव्यातील कोसबेनमध्ये मुलगा झाला.

त्यांनी आपल्या मुलाचं नाव आपल्या वडिलांच्या नावावरुनच ठेवलं आणि पुढे दामोदर कोसंबी अर्थात डी. डी. कोसंबी हे नाव भारताच्या प्रखर बुद्धिवान लोकांपैकी एक असं गणलं जाऊ लागलं. आपल्या वडिलांप्रमाणेच ते जिज्ञासू, अभ्यासू तर होतेच पण मानवतेसाठी झटण्याचा वसा त्यांनी त्यांच्यापासूनच घेतला होता.

अमेरिकेत शिक्षण

पुण्यात शालेय शिक्षण घेतल्यानंतर ते वडिलांसोबत अमेरिकेला गेले आणि केंब्रिज लॅटिन स्कूलमध्ये 1925पर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं. पदवीचं शिक्षण त्यांनी हार्वर्डमधून घेतलं.

हार्वर्डमध्ये असताना त्यांनी गणित, इतिहास आणि भाषांमध्ये रस घेतला. याच ठिकाणी ते ग्रीक, लॅटिन, जर्मन आणि फ्रेंच या भाषांमध्ये पारंगत झाले. हार्वर्डमध्ये असतानाच ते प्रसिद्ध गणितज्ञ जॉर्ज बर्कऑफ आणि नॉर्बर्ट विनर यांच्या संपर्कात आले.

1929ला भारतात परतल्यानंतर ते बनारस हिंदू विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक म्हणून रूजू झाले. त्यांची ख्याती सर्वदूर पसरल्यानंतर त्यांना अलीगढ मुस्लीम विद्यापीठाने गणिताचे प्राध्यापक म्हणून बोलावलं. त्या ठिकाणी ते वर्षभर होते.

1932मध्ये त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये नोकरी पत्करली. याच ठिकाणी धर्मानंद कोसंबी यांनी पाली भाषा शिकवली होती. फर्ग्युसनमध्ये त्यांनी 14 वर्षं नोकरी केली.

या काळात त्यांनी स्वतःला वेगवेगळ्या ज्ञानशाखांमध्ये सिद्ध केलं. आधुनिक भारतातील एक महत्त्वपूर्ण विचारवंत अशी त्यांची ओळख बनली.

1946 मध्ये ते टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या गणित विभागाचे प्रमुख बनले. 1962 पर्यंत ते या पदावर होते. या संस्थेमुळेच त्यांच्याच तोडीच्या जगभरातल्या तत्त्वज्ञ आणि अभ्यासकांच्या ते संपर्कात आले.

मुंबईतल्या टायफॉईडचा शास्त्रीय अभ्यास

त्यांच्या कारकीर्दीचा बहुतांश काळ त्यांनी गणितामध्ये विशेष प्राविण्य मिळवण्यात आणि अध्यापन करण्यात समर्पित केला. त्यांच्या या विषयातल्या योगदानाचं कौतुक ब्रिटिश वैज्ञानिक जे. डी. बर्नाल यांनी केलं. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे कोसंबी यांच्या विश्वशांती चळवळीतील योगदानाची प्रशंसा देखील त्यांनी तितक्याच आत्मीयतेनं केली होती.

त्यांच्या विज्ञान क्षेत्रातल्या योगदानावर भाष्य करण्याचा प्रस्तुत लेखकाचा तितका अधिकार नाही, पण तरीदेखील ही गोष्ट सांगणं क्रमप्राप्त आहे की त्यांनी विद्याशाखांच्या पारंपरिक सीमा तोडून जनुकीय शास्त्र, सांख्यिकी आणि इतर ज्ञानशाखांमध्ये समाजाभिमुख योगदान दिलं.

भारतात धरणं बांधण्यासाठी जागा कोणती निवडावी यासाठी कोणतीही वैज्ञानिक पद्धत अस्तित्वात नव्हती. या गोष्टीला त्यांनी विरोध केला इतकंच नाही तर संख्याशास्त्रावर आधारित पद्धतीनं जागा निवडण्यात यावी यासाठी त्यांनी आग्रह धरला.

याच प्रमाणे त्यांनी मुंबई भागात पावसाळ्यात टायफॉइडनं होणाऱ्या मृत्युचा अभ्यास केला. पावसाळ्याआधी तीन आठवडे टॉयफाइड रोखण्यास योग्य पावलं उचलली गेली तर केवळ मुंबईत वर्षाला किमान 500 जीव वाचतील असं त्यांनी त्यांच्या अभ्यासातून सिद्ध केलं होतं.

