ग्राउंड रिपोर्ट : पश्चिम बंगालमधल्या 'हिंसा', 'मृत्यू' आणि 'दहशती'ची कहाणी

    • Author, विनीत खरे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, पुरुलिया, पश्चिम बंगालहून

कोलकतामध्ये जोरदार पाऊस सुरू होता. रस्त्यावर सगळीकडे चिखल साचलेल्या एका गल्लीत आम्ही विकास कुमारची वाट पाहात होतो.

विकासचं खरं नाव दुसरंच काहीतरी आहे. तृणमूल काँग्रेसच्या काउन्सिलरच्या निवडणुकीदरम्यान गोळी चालवणं, अनधिकृतरित्या वसुली करणं, लोकांना धमकावणं आणि मारहाण करणं ही कामं अनेक वर्षं केल्याचं ते सांगतात.

याबदल्यात त्यांना कच्चा माल जास्त किमतीला विकण्याची सूट होती. यातून महिन्याकाठी विकास तीन ते साडे तीन लाख रुपये कमावत असत. बिल्डर लोकांना त्यांच्याकडूनच कच्चा माल खरेदी करावा लागायचा, अन्यथा त्यांची खैर नसे.

या राजकीय आणि आर्थिक रॅकेटला पश्चिम बंगालमध्ये 'सिंडिकेट' म्हटलं जातं. यातून येणाऱ्या कमाईचा भाग खालपासून वरपर्यंत जातो.

विकास यांच्यासारखे युवक पश्चिम बंगालमधल्या राजकीय हिंसाचाराचे जमिनीवरील सूत्रधार आहेत. "आमच्यासारखे युवक पूर्वी सत्ताधारी असलेल्या डाव्या संघटनांसाठी काम करत असत", विकास सांगतात. सत्ता बदलली तशी विकास यांच्यासारख्या युवकांची निष्ठाही बदलली.

भेट होण्यापूर्वी जेव्हा आम्ही फोनवर बोललो तेव्हा विकास यांच्या आवाजात भीती होती. मुलाखतीविषयी कुणाला कळेल की काय याची त्यांना भीती वाटत होती. कोलकात्याच्या बाहेर पुरुलिया, बीरभूम इथे लोकांनी मला या 'भीती'विषयी सांगितलं होतं.

रवींद्रनाथ टागोर यांच्याशी जोडलेल्या शांती निकेतनमधल्या एका राजकीय कार्यकर्त्याशी आम्ही संपर्क साधायचा प्रयत्न केला. "लोकांना या भेटीविषयी माहिती झालं तर माझ्या संपूर्ण कुटुंबाला ठार करण्यात येईल," असं त्यांचं उत्तर होतं.

राजकारणावर बोलताना लोक का घाबरतात?

बीरभूम जिल्ह्यातल्या शांती निकेतनमधल्या एका प्राध्यापकानं हळू आवाजात मला सांगितलं, "भीती जणू आमच्या रक्तात भिनली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी लोकांना धमकी दिली की, मत न दिल्यास तुमच्या आई-बहिणींवर बलात्कार केला जाईल. आजकाल आम्ही राजकारणावर बोलतो तेव्हा अगोदर मागे वळून पाहतो की कुणी ऐकत तर नाही ना? माझा तर कोणत्याही पक्षाशी काही संबंध नाही. तरीसुद्धा मला भीती वाटतेय."

"मे महिन्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जवळजवळ 30 % जागांवर विरोधी पक्षांनी उमेदवार उभे केले नव्हते आणि टीएममीच्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देण्यात आलं होतं. हे सर्व टीएमसीच्या दहशतीमुळे झालं," असं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे.

टीएमसीच्या उमेदवारांनी आमच्या उमेदवारांना हिंसेची भीती घालून त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून रोखलं होतं, असा टीएमसीच्या विरोधकांनी आरोप केला होता. बीरभूमच्या देबुराम अनायपुर या गावात आम्हाला भाजपचे उमेदवार देबब्रत भट्टाचार्य भेटले. "टीएमसीच्या समर्थकांनी मला एका पोलीस स्टेशनमध्ये घुसून इतकं मारलं की त्यानंतर मला दवाखान्यात भरती व्हावं लागलं," असं ते सांगतात.

त्यांनी स्थानिक टीएमसी नेता गदाधर हाजरा यांचं नाव घेतलं. पण हाजरा यांनी त्यांचे आरोप फेटाळत, बंगालचे लोक टीएमसीशिवाय इतर कोणालाही मत देऊ इच्छित नाही, असं सांगितलं.

