राष्ट्रीय पुरस्कारांचं 'संगीत मानापमान' असं रंगलं

श्रीदेवी यांचा राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून स्वीकारताना त्यांचे पती बोनी कपूर आणि मुली, बाजूला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी

फोटो स्रोत, Twitter / @rashtrapatibhvn

फोटो कॅप्शन, श्रीदेवी यांचा राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून स्वीकारताना त्यांचे पती बोनी कपूर आणि मुली, बाजूला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी
    • Author, ऋजुता लुकतुके
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या निमित्ताने यंदा सरकार आणि चित्रपट कलाकार यांचा मिळून एक मानापमानाचा प्रयोग रंगला. सगळ्यांनी आपल्या भूमिका अगदी समरसून निभावल्या.

प्रेक्षक आणि मीडियासाठी मात्र नाट्याचे दोन दिवस हे कथानकातल्या चढउतार आणि अनपेक्षित धक्क्यांचे होते.

झालं असं की 3 मे रोजी नवी दिल्लीत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण होणार म्हणून देशभरातले दिग्गज चित्रपटकर्मी आणि पुरस्कार विजेते नवी दिल्लीत दाखल झाले. त्यांच्या राहण्याची व्यवस्था अशोका हॉटेलमध्ये करण्यात आली.

यात मराठी कलाकार नागराज मंजुळे, प्रसाद ओक, निपुण धर्माधिकारी आणि बालकलाकार यशराज तसंच मराठीत सर्वोत्कृष्ट ठरलेल्या 'म्होरक्या' चित्रपटाची टीमही होती.

कुठे पडली ठिणगी?

पण सगळ्यांनाच दिल्लीत दाखल झाल्यावर एक धक्का बसला - राष्ट्रपती रामनाथ कोविंद फक्त अकरा जणांना पुरस्कार देतील आणि इतरांना माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी तसंच त्यांच्या खात्याचे सचिव पुरस्कार देतील, असं सांगण्यात आलं.

तिथूनच या सगळ्या नाट्याला सुरुवात झाली. जेव्हा पुरस्काराची घोषणा झाली आणि पुरस्कारांचं ऑफर लेटर दिलं तेव्हा राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार मिळणार, असं सांगण्यात आलं होतं. निमंत्रण पत्रिकेतही तसाच उल्लेख असल्याचं नागराज मंजुळेंनी सांगितलं.

मास्टर यशराज कऱ्हाडे याला म्होरक्या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार देताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी

फोटो स्रोत, Twitter / @PIB_India

फोटो कॅप्शन, मास्टर यशराज कऱ्हाडे याला म्होरक्या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार देताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी

पण आज प्रत्यक्षात काहीतरी वेगळं घडत होतं. राष्ट्रीय पुरस्कार हे सर्वोच्च मानाचे पुरस्कार. शिवाय हे पुरस्कार राष्ट्रपतींनीच देण्याचा प्रघात आहे. मग अचानक बदल का?

आणि हा बदल कलाकारांना थेट रंगीत तालमीच्या वेळी (म्हणजे पुरस्कार वितरणाच्या एक दिवस आधी - बुधवारी) कळल्यामुळे राग आला. कार्यक्रमासाठी सगळे दिल्लीत जमलेलेच होते. त्यामुळे चर्चा सुरू झाली.

राष्ट्रीय पुरस्कारांवर बहिष्कार घालावा, असा विचार पुढे आला.

ठिणगीचा झाला भडका

'पावसाचा निबंध' चित्रपटाचे लेखक नागराज मंजुळे, 'कच्चा लिंबू' चित्रपटातले प्रसाद ओक, 'इरादा पक्का'चे निपुण धर्माधिकारी, 'म्होरक्या' चित्रपटाचे दिग्दर्शक अमर देवकर आणि त्यांची टीम हे सगळेच बहिष्कार घालण्याच्या विचारात होते.

अचानक निर्माण झालेल्या वादामुळे प्रत्येक कलाकारावर भूमिका घेण्याची वेळ आली. कारण कार्यक्रमाला गेलं तर चर्चा होणार आणि नाही गेलं तर वाद होणार.

निपुण धर्माधिकारी यांचे आईवडील सोहळा पाहण्यासाठी स्वत:चा खर्च करून दिल्लीत आले होते. आपल्या मुलाला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार घेताना त्यांना फोटो काढायचा होता.

काहींनी असंही म्हटलं की पुरस्कार वितरण 45 मिनिटांचं असतं, भाषणांचा वेळ कमी केला तर कार्यक्रम तासाभरात संपेल.