त्यावेळच्या मुंबई सरकारला त्यांनी शिफारस केली होती की नाणेघाटसाठी महागडा रोप-वे तयार करण्याऐवजी सर्व ऋतुंमध्ये उपयोगी येईल असा रस्ता बांधण्यात यावा.

धर्मानंद कोसंबी

फोटो स्रोत, dharmanandkosambi.com

कोसंबी हे हस्तीदंताच्या मनोऱ्यात बसून आपले विचार मांडणारे अभ्यासक नव्हते. जनसामान्यांच्या गरजा ओळखून त्यांच्या समस्या सोडवण्यावर त्यांचा भर असे. त्यामुळेच ते कुणाचीही भीड न बाळगता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर आपलं मत प्रदर्शित करत असत.

त्याचं एक उदाहरण म्हणजे भारतानं अमेरिकेसोबत अणुकरार करून आपलं सार्वभौमत्व गहाण ठेवण्याच्या 50 वर्षंआधी ते ठामपणे म्हणाले होते, 'फक्त आधुनिक दिसावं म्हणून अणुऊर्जेवर पैसे उधळणं हे भारतासारख्या गरीब देशाला न परवडण्यासारखं आहे.' त्याऐवजी भारतानं ऊर्जेचा दुसरा पर्याय म्हणून सौरऊर्जेवर भर द्यावा अशी भूमिका ते सातत्यानं मांडत होते.

नाणेशास्त्रातलं निराळं कार्य

कोसंबी यांना 'प्रबोधनकालीन वैविध्य' असलेली व्यक्ती असं म्हटलं जात असे. गणितातील अमूर्त कल्पनांचा वापर त्यांनी सामाजिक शास्त्रांमधल्या वेगवेगळ्या उपशाखांवर करून पाहिलं.

चिन्हांकित नाण्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी संख्याशास्त्राची पद्धत वापरली. त्यांनी त्या पद्धतीनं 12,000 नाण्यांचं वजन केलं होतं. त्यापैकी 7,000 नाणी ही आधुनिक होती. त्यांनी आधुनिक नाणेशास्त्राचा पाया भारतामध्ये रोवला.

त्यांच्या आधीच्या आणि नंतरच्या बहुतेक नाणेशास्त्र तज्ज्ञांपेक्षा त्यांचं कार्य निराळं होतं. त्यांनी नाणेशास्त्राला नाण्यांचा संग्रह करणाऱ्यांच्या तावडीतून सोडवलं.

नाण्यांचा वापर करून भारताचा सामाजिक आणि आर्थिक इतिहास समजून घेण्यात यावा यावर त्यांनी भर दिला. त्याच अनुषंगानं हे सांगावंसं वाटतं त्यांनीच प्रथम हे सांगितलं की गुप्त काळात नाण्यांचा तुटवडा पडला होता. या आधारावरून त्यांनी व्यापारातली घट आणि आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण खेड्यांचा संबंध उलगडून दाखवला.

कोसंबी यांनी प्राचीन नाण्यांच्या समूहांचा अभ्यास केला आणि त्यावर ते प्रश्न विचारत असत. ही नाणी कुणी काढली? पुराणं, बौद्ध आणि जैन ग्रंथांमध्ये त्यांना अनेक विसंगती आढळून आल्या. एकाच राजासाठी ते विविध नावं वापरत असत. त्यामुळे त्यांनी ठरवलं की आपण स्वतःच मूळ ग्रंथांचा अभ्यास करायचा. त्यासाठी संस्कृतवर प्रभुत्व मिळवणं आवश्यक होतं. ते म्हणत की 'मला संस्कृत शिकण्यासाठी फारसे कष्ट करावे लागले नाहीत.' ते संस्कृत, पाली आणि प्राकृत शिकले. संस्कृतचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच मिळाला होता.

संस्कृत साहित्यावर प्रक्षोभक वक्तव्य

संस्कृत साहित्य समीक्षेला त्यांनी मार्क्सवादी आर्थिक-सामाजिक तत्त्वनिष्ठांची जोड दिली. विज्ञानाप्रमाणेच वाङ्‍‍मयदेखील त्या काळात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या परिप्रेक्ष्यातून समजून घ्यायला हवं असं ते म्हणत.

ते म्हणत, समाजातल्या महान कवींनी फक्त महत्त्वपूर्ण वर्गाची स्थिती आणि आकांक्षा काय आहेत ते व्यक्त करू नये तर कलाकाराने आपल्या वर्गाचं बंधन तोडून पूर्णपणे व्यक्त व्हावं.