"इथे सीपीएम, काँग्रेस आणि भाजप अशा सर्व पक्षांचे नेते आहेत. पण कुणापाशीही गावपातळीवर कार्यकर्ते नाहीत. आम्ही साडे सात वर्षांत जेवढा विकस इथे केला तेवढा सीपीएमच्या 35 वर्षांच्या कार्यकाळात झाला नाही. कुणाला निवडणूक लढवायची असेल तर आम्ही तुमची मदत करू असंही आम्ही विरोधी पक्षांना सांगितलं. पण कुणीच समोर आलं नाही. आमच्याविरोधात निवडणूक लढवण्यासाठी आम्ही लोकांवर दबाव टाकू शकत नाही," हाजरा पुढे सांगतात.

धमकावल्याचा आरोप खोटा

केश्टो या नावानं ओळखले जाणारे टीएमसी नेते अनुब्रत मंडल यांना मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांचे निकटवर्तीय म्हणून संबोधलं जातं. बीरभूम टीमसीचे ते जिल्हा प्रमुख आहेत.

बीरभूममध्ये कार्यकर्ते बलात्कार करण्याची धमकी देतात, या आरोपावर बोलताना त्यांनी बीबीसीला सांगितलं की, "असं काही होत नाही. हे सगळं खोट आहे. तुम्ही बीरभूम आणि घरांना भेटी द्या. तुम्हाला असं काहीही ऐकायला मिळणार नाही. असं कुणी म्हणत असेल तर मी राजकारण सोडून देईन."

"बीरभूम जिल्ह्यात विधानसभेचे 11 मतदारसंघ आहेत आणि इथे कधीच हिंसाचार झालेला नाही. सर्व लोक शांततेनं राहतात. हिंसेच्या ज्या काही छोट्या घटना घडल्या त्याला भाजप जबाबदार आहे कारण सीपीआय (M)चे सर्व चोर आणि गुंडे भाजपमध्ये सामील झाले आहेत," ते पुढे सांगतात.

भारतातल्या इतर ठिकाणी जाती आणि धर्माशी संबंधित बाबींमुळे हिंसाचार होतो. पण पश्चिम बंगालमध्ये लोकांचं अस्तित्व राजकीय पक्षांवर अवलंबून आहे. खरं तर प्रत्येक सेवेची एक किंमत असते पण राजकीय पक्षाशी असलेल्या संबंधामुळे प्रत्येक काम आरामात होतं आणि ही परंपरा जुनी आहे.

काही सहकाऱ्यांसोबत झालेल्या मारहाणीमुळे विकास यांनी जुना मार्ग सोडून दिला.

खूप वेळ वाट पाहिल्यानंतर 20 वर्षीय विकास आमच्या गाडीजवळ पोहोचले.

कशाप्रकारे भीती घातली जाते?

पावसामुळे विकास यांचे केस कपाळाला चिकटले होते. भिजलेल्या चेहऱ्यावर अनिश्चिततेचे भाव होते. टी-शर्ट, जिन्स आणि स्पोर्ट शूज घातलेले विकास हे एखाद्या कॉलेजच्या विद्यार्थ्यासारखे वाटत होते पण आठवीनंतर त्यांना शाळा सोडली होती.

आम्ही त्यांचे मित्र सुरेश (बदललेलं नाव) यांच्या घरी पोहोचलो. सुरेश यांच्यानुसार तेही टीएमसीसाठी काम करत होते. "बरीच मुलं व्यसनाचा खर्च भागवता यावा म्हणून हे काम करतात. कामाच्या बदल्यात आम्हाला दारू अथवा ड्रग्स मिळत. पोलिसांनी त्रास दिला तर काउन्सिलर त्यांना फोन करत असे," सुरेश सांगतात.

लोकांना भीती घालण्यासाठी सुरेश आणि त्यांच्या मित्रांनी चाकू, दांडकं आणि बंदुकांचा वापर केला. एकदा तर सुरेश यांनी एका इमारतीच्या मालकाला तिसऱ्या मजल्यावरून धक्का दिला होता.

विकास सांगतात, "आम्ही 25 ते 30 लोक पोलिंग बुथसमोर उभे राहायचो आणि तुमचं मत आधीच टाकण्यात आलं आहे, आता तुम्ही घरी जा असं मतदान करण्यासाठी आलेल्या लोकांना सांगायचो. काही वेळा आम्ही सीपीएमच्या कार्यालयातही मोडतोड केली."

