'मी मराठा आरक्षणासाठी नदीत उडी मारली कारण...'

फोटो स्रोत, BBC/Shrikant Bangale
- Author, श्रीकांत बंगाळे आणि अमेय पाठक
- Role, बीबीसी मराठी
मंगळवारी मराठा आंदोलनादरम्यान जयेंद्र द्वारकदास सोनवणे या तरुणानं वेळगंगा पुलावरून नदीच्या कोरड्या पात्रात उडी मारली होती. बीबीसी मराठीचे प्रतिनिधी श्रीकांत बंगाळे आणि अमेय पाठक यांनी या तरुणाशी बोलून एवढं टोकाचं पाऊल उचलण्यामागच्या भावना समजून घ्यायचा प्रयत्न केला.
औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयातील (घाटी) वार्ड क्रमांक 11.
वार्डमध्ये गेल्या गेल्या नजर पहिल्या खाटेकडे वळते. खाटेवर एका बाजूला टांगलेली पाटी खाटेवरच्या पेशंटची ओळख करून देते. जयेंद्र सोनवणे असं या पेशंटचं नाव.
जयेंद्र यांच्या खाटेजवळ पोहोचलो तोच पायातील प्लास्टर आणि हातातला सलाईन सावरत त्यांनी आमच्याशी बोलणं सुरू केलं.
"मराठा आरक्षण मिळावं म्हणून मंगळवारी आम्ही मोर्चा काढला होता. माझ्यासोबत गावातले 200 जण होते. आमचा मोर्चा गावातल्या नदीवर पोहोचला होता. आम्ही सगळे पुलावर ठाण मांडून बसलो होतो.
"तहसीलदार अथवा कलेक्टर यांनी यावं आणि पुढच्या 10 मिनिटांत आमचं निवेदन स्वीकारावं, अन्यथा मी नदीत उडी मारेन असं मी ठरवलं होतं. पण, तहसीलदार आणि कलेक्टर यापैकी कुणीही आलं नाही त्यामुळे मग मी नदीत उडी मारली," तुम्ही नदीत उडी का मारली यावर जयेंद्र सांगतात.

फोटो स्रोत, BBC/Shrikant Bangale
उडी मारताना जीव जाण्याची भीती नाही वाटली का, यावर जयेंद्र सांगतात, "भीती तर होती पण आमच्या समाजानं आतापर्यंत 58 मूकमोर्चे काढले. अख्ख्या देशात एवढ्या शांततेत कुणी मोर्चे काढले नसतील. पण, इतक्या दिवसात सरकारनं काय केलं? आता आमची पोरं जीव देताहेत तेव्हा सरकारला कळलं की आमच्यासाठी आरक्षण किती महत्त्वाचं आहे ते."
जीव देऊन प्रश्न सुटेल?
जीव न देता आरक्षणाचा प्रश्न सुटू शकेल, असं नाही वाटत का, यावर जयेंद्र सांगतात, "आता जीव न देता हा प्रश्न सुटू शकत नाही. इतक्या दिवसात कोणते प्रश्न सुटलेत? आरक्षण नसल्यानं आमच्या पोरांना नोकऱ्या लागत नाही, मार्क पडूनही चांगल्या कॉलेजात अॅडमिशन घ्यायला लाखो रुपये भरावे लागतात."
"समाजासाठी मी योग्यच पाऊल उचललं आहे आणि या गोष्टीचा मला काहीही पश्चाताप नाही," नदीत उडी मारल्याचा पश्चात्ताप होतो का यावर जयेंद्र सांगतात.
'गरीब लोकायला आरक्षण मिळालं तर...'

फोटो स्रोत, BBC/Shrikant Bangale
जयेंद्र यांच्या शेजारी त्यांची आई नंदाबाई सोनवणे बसलेल्या होत्या. त्या दिवशीच्या घटनाक्रमाबद्दल विचारल्यावर त्या सांगतात, "आम्हाला वाटलं नव्हतं पोरगं असं काही करेल. मी स्वयंपाक करत होते तेव्हा माझ्या कानावर हे सगळं आलं आणि आम्ही दोघे नवरा-बायको दवाखान्याकडे पळालो. देवगाव रंगारीच्या सरकारी दवाखान्यात त्याला भरती केलेलं होतं. तिथं गोळ्या-इंजेक्शन देऊन नंतर घाटीत भरती केलं."
"2 एकरावर आमच्या 6 जणाचं घर चालतं. पावसाचा काही भरवसा नाही. त्यामुळे मिळेल ती मजुरी करावी लागते. गरीब लोकायला आरक्षण मिळालं तर पोरायला नोकऱ्या लागतील, शाळा शिकवायला पैसे कमी लागतील," नंदाबाई पुढे सांगतात.

फोटो स्रोत, BBC/Shrikant Bangale
त्यांनतर आम्ही जयेंद्र यांच्या खाटेजवळ उभा असलेला त्यांचा भाऊ प्रदीप सोनवणे (वय 25 वर्षं) याच्याशी बोललो.
"घरच्या गरीब परिस्थितीमुळे12वी नंतर मला डीएड करावं लागलं. त्यानंतर बीएससी केली. पण हातात काय पडलं तर काहीच नाही. शिक्षण होऊन पण रिकामं फिरावं लागतंय," प्रदीप त्याच्या भावना व्यक्त करतो.
'... तर आज नोकरी असती'
"मराठ्यांना आरक्षण असतं तर मला चांगल्या ठिकाणी अॅडमिशन घेता आली असती आणि आज मी नोकरीला असतो," प्रदीप पुढे सांगतो.
आमची परिस्थिती पाहून सरकारनं आम्हाला मदत करायला हवी, प्रदीप त्याची इच्छा व्यक्त करतो.
दरम्यान, 30 वर्षीय अविवाहित जयेंद्र सोनवणे यांच्यावर औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचा एक पाय फ्रॅक्चर झाला असून पाठीवर जबर मार बसलेला आहे.
इतक्या टोकाचं पाऊल का?
मराठा समाजातील तरुण आरक्षणासाठी जीव देण्यासारखं टोकाचं पाऊल का उचलत आहेत, हे जाणून घेण्याकरता आम्ही सकाळच्या मराठवाडा आवृत्तीचे कार्यकारी संपादक संजय वरकड यांना भेटलो.

फोटो स्रोत, BBC/Shrikant Bngale
"मराठा समाजातील एक मोठा गट खेड्यापाड्यांत राहतो. त्यांच्याकडे ना शेती आहे ना नोकऱ्या आहेत. त्यांच्याकडे कुणी लक्ष द्यायलाही तयार नाही. शिवाय ज्या सधन मराठ्यांनी गावं सोडली त्यांनी नंतर गावाकडे फिरून बघितलं नाही. ते शहरातच रममाण राहिले. त्यामुळे आता आपल्याला कुणी वाली नाही असं ग्रामीण भागातल्या मराठा तरुणांना वाटतं," वरकड सांगण्यास सुरुवात करतात.
"मराठवाडयातील जवळपास 90 टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. यात मराठा शेतकरी सर्वाधिक आहे. मराठा समाज प्रतिष्ठेबद्दल विचार करतो. कुणी लक्ष देत नाही म्हटल्यावर प्रतिष्ठेला धक्का पोहोचू शकतो आणि माणसं निराश होऊन हिंसक होऊ शकतात.
मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत तेच मराठा शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आणि त्यांना तसंच समजून सोडवायला पाहिजे. सामाजिक अंगानं विचार करून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायला हवा," मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याबद्दल वरकड सांगतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