संस्कृत आणि साहित्यावर त्यांची जी वक्तव्य प्रक्षोभक म्हणून गाजली ती वर्गसंघर्षाशी संबंधित होती. याचं उदाहरण म्हणून आपण त्यांनी भातृहारी आणि विद्याकार यांच्या कार्यासंदर्भात जी विधानं केली आहेत ती पाहू शकतो.

ज्या प्रमाणे त्यांनी नाणेशास्त्र आणि साहित्याच्या विश्लेषणाचं महत्त्व पटवून दिलं. त्याचप्रमाणे त्यांना भारतीय इतिहासाच्या पुनर्मांडणीसाठी पुरातत्त्व विभागाचं महत्त्वदेखील पटलं होतं. त्यांनी या क्षेत्रात देखील महत्त्वपूर्ण योगदान दिलं.

पुणे जिल्ह्यातल्या पुरातत्त्वीय वैशिष्ट्य असलेल्या पाषाणांचा त्यांनी अभ्यास केला. त्याच बरोबर त्यांनी पुरातत्त्वीय वैशिष्ट्य असलेल्या छोट्या दगडांचा संग्रह केला.

त्यांच्या निरीक्षणाच्या आधारावर त्यांनी प्राचीन काळातील राहणीमान, दक्षिण आणि मध्य भारतातील प्रागैतिहासिक काळातील संबंध याची निरीक्षण मांडली.

धर्मानंद कोसंबी यांच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ

त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच प्राचीन काळातील व्यापारी रस्ते, कुडा येथील बौद्धकालीन गुहा आणि पुरातन शिलालेख सापडले. त्यांनी आपल्या पुस्तकात त्याबाबतची निरीक्षणं मांडली आहेत.

त्यांनी पुरातत्त्वांचा अभ्यास पन्नास वर्षांपूर्वी केला होता. त्यामुळे साहजिकच त्यांचे काही निष्कर्ष आता कालबाह्य, सदोष आणि आता मान्य करता न येण्याजोगे वाटत आहेत.

त्यांनी ऐतिहासिक भौतिकवादाचं ज्ञान आणि आंतरशाखीय विद्याभ्यासाची सांगड घातली. त्यांनी भारतीय इतिहास आणि संस्कृतीचा विविध अंगांनी अभ्यास करून संशोधन केलं. 1940 नंतर त्यांनी शंभरहून अधिक संशोधनात्मक लेख लिहिले.

पारंपरिक इतिहास लेखनाला छेद

त्यांच्या या लेखांचा संग्रह भारतीय इतिहासाचा अभ्यास (1956), पुराणकथा आणि वास्तव (1962), प्राचीन भारतातील संस्कृती आणि नागरी जीवन (1965) या तीन पुस्तकात आहे.

त्यांची शैली परिणामकारक होती, कधीकधी ती बोचरी देखील होती. त्या काळात इतिहासलेखन प्रामुख्यानं वसाहतवादी मानसिकतेमध्ये आणि भूतकाळातील राष्ट्रवादी उदात्तीकरणाच्या साच्यात अडकलेलं होतं.

त्यांचं कार्य हे दोन्ही बाजूंकडे झुकणारं नव्हतं. त्यांच्या कार्यामुळं भारतीय इतिहासलेखनातला साचलेपणा दूर झाला आणि ते प्रवाही बनलं.

त्यांनी भारतीय इतिहासाच्या संशोधनासाठी कार्ल मार्क्सवादी विचारसरणीचा वापर केला. "भौतिक साधनांतील स्थित्यंतराची आणि त्या साधनांचा तत्कालीन जनजीवनाशी असलेल्या नात्यांची क्रमवार मांडणी म्हणजे इतिहास," या त्यांच्या वाक्यावरून हे लक्षात येतं.

त्यांचं लिखाण हे पारंपरिक इतिहास लेखन पद्धतीला आणि मध्यमवर्गीय आश्रयदात्यांच्या मान्यतेला छेद देणारं होतं.

त्यांनी भारतीय इतिहास लेखनाला नवा आयाम दिला हे निर्विवाद आहे कारण त्यांच्या मृत्यूनंतर कित्येक वर्षांनी आपण त्याबाबत आज चर्चा करत आहोत.

भारताचा मध्यमवर्ग मात्र अधिक बळकट झाला आहे आणि पूर्वीपेक्षा तो अधिक संपन्न बनला आहे. इतिहास लेखनाच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला, पण त्याला साजेसा राजकीय बदल झाला नाही. संघ परिवाराच्या उदयानंतर प्रतिगामी, तीव्र राष्ट्रवाद आणि फाशीवादाला प्रोत्साहन देणारं सध्याच राजकीय वातावरण आहे.

(प्रा. डी. एन. झा यांच्या Against The Grain या पुस्तकातील लेखाचा संपादित अंश. )

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)