"माझ्याकडे बंदुक होती तेव्हा माझ्या हातात ताकद आहे, असं मला वाटायचं. मीडियालाही आम्ही जवळ नाही येऊ द्यायचो," विकास पुढे सांगतात.

लोकांची ओळख पक्षानुसार होते

सुरेश सांगतात, जे लोक आधी हे काम सीपीआय(एम)साठी करत असत आज तेच लोक हे काम टीएमसीसाठी करत आहेत.

बदलत्या निष्ठा आणि पश्चिम बंगालमधल्या राजकीय हिंसेचा संबंध स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीच्या हजारो कोटी रुपयांच्या बजेटवर कब्जा मिळवणं आणि भतकाळातल्या राजकीय ढाच्याशी कनेक्ट राहणं यांच्याशी आहे.

पश्चिम बंगालच्या लोकसंख्येनुसार, इथे उद्योग आणि आर्थिक क्षेत्राशी संबंधित संधी कमी आहे. त्यामुळे इथल्या लोकांचं राजकीय पक्षांवरचं अवलंबित्व जास्त आहे.

कोलकत्यातले राजकीय विश्लेषक डॉ. मइदुल इस्लाम पश्चिम बंगालला 'सिंगल पार्टी सोसायटी' असं संबोधतात, जिथे डाव्यांनी 33 वर्षं राज्य केलं आणि आता तृणमूल 7 वर्षांपासून करत आहे.

पश्चिम बंगालमध्ये लोकांना ते कोणत्या राजकीय पक्षाशी जोडलेले आहेत यावरून ओळखलं जातं. त्यांचं हिंदू अथवा मुसलमान असणं मागे ढकललं जातं.

निवडणुकीत पराभव म्हणजे कोटींचं नुकसान

मुलींसाठी सरकारी सुविधा मिळवणं असो, सरकारी नोकरी मिळवणं असो, जोवर पक्ष सोबत नसतो सुविधा मिळवणं सोप काम नसतं. पक्षासोबतचा लोकांचा हा कनेक्ट सीपीएमच्या काळापासूनच आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत मिळून बनलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं बजेट कोट्यवधी रुपयांचं असतं. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जातात. कारण निवडणुकीत पराभव झाला म्हणजे कोटयवधींचं नुकसान होतं.

"या निवडणुकांत खूप काही पणाला लागलेलं असतं त्यामुळे हिंसाही खूप जास्त आहे," डॉ. इस्लाम सांगतात.

पुरुलिया जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते त्रिलोचन महतो और दुलाल कुमार यांचा मृत्यू म्हणजे राजकीय हिंसेचे उदाहरण आहे, असं त्यांचे कुटुंबीय सांगतात.

राजकीय हत्या

त्रिलोचन महतो यांचा मृतदेह एका झाडाला लटकलेला दिसून आला तर दुलाल कुमार यांचा एका वीजेच्या तारेवर. स्थानिक पोलीस आणि प्रशासन मृत्यूमागच्या कारणांवर शांत आहेत.

कोलकातापासून पुरुलियापर्यंत रस्ते, टोल प्लाझा, दुकानं तृणमूलच्या झेंड्यांनी सजलेले दिसत होते. पण पुरुलियात प्रवेश केल्यानंतर भाजपचं निवडणूक चिन्ह कमळ हे घरांवर, दुकानांवर दिसत होतं. दुलाल यांच्या ढाभा या गावाजवळच 18 वर्षीय त्रिलोचन यांचं सुपर्डी गाव आहे.

त्रिलोचन मेहता आदल्या रात्री गायब झाले आणि पुढच्या दिवशी त्यांचा मृतदेह झाडावर लटकलेला दिसून आला. इतक्या कमी वयात भाजपमध्ये सामील झाल्यामुळे तुझा मृत्यू झाला आहे, असं त्यांच्या टी-शर्टवर लिहिलेलं होतं.

त्रिलोचन यांच्या घरातल्या आतील आणि बाहेरील भिंतींवर भाजपचं निवडणूक चिन्ह कमळ फडकत होतं.

आजारी वाटत असलेले त्रिलोचन यांचे वडील हरिराम महतो शेजाऱ्यांच्या गराड्यात खाटेवर बसले होते. त्यांची नजर एकटक जमिनीवर खिळली होती.

