बुराडी प्रकरण : 'आत्म्यांशी बोलणं ही सिद्धी नाही, मानसिक आजार आहे'

फोटो स्रोत, Getty Images
- Author, डॉ. हमीद दाभोलकर
- Role, अंनिस कार्यकर्ता
दिल्लीमधल्या बुराडी भागात भाटिया कुटुंबातील 11 व्यक्तींच्या संशयास्पद मृत्यूने गेल्या आठवड्यात राजधानी हादरली. रात्रीपर्यंत वरवर सगळे व्यवस्थित चालेल्या कुटुंबातील वृध्द कुटुंबप्रमुखांच्या पासून ते लहान मुलांपर्यंत, तीन पिढ्यांतील स्त्री आणि पुरुष सकाळी फाशी घेतलेल्या स्थितीत आढळून आले.
यामधील एका तरुण मुलीचं तर पुढच्या महिन्यात लग्न देखील होणार होते. आतापर्यंतच्या पोलीस तपासात पुढे आलेल्या गोष्टी ध्यानात घेता बाहेरून कुणी येऊन हे कृत्य केल्याची शक्यता अत्यंत कमी आहे. मोक्ष मिळवण्याच्या भ्रामक कल्पनेला बळी पडून कुटुंबातील लोकांनी केलेल्या अघोरी साधनेच्या प्रकारातून या आत्महत्या घडवल्याचं दिसत आहे.
भाटिया कुटुंबातील ललित हा मुलगा हा जास्त प्रमाणात अध्यात्मिक गोष्टींच्या विषयी रस घ्यायचा आणि त्याच्या डायरीमध्ये मोक्ष मिळवणे, मृत्यूपश्चातचं आयुष्य, अघोरी साधनेसाठी करायची तयारी, अशा अनेक गोष्टींचे संदर्भ मिळतात.
ज्या स्टूलवर उभे राहून हे गळफास घेतले गेले, ते स्टूल शेजारच्या कुटुंबाकडून घरी आणताना या कुटुंबातील व्यक्ती CCTVमध्ये कैद झाली आहे.
सकृत् दर्शनी नॉर्मल दिसणारी माणसं इतक्या टोकाची कृती कशी काय करू शकतात, एकाच वेळी कुटुंबातील सर्वच्या सर्व अकरा लोक आत्महत्येसारखं कृत्य कसं करू शकतात, असं कोडं आपल्यातील अनेक जणांना पडलं असेल. म्हणून या मागची मानसिक आणि अंधश्रद्धेच्या बाजूने जाणारी करणं जरा समजून घेऊया.
त्यातलं पहिले कारण म्हणजे, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपापल्या दैनंदिन आयुष्यापेक्षा मृत्यूनंतरच्या आयुष्याला खूप जास्त महत्त्व आहे. यामधूनच आत्मा, पुनर्जन्म, प्लँचेट करून मृत आत्म्यांशी बोलणं, या पूर्णत: अवैज्ञानिक गोष्टींवर विश्वास ठेवणारे लोक आपल्याला आजूबाजूला आढळतात.
असा विश्वास ठेवणाऱ्यांमध्येही विविध प्रकार असतात. काही जण केवळ मृत्यूच्या भीतीतून सावरण्यासाठी भावनिक आधार म्हणून पुनर्जन्माच्या संकल्पनेवर विश्वास ठेवतात. जरी आत्मा-पुनर्जन्म या कल्पना त्यांच्या मनात असल्या, तरी आपल्या दैनंदिन आयुष्यात ते त्या कल्पनांना धरून फारशी कृती करत नसतात.
पण समाजातील काही माणसांमध्ये दैनंदिन जगण्याचं वास्तव आणि या कल्पनांमधील फरक समजून येण्याची क्षमता कमी होते. ती माणसं मात्र या कल्पनांच्या आहारी जाऊन दैनंदिन आयुष्यातील प्रश्न सोडवण्यासाठी याच गोष्टींचा आधार घेऊ लागतात.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील अडचणी या मृत आत्म्याच्या प्रभावातून होतात, असं मानणं; काही चांगलं घडावं म्हणून त्यांची पूजा करणं; त्यासाठी अघोरी विधी करणं, तांत्रिकांचा आधार घेणे अशा गोष्टी देखील हे लोक करताना दिसतात. कुटुंबातील एखाद्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू आर्थिक अथवा कौटुंबिक मतभेदातून झाला तर असं वर्तन वाढू शकतं.
