टंकचित्रकार : टाईपरायटरच्या बटणांमधून चित्र साकारणारे भिडे काका

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : 'भिडे म्हणजे टाईपरायटर, टाईपरायटर म्हणजे भिडे'
    • Author, राहुल रणसुभे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

टाईपरायटरचा जमाना गेला हे खरं. कुठल्याही ऑफिसचा अविभाज्य असलेल्या टाईपरायटरचा खडखट आवाजातून रुक्ष कागदाच्या भेंडोळ्यांऐवजी सुबक चित्र साकारली तर? तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. मात्र हे शक्य करून दाखवलंय मुंबईच्या दादर इथल्या एका बँकेतील कर्मचाऱ्याने.

याच टाईपरायटरने खेळाडूं, कलाकारांची चित्रं काढण्याचं तंत्र या कलाकारानं आत्मसात केलंय. "भिडे म्हणजे टाईपरायटर, टाईपरायटर म्हणजे भिडे. या टाईपरायटरला मी जेव्हा जेव्हा स्पर्श करतो, हात लावतो त्यावेळी मला कळतं की, मला जे काही दिलंय त्याचं क्रेडीट त्यालाच आहे", अशा शब्दात चंद्रकांत भिडे त्यांची ओळख करून देतात.

मुळातच चांगले चित्रकार असलेले चंद्रकांत भिडे यांना दहावीनंतर चित्रकलेत करिअर करायचं होतं. पण ते शक्य होऊ शकलं नाही.

ते याविषयी सांगतात, "माझी चित्रकला चांगली होती. 1963 साली जेव्हा मी एसएससी पास झालो, त्यावेळी आमची आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नसल्यामुळे मी काही जेजे स्कूल ऑफ आर्ट्सला जाऊ शकलो नाही. पण मला वडील म्हणाले की, जर तू स्टेनोग्राफी-टायपिंग शिकलास तर तुला नोकरी पण लगेच मिळेल आणि मलासुद्धा तुझी मदत होईल."

वडिलांच्या इच्छेप्रमाणे ते युनियन बँकेत रुजू झाले. मात्र त्यांच्या आतील कलाकार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यांना तिथे एक संधी मिळाली आणि त्यांचा चित्रकलेचा प्रवास सुरू झाला. तो क्षण अजूनही त्यांच्या मनात अगदी ताजा आहे.

चित्रं

फोटो स्रोत, RAHUL RANSUBHE/BBC

ते म्हणाले, "एक दिवशी आमच्या साहेबांनी मला सांगितलं की, चंद्रकांत तुला जेव्हा वेळ मिळेल, त्यावेळी मला इंटरकॉमची लिस्ट टाईप करून दे. मी ती इंटरकॉमची लिस्ट टेलिफोनच्या आकारातच टाईप केली. ती सगळ्यांना खूप आवडली. तेव्हा माझ्या मनामध्ये आलं की, आपल्याला जे जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये जाऊन कर्मशियल आर्टिस्ट व्हायचं होतं ते या टाईपरायटरच्या माध्यमातून आपल्याला होता येईल. त्या प्रमाणे मी चित्रं काढायला सुरुवात केली."

प्रवास आजतागायत सुरू

तिथून सुरू झालेला हा प्रवास तो आजतागायत सुरू आहे. पुढे त्यांनी नामवंत कलाकार, खेळाडूंची पोर्ट्रेट काढण्यास सुरूवात केली.

चंद्रकांत भिडे

फोटो स्रोत, RAHUL RANSUBHE/BBC

फोटो कॅप्शन, चंद्रकांत भिडे

आर. के. लक्ष्मण यांचं चित्र काढल्यानंतरचा एक किस्सा ते आवर्जून सांगतात, "एक दिवस मी आर. के. लक्ष्मण यांचा कॉमन मॅन टाईपरायटरवर काढला. मग मी टाईम्स ऑफ इंडियात गेलो आणि लक्ष्मण यांना सांगितलं, मी तुमचा कॉमन मॅन टाईपरायटरवर काढला आहे. तो मी तुम्हाला दाखवायला आणला आहे. ते म्हणाले ये, मला बघू दे. त्यांनी ते चित्र बघितलं आणि त्यावर त्यांनी सुंदर रिमार्क लिहिला. ते म्हणाले की, Fantastic! Even with pen and brush the result couldn't have been better.

मारिओ मिरांडा आणि दिलीप कुमार यांची चित्रे

फोटो स्रोत, RAHUL RANSUBHE/BBC

फोटो कॅप्शन, मारिओ मिरांडा आणि दिलीप कुमार यांची चित्रे

त्यांच्या या चित्रांचं प्रदर्शन भरवण्याची कल्पना प्रसिद्ध चित्रकार मारिओ मिरांडा यांच्याकडून मिळाल्याचं ते सांगतात. मारिओ यांची गोडबोले, बॉस आणि मिस फोनसेका अशी फेमस कॅरॅक्टर टाईपरायटरवर काढल्यानंतर ते मारिओंना दाखवायला घेऊन गेले. त्या दिवसाबद्दल सांगताना भिडे म्हणतात, "त्या तिन्ही चित्रांवर त्यांनी सुंदर असे रिमार्क लिहिले. सोबतच तुम्ही या चित्रांचं प्रदर्शन भरवा. मी त्या प्रदर्शनाचं उद्घाटन करेन असंही सांगितलं."

आतापर्यंत 120 पेक्षा जास्त चित्रं आणि 12 प्रदर्शनं

त्यानंतर भिडे यांनी या चित्रांची प्रदर्शनं भरवण्यास सुरुवात केली. आतापर्यंत त्यांनी 120 पेक्षा जास्त चित्र काढली असून या चित्रांची 12 प्रदर्शनं झाली आहेत.

ही चित्रं काढताना आलेल्या अडचणींबद्दल सांगताना भिडे एका चित्राचा आवर्जून उल्लेख करतात - तो म्हणजे सचिन तेंडुलकरच्या चित्राचा.

ते सांगतात, "सचिन तेंडुलकरचं चित्र काढताना मला अडचण आली होती. सचिनचे केस काढायचे होते तेव्हा म्हटलं अरे बाप रे! याचे कुरळे केस काही टाईपरायटरवर जमणं शक्य नाही. म्हणून मी टाईपरायटरची बटनं बघत बसलो, तर तिकडे मला @ हे बटन दिसले. हे @ एकात एक घुसवून सचिनचे कुरळे केस केले. नंतर एक दिवस मी वानखेडे स्टेडियमवर गेलो होतो. मग सचिनला मी ते चित्र दाखवलं, त्यांनी त्यावर सही करून दिली."

चित्रं

फोटो स्रोत, RAHUL RANSUBHE/BBC

या टाईपरायटरवर भिडे यांना नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रंप आणि राणी एलिझाबेथ यांची चित्रं काढण्याची इच्छा आहे. त्यांच्या आयुष्यातील टाईपरायटरच्या असलेल्या स्थानाबद्दल ते सांगतात की, "टाईपरायटरने मला रोजीरोटी दिलीच. त्यासोबत त्याने सांगितलं तुला फेमसही करतो," हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरच आनंद लपत नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता)