अंकित सक्सेना : मुस्लीम कुटुंबाकडून खून झालेल्या मुलाच्या घरी रमजानची इफ्तार पार्टी

फोटो स्रोत, facebook
- Author, हर्ष मंदर
- Role, सामाजिक कार्यकर्ते, माजी सनदी अधिकारी
दिल्लीमध्ये 4 महिन्यांपूर्वी अंकित सक्सेनाचा खून झाला. आपल्या मुलीवर प्रेम करतो म्हणून एका मुस्लीम कुटुंबानं अंकितचा खून केला. त्याच अंकितच्या वडिलांनीइफ्तार पार्टीचं आयोजन करत मानवतेची प्रचिती दिली आहे.

3 जूनची ती सायंकाळ प्रेमाची आणि चांगलेपणाची ठरली. एकाच खोलीच्या काही घरांच्या मधून जाणाऱ्या लहान रस्त्यावर हिरवी चटई अंथरण्यात आली होती. पश्चिम दिल्लीच्या 'लो- इनकम' गटातल्या रघुवीर नगरमधले लोक या इफ्तार पार्टीसाठी जमले होते. रमजानच्या महिन्यात मुस्लीम सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत उपवास करतात. उपवास सोडण्याचा विधी म्हणजे इफ्तार होय.
ही इफ्तार पार्टी अनेक गोष्टींसाठी वेगळी ठरली. या कार्यक्रमात मुस्लिमेतरांचा सहभाग जास्त होता. पण हा कार्यक्रम वेगळा ठरला तो संयोजकामुळे. हे लाजाळू संयोजक त्यांची प्रतिक्रिया घेत असलेल्या माध्यम प्रतिनिधींच्या गर्दीनं भांबावून गेले होते.
हे संयोजक होते यशपाल सक्सेना. चार महिन्यांपूर्वी या इफ्तार कार्यक्रमापासून थोड्याच अंतरावर त्यांच्या एकुलत्या एक मुलाचा म्हणजेच अंकित सक्सेनाचा खून झाला होता. 23 वर्षांचा त्यांचा अंकित फोटोग्राफर होता.
विविध धर्मांच्या मानचिन्हांसह अकिंतची पोस्टर्स इथं लावण्यात आली होती. हा तरुण कधी पगडी तर कधी मुस्लीम पद्धतीची टोपी तर कधी उघड्या डोक्यानं विविध धर्मांच्या प्रार्थनास्थळांना भेट देत असल्याचं या फोटोंतून दिसत होतं. या तरुणाच्या मित्रांचा ग्रुपचं नाव आहे आवारा बॉईज. त्यांना असं विविध धर्मियांच्या प्रार्थनास्थळांना भेटी देणं आवडतं. म्हणूनच अंकितला ही इफ्तारची कल्पना आवडली असती.
मी जेव्हा जेव्हा त्याच्या वडिलांना भेटलो तेव्हा तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, त्यांचा मुलगा त्यांच्यापासून दूर गेला आहे असं त्यांना कधी वाटतच नाही. 2 फेब्रुवारी 2018ला ज्या दिवशी त्यांनी त्यांच्या मुलाला गमावलं त्या दिवसाच्या आठवणी मात्र त्यांना सतावते.
त्यादिवशी अंकितच्या आईवडिलांना कुणी तरी फोन करून सांगितले की, त्यांच्या मुलाला कुणी तरी मारहाण करत आहे आणि त्यांनी मुलाला वाचवण्यासाठी तातडीनं यावं. त्यांच्या घरापासून जवळच असलेल्या रस्त्याच्या दिशेनं ते धावले. ते जेव्हा तिथं पोहोचले त्यावेळी त्यांना दिसलं की अंकितला एका मुस्लीम मुलीचं कुटुंब मारहाण करत आहे. काही वर्षांपूर्वी ते त्यांचे शेजारी होते.
या क्षणापर्यंत त्यांना माहीत नव्हतं की त्यांचा मुलगा मुस्लीम युवतीच्या प्रेमात आहे आणि दोघं लग्न करणार आहेत. ते दोघेही एकाच गल्लीत लहानाचे मोठे झाले होते आणि खेळण्यासाठी एकमेकांच्या घरी जात होते.
मुलीचं कुटुंब दुसरीकडे राहण्यासाठी गेल्यानंतरही ते एकमेकांना भेटत होते आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानं त्याच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली नव्हती, पण मुलीच्या कुटुंबीयांचा या लग्नाला कडाडून विरोध होता.

