घरगुती कचऱ्यातून त्यांनी गच्चीतच फुलवली बाग
- Author, राहुल रणसुभे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
मुंबई, पुणे, औरंगाबाद अशा मोठ्या शहरांमध्ये कचऱ्याची समस्या भीषण बनली आहे. यावर काय उपाय शोधावा हा सर्वांसमोर मोठा प्रश्न आहे. घरच्या घरी कचऱ्याची विल्हेवाट लावून त्यातून सुंदर बाग फुलवण्याचा सुंदर उपाय कल्याणमधील श्रीनिवास घाणेकर यांनी शोधला आहे.
घाणेकरांकडे एक मिश्रण आहे. जे जैविक कचऱ्यावर फवारलं असता, १५ दिवसांत त्या जैविक कचऱ्याचं विघटन होऊन केवळ २० टक्के काडीकचरा शिल्लक राहतो. त्यांनी या प्रयोगाचं प्रात्यक्षिक करण्यासाठी आपल्या बिल्डिंगच्या टेरेसवर बाग फुलवली आहे.
याबद्दल घाणेकर सांगतात, "नर्सरीमधून आणलेल्या रोपट्यासोबत प्लॅस्टिकच्या पिशवीत जेवढी माती येते, तेवढीच आम्ही रोपाच्या आधारासाठी वापरतो आणि कुंडीमध्ये जेव्हा झाडं लावतो तेव्हा त्याची संपूर्ण लागवड ही काडीकचऱ्यामध्ये केली जाते."
आश्चर्य म्हणजे आता त्या बगिच्यातील रोपट्यांना आता छान फुलंसुद्धा येऊ लागली आहेत.
श्रीनिवास घाणेकर हे मिश्रण कसं बनवायचं याचं प्रात्यक्षिक लोकांना मोफत दाखवतात. तसंच ज्यांना हे मिश्रण हवं आहे ते त्यांना मोफत देतात. यासाठी त्यांनी त्यांच्या बिल्डिंगच्या टेरेसवर एक प्रयोगशाळा सुरू केली आहे.
कचऱ्याची सुपीक माती कशी बनते?
'नॅशनल सेंटर ऑफ ऑरगॅनिक फार्मिंग, गाझियाबाद' या संस्थेने देशी गायींच्या शेणापासून वेगळं केलेलं तीन बॅक्टेरियांचं एक कल्चर बनवलं आहे. त्याचं नाव आहे वेस्ट डिकंपोजर.

दोनशे लीटर पाण्यात दोन किलो गूळ टाकायचा. यानंतर हे वेस्ट डिकंपोजरचं कल्चर यात मिसळायचं. हे सर्व मिश्रण एकजीव होण्यासाठी सलग पाच दिवस दोन वेळा हे मिश्रण ढवळायचं. यामुळे एक चांगलं मिश्रण तयार होईल. यानंतर हे मिश्रण कोणत्याही जैविक कचऱ्यावर फवारण्यासाठी तयार असेल.
विशेष म्हणजे एकदा हे मिश्रण बनवल्यानंतर तुम्हाला पुन्हा वेस्ट डिकंपोजरच्या बाटलीची आवश्यकता भासत नाही, असं घाणेकर सांगतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