"त्रिलोचन माझा सर्वांत लहान मुलगा होता. कॉलेजमध्ये त्याची परीक्षा सुरू होती. आजही त्याचा पेपर होता. त्याच्याऐवजी मला मारलं असतं तर आज माझा मुलगा जिवंत तरी असता. कुणीच त्या वडिलांचं दु:ख समजू शकत नाही ज्यानं आपलं मूल गमावलं आहे," असं सांगून ते रडायला लागले.

गावातून गायब झाल्यानंतर त्रिलोचनचे भाऊ शिवनाथ यांना एक फोन आला. पलीकडून त्रिलोचन बोलत होते.

"माझा भाऊ रडत होता. आईशी बोलायचंय असं तो सारखं-सारखं म्हणत होता. मोटारसायकलस्वार 5 लोकांनी त्याला उचललं आहे, त्याचे हातपाय बांधले आहेत आणि ते लोक त्याला घेऊन अटकठ्ठाच्या जंगलाकडे जात आहेत, असं तो सांगत होता. त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली होती, त्याला मारहाण करण्यात आली होती तसंच जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती," असं तो पुढे सांगत होता.

टीएमसीच्या लोकांकडून धमक्या मिळत

"आमच्या दोघांचं बोलणं 3 ते 4 मिनिटं चाललं. शिवनाथ आईला फोन देणार होते तोवर फोन कट झाला. पोलिसांनी कॉल लोकेशनचा आधार घेत रात्रभर शिवनाथला शोधायचा प्रयत्न केला. पण त्यात यांना यश आलं नाही. पुढच्या दिवशी गावाबाहेरच्या शेतातल्या एका झाडावर त्यांचा मृतहेद लटकलेला आढळून आला," शिवनाथ पुढे सांगतात.

त्यांची आई पाना महतो या घरात एका खुर्चीवर बसून होत्या. त्यांचा चेहरा उदास होता.

"माझा मुलगा नेहमी सांगे की त्याला टीएमसीच्या लोकांकडून धमक्या मिळत आहेत. पण त्यानं कुणाचंही नाव घेतलं नाही. मीही त्याला जोर देऊन विचारलं नाही." शेजारच्याच ढाभा गावात दुलाल कुमार यांचं कुटुंब राहतं.

गावात प्रवेश केल्यानंतर एक तलाव दिसतो. त्याच्यासमोर वीज वितरणाचं टॉवर आहे. याच टॉवरवर 3 मुलांचे वडील असलेल्या दुलाल कुमार यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांच्या कमरेला एक रुमाल गुंडाळलेला होता.

मुलाच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी

यानंतर गावात भीतीचं वातावरण इतकं आहे की लोक रात्री पहारा देतात. दुलाल यांचे वडील महावीर सांगतात, "पोलीस म्हणतात की त्यानं आत्महत्या केली. पण कुणी त्याला आत्महत्या करताना पाहिलं का? त्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हायला हवी."

महावीर कुमार यांचं गावात एक दुकान आहे जिथं दुलाल दिवसातून तीनदा जेवण पोहोचवत असत. 31मेच्या सायंकाळपासून दुलाल गायब होते. त्यांची दुचाकी तलावाजवळ मिळाली होती.

महावीर यांच्यानुसार, "गायब होण्याच्या एक दिवस अगोदर गावाजवळ काही टीएमसीच्या लोकांनी दुलालला धमकावलं होतं की, तू खूपच नेतागिरी दाखवत आहेस. आम्ही तुला बघून घेऊ."

शेजारच्या परिसरात रात्रभर दुलालचा शोध घेण्यात आला. पण ते सापडे नाही. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह टॉवरला लटकलेला दिसून आला.

"मी माझ्या मुलावर खूप प्रेम करत होतो. अख्ख्या बलरामपूर परिसरात कुणीच त्याला नापसंत करत नव्हतं. तुम्ही पोलिसांना विचारा. राजकारणामुळे माझ्या मुलाचा मृत्यू झाला."

'सीपीएम सरकारच्या काळात अशी हिंसा पाहिली नाही'

भाजपच्या अगोदर 30 वर्षं सीपीएमला समर्थन देणारे आणि 5 वर्षं सीपीएमसाठी काम करणाऱ्या महावीर यांच्यानुसार, "आम्ही 33 वर्षं सीपीएमची सत्ता पाहिली. पण कधीही परिसरात अशी हिंसा पाहिली नव्हती. असं असेल तर टीएमसीला नेहमीच सत्तेच राहण्याचा अधिकार आहे का?"