ज्या दिवशी अंकितचा खून झाला त्या दिवशी तिनं तिच्या कुटुंबीयांना घरात कोंडलं आणि घर सोडून निघून गेली. पण ती अंकितकडे पोहोचेपर्यंत तिच्या कुटुंबीयांनी घरातून सुटका करून अंकितला गाठलं होतं. अंकित त्याच्या स्टुडिओतून बाहेर पडला होता त्यावेळी मुलीच्या कुटुंबीयांनी त्याला हटकलं.
त्यानंतर नेमकं काय घडलं हे सांगणं कठीण आहे. दोघांच्या आयांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. यात अंकितची आई खाली पडली. त्यांना उठवण्यासाठी अंकित धावला. त्यावेळी मुलीच्या कुटुंबीयांपैकी एकानं अंकिताचा गळी चिरला.
अंकितच्या भेदरलेल्या आईवडिलांनी त्यांच्या मुलाला किंचाळताना आणि रक्ताच्या थारोळ्यात पडताना पहिलं. मुलाला वाचवण्यासाठी ते शेजाऱ्यांकडे भीक मागत होते. पण कुणीच त्यांची मदत केली नाही. एक इलेक्ट्रिक रिक्षावाला मात्र थांबला. त्यातून त्यांनी अंकितला जवळच्या हॉस्पिटलला नेलं.
अंकितची आई तिच्या पदरानं रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न करतं होती. जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की तुमचा मुलगा या जगात नाही तेव्हा त्यांन धक्काच बसला.
भाजपच्या दिल्ली शाखेला ही घटना मुस्लीम समाजाविरोधात द्वेष पसरवण्यासाठीची चांगली संधी वाटली.
'द वायर'मधल्या गौरव विवेक भटनागर यांनी या घटनेला राजकारण्यांनी कसा जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला याचा माग घेतला आहे. ही घटना घडल्यानंतर पहिलं ट्वीट होतं ते 'भाजप-अकाली'चे आमदार मंजिंदरसिंग सिसरा यांचं.
ते म्हणतात, "बिभत्स सत्य हे आहे की 23 वर्षांच्या अंकितचा खून सन्मानाच्या नावाखाली झाला आहे. आपल्या दिल्लीच्या मुलाचा खून कथित 'दबलेल्या अल्पसंख्याकां'नी केला आहे. अंकित ज्या मुलीच्या प्रेमात होता त्या शहजादीनं तिच्या कुटुंबीयांनी अंकितचा खून केल्याचं मान्य केलं आहे."
दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी अंकितच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या 'मौना'वर टीका केली. ते म्हणाले, "जेव्हा बहुसंख्याक व्यक्तीविरोधात गुन्हा होतो तेव्हा त्यांना त्याची काळजी नसते." त्यांनी अंकितच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयांची भरपाई देण्याचीही मागणी केली.

त्यानंतर केजरीवाल यांनी या कुटुंबीयांची भेट घेऊन 5 लाख रुपये मदतीचं आश्वासन दिलं. दरम्यान या परिसरात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी फिरण्यास सुरुवात केली आणि तिथल्या मुस्लीम रहिवाश्यांना धमक्या दिल्या.
एकिकडे हे सर्व घडत होतं आणि दुसरीकडे या दुःखाच्या परिस्थितीमध्येसुद्धा यशपाल सक्सेना यांनी मात्र अतिउच्च मानवी संवेदनांची प्रचिती दिली.
कॅरावॅन मासिकाच्या वृत्तानुसार मनोज तिवारी जेव्हा सक्सेना यांना भेटले तेव्हा त्यांनी त्यांना आणि माध्यमांना त्यांच्या मुलाच्या खुनाला धार्मिक रंग दिला जाऊ नये अशी विनंती केली होती.
ते म्हणाले होते, "मला एकच मुलगा होता. मला जर न्याय मिळालं तर चांगल आहे. जर नाही मिळालं तरी माझ्या मनात कोणत्याही समजाबद्दल द्वेष भावना नाही. माझ्या मनात जातीय विचार नाहीत. मला समजत नाही, माध्यमं अशा पद्धतीनं का दाखवत आहेत."
मी त्यावेळी लिहिलं होतं, "या प्रकरणानंतर मुस्लिमांबद्दल मनात वाईट भावना नाहीत, असं सांगून सक्सेना यांनी जातीय द्वेषाच्या समर्थनासाठी दिल जाणारं कारण मोडून काढलं आहे. त्यांच्या वैयक्तिक दुःखाच्या स्थितीतही या चमकत्या मानवतावादी भूमिकेसाठी देश त्यांच्या ऋणात राहील."
यशपाल यांनी व्हिकॅरिअस गिल्टचा (Vicarious Guilt) समज खोडून काढला आहे. एखाद्या इतिहासात किंवा आता घडलेल्या किंवा कल्पित गुन्ह्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीच्या संपूर्ण समजाला घ्यावी, ही कल्पना आहे. ही कल्पना अशा समजाविरोधात हिंसेसाठी नैतिक समर्थन मिळवून देते.
मी आणि 'कारवा-ए-मोहब्बत'च्या टीमसह त्यांना भेट दिली त्यावेळी ते साध्या भाषेत पण निश्चयानं बोलत होते. सक्सेना यांचे शेजारी राहणारे मुस्लीम आहेत.
यशपाल सक्सेना सांगतात,"या दुःखाच्या घटनेत हे कुटुंब त्यांच्या घरीसुद्धा गेलेलं नाही. तेच आमची काळजी घेत आहेत. ते म्हणाले, "ही जी महिला आहे ती माझी बहीण आहे. मी तिचा तिरस्कार करू शकतो का? मी तिचा तिरस्कार करावा तरी का?"

अंकित त्यांचा एकुलता एक मुलगा होता आणि त्यांच्या उतारवयातला आधारच संपला आहे. ना तर भाजपनं त्यांना सहकार्याच वचन दिल आहे ना आतापर्यंत दिल्ली सरकारकडून त्यांना काही मदत मिळत आहे. दोन स्वयंसेवी संस्थांनी सक्सेना कुटुंबाला मदतीसाठी निधी गोळा करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.
पण आवारा बॉईज त्यांच्या कार्यपद्धतीला साजेस काम करत होते. या इफ्तार कार्यक्रमात ही तरुण मुलं अंकितचा फोटो प्रिंट केलेला टीशर्ट परिधान करून खाद्यपदार्थ वाटत होते.
यावेळी कुणी तरी उभं राहून मुस्लीम रोजा का करतात याची माहिती देतं होतं. जे उपाशी आहेत, तहानलेले आहेत त्यांच्या वेदना समजाव्यात म्हणून मुस्लीम रोजा करतात, असं त्यांनी सांगितलं. सायंकाळी 7.17 मिनिटांनी प्रार्थना झाली आणि सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला. बंधुभावाचं हे सुरेख चित्र होतं.
हे वाचलं का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