भाटीया कुटुंबाच्या बाबतीत देखील असंच झाल्याची शक्यता जास्त वाटते. 2008 साली ललित भाटियांच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा अध्यात्मिक कल वाढला, असं सांगितलं जातं. त्यांच्या साधनेदरम्यान त्यांच्या वडिलांचा आत्मा त्यांच्याशी बोलायची, त्यांच्या आत्म्याच्या सांगण्यावरूनच ललित काही गोष्टी करायचे, अशी माहिती पुढे येत आहे.
मेलेल्यांशी बोलणं हा मानसिक आजार
मानसशास्त्राच्या भाषेत अशा स्वरूपाचे आवाज ऐकू येणं अथवा मृत व्यक्ती जिवंत असल्याचे भ्रम तयार होणं, हे तीव्र स्वरूपाच्या मानसिक आजाराचे (Psychosis) लक्षण मानलं जातं. यामध्ये त्या व्यक्तीचा वास्तवाशी असलेला संबंध कमी होऊन भासांच्या दुनियेतील गोष्टींवर अधिक विश्वास बसू लागतो. त्या व्यक्तीची कृतीदेखील तशीच होऊ लागते.

फोटो स्रोत, Inpho
त्यांच्या भावविश्वातील भास आणि भ्रमांच्या पलीकडची या व्यक्तींची वर्तणूक अगदी नॉर्मल माणसासारखी असते. त्यांच्या मनाचा केवळ एकच भाग आजारी पडल्यामुळे दुरून बघणाऱ्या व्यक्तीला ही लक्षणं ध्यानात येत नाहीत.
जर त्यांच्या लक्षणाची भाषा ही अध्यात्मिक स्वरूपाची असेल, तर अनेकदा अशा लोकांना समाज 'काही अतींद्रिय अनुभव येणारी सिद्ध व्यक्ती' म्हणून पाहू लागतो.
मानसशास्त्र आणि अध्यात्म यांच्या दोन्ही विषयीच्या टोकाच्या अज्ञानातून ही परिस्थिती उद्भवते.
अशा व्यक्ती कुटुंबातील बाकीच्या लोकांवर प्रभाव टाकू शकतात. यामध्ये त्या व्यक्तीच्या भास आणि भ्रमांची व्याप्ती वाढून कुटुंबातील इतर व्यक्तींना देखील त्या गोष्टी खऱ्या वाटू लागतात. मनोविकाराच्या भाषेत याला shared psychosis असं म्हणतात. अशा भास-भ्रमाच्या कल्पनांनी कुटुंबाच्या कुटुंब प्रभावित झालेली प्रकरणं मनोविकारतज्ज्ञ बघत असतात.
जगभरात असे प्रकार घडतात
मुंबईत काही वर्षांपूर्वी असंच एक हत्याकांड झाल्याचे बऱ्याच जणांना आठवत असेल. भारताबाहेर देखील अशी प्रकारणं झाली आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड अशा विविध देशांमध्ये अशा घटना घडल्या आहेत.
मेलबोर्नमधील पाच जणांचं कुटुंब आपल्याला कुणी तरी जीवे मारणार आहे, अशा स्वरूपाचं भ्रम झाल्याने दुसऱ्या प्रांतात पळून गेल्याची नोंद आहे. 2011 साली तर shared psychosis या विषयावर अपार्ट (Apart) नावाचा सिनेमा देखील आला होता. आपल्याला कुणीतरी ठार मारणार आहे, या भ्रमाने या सिनेमातलं दांपत्य ग्रासलेलं असतं.

फोटो स्रोत, Getty Images
भाटिया कुटुंबाच्या बाबतीत वरील गोष्टी घडल्याची शक्यता सगळ्यांत जास्त आहे. पण shared psychosis मधून कुठल्याही कुटुंबातील इतक्या लोकांनी आत्महत्या केल्याची ही पहिलीच घटना असेल.