पुरुलियाचे जिल्हाधिकारी आलोकेश प्रसाद राय यांनी या प्रकरणावर बोलायला नकार दिला. पोलीस अधीक्षक आकाश मघारिया यांची भेट घेण्याचा त्यांनी सल्ला दिला. प्रकरण सीआयडीकडे असल्यानं अपण यावर बोलू शकत नाही, असं आकाश मघारिया यांनी सांगितलं.

टीएमसीचे स्थानिक नेते सृष्टिधर महतो यांनी या प्रकरणात पक्षाच्या कार्यकर्त्याची भूमिका असल्याचा इन्कार केला. टीएमसीचे नेते डेरेक ओब्रायन यांनी ट्वीट करून म्हटलं की, बंगालल लागून असलेल्या झारखंड सीमेचीही चौकशी व्हायला हवी.

"भाजप, बजरंग दलाचे कोण-कोम यात सामील होतं, चौकशीत ही बाब समोर यायला हवी," असं त्यांनी म्हटलं आहे.

आप्तस्वकीयांना गमावल्याचं दु:ख

पुरुलियाला लागून असलेल्या बीरभूम जिल्ह्यात दिलदार शेख यांचं कुटुंब राहतं. भाजप कार्यकर्त्यांनी दिलदार शेख यांची हत्या केली आहे, असा कुटुंबीयांचा आरोप आहे. दिलदार यांच्या मृत्यूनंतर त्यांची आई अंगुरा बीबी यांना जोराचा धक्का बसला आहे.

"माझा मुलगा घराबाहेर गेला आणि त्यानंतर मी त्याचा मृतदेह पाहिला. मुलगा गमावल्याच्या दु:खात मी मरून जाईन," अंगुरा सांगतात.

घरातल्या सदस्यांनी दिलदार यांचे फोटो काढून टाकले आहेत, कारण अंगुरा या फोटोंकडे बघून तासनतास रडत असत.

दिलदार यांचे नातेवाईक रोशन खान यांच्या मते, "दिलदार टीएमसी कार्यकर्त्यांसोबत उमेदवारी अर्ज भरण्यास जात होते तेव्हा भाजप समर्थकांनी बॉम्ब आणि बंदुकीनं त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यात दिलदार मारले गेले."

दिलदार ठेकेदारीचा व्यवसाय करत आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यांच्या कमाईवर चालत असे. सुरुवातीला त्यांचं कुटुंब काँग्रेससोबत होतं आणि 1998 नंतर टीएमसीसोबत.

"ममता बॅनर्जी यांनी आम्हाला कन्याश्री, रुपश्री यांसारख्या योजनांसारख्या अनेक सरकारी योजनांचा लाभ दिला आहे," रोशन खान सांगतात.

पश्चिम बंगालमध्ये हिंसेचा इतिहास खूप जुना आहे.

प्राध्यापक इस्लाम यांच्या मते, "बंगालमध्ये 1910, 1920पासून क्रांतीचं वातावरण होतं. खुदीराम बोस, बादल, दिनेश यांच्यापासून सूर्य सेन यांच्यापर्यंत पाहिल्यास पश्चिम बंगालमध्ये हिंसेचे वातावरण दिसून येतं. बंगाली समाज दुसऱ्या समाजांपेक्षा वेगळा आहे. नक्षली पीरियडदरम्यान पश्चिम बंगालमध्ये खूप हिंसा झाली."

पश्चिम बंगालमध्ये भद्रलोक म्हणजे अभिजन वर्ग काही शहरांपुरतेच मर्यादित राहिले आहेत. तर राजकारणात आलेली नवी मंडळी गरीब आणि मध्यम वर्गातून येत आहे. आणि ही मंडळी बदललेल्या राजकारणात आपला दावा ताकदीचा वापर करून रेटत आहेत.

पुरुलियामध्ये भाजपचे नेते त्यांच्या भाषणांमध्ये राज्याची तुलना सीरिया आणि इराकसोबत करत आहेत. ममता बॅनर्जी यांना 'हिंदूविरोधी' संबोधून ते या घटनेचा 2019मध्ये राजकीय फायदा नक्कीच मिळेल असा त्यांना विश्वास आहे.

"लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप या घटनांचा विपर्यास करत आहे, कारण पश्चिम बंगालमध्ये भाजपचं नामोनिशाण नाही हे त्यांना चांगलंच माहिती आहे," असं टीएमसीचे नेते म्हणत आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)