नागराज मंजुळे : आयुष्याची शाळा वेगळेच धडे देते, हे नापास झाल्यामुळेच कळलं

नागराज मंजुळे

फोटो स्रोत, facebook/Nagraj Manjule

"1992चा मे-जून महिना होता. दहावीची परीक्षा संपलेल्या आणि निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या माझ्यासारख्या सगळ्यांनाच निकालाची धाकधूक वाटत होती. निकाल लागला आणि काय, त्या परीक्षेत माझाच 'निकाल लागला' होता. मी गणित आणि इंग्रजी या दोन विषयांमध्ये नापास झालो होतो."

आपल्या मनातल्या असंख्य कल्पना रुपेरी पडद्यावर लीलया चितारणारे आजच्या घडीचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे त्यांच्या दहावीच्या निकालाच्या दिवसाबद्दल सांगतात.

आता तुम्हाला आश्चर्य वाटेल कदाचित, पण एकापेक्षा एक भन्नाट मराठी चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या नागराज यांना दहावीत मराठीत जेमतेम 42 मार्क मिळाले होते. त्यांना थोडाफार हात दिला तो सामाजिक शास्त्र आणि विज्ञान या विषयांनी!

त्या वेळी तर दहावीच्या निकालाला जरा जास्तच महत्त्व होतं. आता 'दहावीनंतर काय?', अशा अनेक करिअर गायडन्स कार्यक्रमांमुळे अनेक वाटा खुल्या झाल्या आहेत. पण आजही दहावी-बारावीला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी रिझल्टचा दिवस आयुष्यातला सगळ्यांत महत्त्वाचा दिवस असतो, असं नागराज यांना वाटतं.

गणिताशी छत्तीसचा आकडा!

"गणित हा विषय मला शाळेत कधीच आवडला नाही. तसा तो अनेकांना आवडत नसतोच. पण गणितात माझी दांडी गुल होणार, हे मला माहीत होतं. अभ्यासात मी यथातथाच होतो, असं म्हटलं तरी चालेल. पण गणित आणि इंग्रजी हे विषय डेंजरच वाटायचे," नागराज गणिताच्या आठवणीने आजही गंभीर होतात.

"दहावीत गणितात तर मला 150 पैकी फक्त 32 मार्क मिळाले. मला त्या विषयाची भीतीच वाटायची," नागराज सांगतात.

नागराज मंजुळे

फोटो स्रोत, NAGRAJ MANJULE/FACEBOOK

फोटो कॅप्शन, 1992 सालची नागराज मंजुळे यांची गुणपत्रिका

इंग्रजीही नागराज यांचा नावडता विषय होता.

"मुळात इंग्रजी शिकायचं कशाला, ते शिकून काय मिळणार आहे, हेच माहीत नव्हतं. त्यात आपल्याकडे भाषा अत्यंत रूक्ष पद्धतीने शिकवल्या जातात," शिक्षण पद्धतीतील नेमक्या अवगुणांवर नागराज बोट ठेवतात.

"आपण आपली मातृभाषा बोलताना ती डायरेक्ट बोलायला सुरुवात करतो. म्हणजे व्याकरण वगैरे शिकतो, पण ते नंतर येतं. बोलायला सुरुवात केल्यावर आपल्याला 'अ- आईचा, ब- बदकाचा' वगैरे शिकवतात. इतर भाषांच्या बाबतीत म्हणजे व्याकरण आधी येतं आणि मग बोलणं शिकवलं जातं. त्यामुळेच मला कधी शाळेत शिकवलेलं इंग्रजी झेपलंच नाही."

नागराज मंजुळे

फोटो स्रोत, NAGRAJ MANJULE/FACEBOOK

नापास झालो आणि...

दहावीत दोन विषयांमध्ये नापास झाल्याचा पुरावा मार्कशीटच्या रूपाने हातात आला आणि नागराज यांना थोडासा धक्काच बसला, असं ते म्हणतात.

"दहावीत नापास होणं हे त्या वेळचं अगदी टोकाचं पाप होतं. नापास झालो म्हणजे सगळं संपलं असंच म्हटलं जायचं. माझ्या आजूबाजूच्यांनीही 'आता तुझं काहीच होणार नाही' छाप वाक्यं ऐकवायला सुरुवात केली होती," नागराज त्या दिवसांमध्ये हरवून जातात.

"मीसुद्धा खूप गंभीर झालो होतो. कमी मार्क मिळतील, हे माहीत होतं, पण नापास होणं नाही म्हटलं तरी लागलंच मनाला."

नागराज मंजुळे

फोटो स्रोत, NAGRAJ MANJULE/FACEBOOK

फोटो कॅप्शन, फँड्रीच्या दिग्दर्शनावेळी नागराज

मग नागराज या धक्क्यातून सावरले कसे?

"वडिलांनी मला त्या काळात खूप सांभाळून घेतलं. त्यांनी मला सांगितलं की, दहावी म्हणजे काही सगळ्याचा शेवट नाही. त्यापुढेही आयुष्य आहे," आपल्या वडिलांविषयी बोलताना नागराज काहीसे भावूक होतात.

नापास होण्याबद्दल ते म्हणतात, "मी पास झालो असतो, तर आत्ता जे काही मिळवलं आहे, ते मिळवू शकलो असतो का, हा प्रश्न मला आजही सतावतो. मी एकटा नापास झालो. सगळे मित्र आपापल्या वाटांनी पुढे गेले आणि मी एकटा पडलो. या एकटेपणात मी खूप विचार करायचो. खूप वाचन केलं. त्यातूनच माझ्यातल्या दिग्दर्शकाचा पाया रचला गेला."

आयुष्याची शिकवणी वेगळीच असते

शाळा आपल्याला जेवढं शिकवते त्या पेक्षा वेगळे धडे आयुष्य देत असतं, असं नागराज म्हणतात.

"पास झालो म्हणजे खूप मोठा तीर मारला असं नसतं आणि नापास झालो म्हणजे आपल्यात काही खोट आहे, असंही नसतं. आनंदानं जगता येणं खूप वेगळी गोष्ट आहे आणि त्याचा पास-नापास याच्याशी संबंध नसतो," नागराज सांगतात.

"जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्याच गोष्टी शाळा शिकवत नाही. एखादा व्यवसाय करण्याची कल्पना शाळेत शिकून येत नाही. ती व्यवहारज्ञानातून येते. हे व्यवहारज्ञानच जगण्यासाठी आवश्यक असतं. त्यामुळे नापास झालो, म्हणजे सगळं संपलं असं मानण्याचं काहीच कारण नाही," हे सांगताना नागराज अगदी स्वत:चं उदाहरण देतात.

नागराज मंजुळे

फोटो स्रोत, NAGRAJ MANJULE/FACEBOOK

फोटो कॅप्शन, राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना नागराज

ते सांगतात, "आज दहावीत दोन विषयांमध्ये नापास होऊनही आपल्या आयुष्याची गोष्ट लिहिलेल्या, त्या गोष्टीत राष्ट्रीय पुरस्कारांसारखे झगमगीत टप्पे असलेल्या माझ्यासारख्या एका सामान्य माणसाचं उदाहरण तुमच्यासमोर आहे. आज निकाल लागल्यावर तो स्वीकारा आणि पुढे वाटचाल करा. यशाची व्याख्या तुम्हालाच लिहायची आहे."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)