काही वेळा या स्वरूपाचे टोकाचे विचार मानणाऱ्या लोकांचे गट (cult) तयार होतात. डॉ. दाभोलकर आणि पानसरे यांच्या खुनाच्या प्रकरणात ज्या संस्थांचे लोक पकडले गेले आहेत, अशा काही संस्था देखील अशाच प्रकारचे गट म्हणून काम करतात. या गटांमध्ये पारलौकिक कल्याणाला दैनंदिन आयुष्यापेक्षा अधिक महत्त्व दिलं जातं.
पाताळातील अघोरी शक्ती, भूत, राक्षस अशा गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनावर प्रभाव टाकतात, असं ही मंडळी मानतात आणि त्यांचा परिणाम कमी व्हावा म्हणून कर्मकांडं देखील करतात.
कलकत्यात पूर्वी अस्तित्वात असलेला 'आनंदमार्गी' हा cult किंवा जपानमधील 'ओम शिन्रिक्यो' नावाचा पंथ हे या प्रकारात मोडतात. ओम शिन्रिक्यो पंथांच्या लोकांनी तर अशाच विचारांच्या प्रभावाखाली टोकियोमध्ये सिरीन विषारी वायूने हल्ला केला होता.
आम्ही 'अंतिम सत्य' शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, असा त्यांचा दावा होता. जपान सरकारने त्यांना दहशतवादी संघटना घोषित करत त्यांच्या मुसक्या आवळल्या.
स्वर्ग नको सुरलोक नको...
दिल्लीतील बुराडीमधल्या घटनेसारखे प्रसंग टाळायचे असतील तर आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील.

फोटो स्रोत, AFP
सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे, ज्यांना वैज्ञानिक आधार नाही, अशा पुनर्जन्म, आत्मा, परमात्मासारख्या संकल्पनांची चिकित्सा करायला हवी. मनोरंजन अथवा गोष्टी म्हणून या गोष्टी चर्चिल्या जाणं एकवेळ आपण समजू शकतो, पण त्या गोष्टींवर आपण आपल्या आयुष्यातील निर्णय घेऊ शकणं, हे अत्यंत धोकादायक आहे, हे आपण समजून घ्यायला पाहिजे.
प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अडचणी येत असतात आणि आपण स्वत:च्या बुद्धीचा वापर करून, मित्र मंडळींची मदत घेऊन त्या सोडवू शकतो. त्यासाठी अघोरी गोष्टींची गरज नाही, हे आपण समजून घ्यायला पाहिजे.
भाटिया कुटुंबातील एकाही व्यक्तीला स्वत:च्या तोंडाला आणि डोळ्याला पट्टी लावून मानेला फास लावला तर काय होऊ शकतं, याचा विचार आला नसावा, यावरूनच चिकित्सक मनोवृत्ती या समाजात रुजवण्यासाठी किती प्रयत्न करायची गरज आहे, हे लक्षात येते. आंधळेणाने लोक जेव्हा गोष्टी मान्य करू लागतात, तेव्हा अशा गोष्टी समाजाच्या सर्व स्तरांच्या मध्ये घडू लागतात.
मानसिक आरोग्याविषयी आपल्या समाजात असलेलं अज्ञान दूर करणं, हे देखील अशा गोष्टी टाळण्यासाठी आवश्यक आहे. सर्व प्रकारच्या मानसिक आरोग्याच्या प्रश्नांकडे कलंकाच्या नजरेतून बघितल्यामुळे मानसिक अवस्थासाठी आपल्याकडे मदत घेणं टाळलं जातं.
योग्य वेळी मानसतज्ज्ञांची मदत घेतली, तर बुराडीसारख्या घटना टाळता येऊ शकतात. समाजातील अधिकाधिक लोकांना मानसिक आरोग्याविषयी प्रथमोपचाराची माहिती देऊन 'मानस मित्र' म्हणून प्रशिक्षण देण्याचा उपक्रम महाराष्ट्र अंनिस चालवते. असे अनेक मानस मित्र-मैत्रिणी समाजात तयार व्हायला हवेत.
बा.भ. बोरकर म्हणतात त्या प्रमाणे...
स्वर्ग नको सुरलोक नको मज लोभस हा इहलोक हवा
तृप्ती नको मज मुक्ती नको पण येथील हर्ष नि शोक हवा
(डॉ. हमीद दाभोलकर पेशाने मानसोपचारतज्ज्ञ असून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य आहेत. लेखातील विचार त्यांचे वैयक्तिक विचार आहेत.)
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