देशभरातले कलाकार यावेळी एकजुटीने सरकारविरोधात उभे राहत असल्याचं चित्र उभं राहू लागलं, आणि तिथून ही बातमी मोठी झाली.

यापूर्वी FTIIच्या प्रमुखपदी गजेंद्र चौहान यांची नियुक्ती केल्यानंतर अनेक कलाकारांनी केंद्र सरकारचा निषेध केला होता.

सरकारची पहिली शिष्टाई असफल

वातावरण तापल्यावर राष्ट्रपती कोविंद यांच्या कार्यालयातूनही एक स्पष्टीकरण देण्यात आलं. माध्यम सचिव अशोक मलिक यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पहिल्यापासूनच कुठल्याही कार्यक्रमासाठी फक्त एक तास उपस्थित राहण्याची ठरवलेली भूमिका पुन्हा पत्रकाद्वारे समजावून सांगितली.

थोडक्यात राष्ट्रपती वेळ बदलणार नाहीत, असं स्पष्ट केलं. त्यामुळे कलाकार आणखी चिडले.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी

फोटो स्रोत, Twitter / @PIB_India

फोटो कॅप्शन, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी

स्वत: माहिती प्रसारणमंत्री स्मृती इराणी हॉटेल अशोकामध्ये कलाकारांच्या भेटीला आल्या. माझं भाषण कमी करेन आणि तो वेळ राष्ट्रपतींना देईन, असं त्या म्हणाल्या.

पण सगळ्या कलाकारांचं समाधान झालं नाही. बुधवारचा दिवस तसाच सरला. पुरस्कार विजेते कलाकार आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.

शेखर कपूर यांची जखमेवर फुंकर

अखेर वितरण सोहळ्याचा दिवस उगवला. आता पुरस्कारांसाठी काही तास उरले होते. त्यामुळे अशोका हॉटेल आता हालचालींच्या केंद्रस्थानी होतं.

सकाळपासून सगळे कलाकार आपापल्या भाषेतल्या वृत्तवाहिनींना मुलाखती देऊन आपली नाराजी व्यक्त करत होते. पुरस्कार स्वीकारणार नाही, ही भूमिका पुन्हा पुन्हा सांगत होते.

अशोका हॉटेलची लॉबी मीडिया, कलाकार आणि एकूणच माणसांनी गजबजलेली होती. सगळ्यांचेच आवाज चढल्यामुळे लॉबीत गोंधळही खूप होता. विशेष म्हणजे पुरस्कारांचे ज्युरी सदस्य समारंभासाठी याच हॉटेलमध्ये उतरलेले होते.

राष्ट्रपती कोविंदसोबत पुरस्कारांचे ज्युरी सदस्य

फोटो स्रोत, Twitter / @PIB_India

फोटो कॅप्शन, राष्ट्रपती कोविंदसोबत पुरस्कारांचे ज्युरी सदस्य

नावाजलेले चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर ज्युरी मंडळाचे अध्यक्ष आणि बॉलीवुड दिग्दर्शक राहुल रवैलही सदस्य होते.

यावेळी संतापलेल्या कलाकारांना शांत करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. कलाकारांबरोबर जेवण घेताना शेखर कपूर यांनी एक औपचारिक बैठकच घेतली.

"तुमचा सिनेमा तुमचाच आहे. तो तुमच्यापासून हिरावला जाणार नाही. उलट त्याचा सन्मान होत आहे. चित्रपट मोठा माना आणि वाद बाजूला सारा," असं त्यांचं सांगणं होतं.

त्यांनी पुन्हा एकदा कलाकारांना पुरस्काराला येण्याचं आमंत्रण दिलं. पुरस्कार नाकारणं योग्य नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. इतर सदस्यांनीही 'एक चूक सरकारने केली. आणि पुरस्कार नाकारून दुसरी चूक कलाकारांनी करू नये,' अशी भूमिका मांडली.

शेवटचा एक तास

आता बॉल खऱ्या अर्थाने कलाकारांच्या कोर्टात होता. सोहळ्याला जेमतेम दोन तास उरले होते. हॉटेलबाहेर त्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी बस उभ्या होत्या. आणि कलाकार एकमेकांशी फोनवर बोलण्यात व्यग्र होते.

शेखर कपूर म्हणाले, "मी कलाकारांशी बोललो आहे. आता निर्णय त्यांनी घ्यायचा आहे."

मीडियाचं लक्ष होतं बाहेर उभ्या असलेल्या बसवर... कोण बसमध्ये बसतं आणि कोण हॉटेलमध्येच राहतं? (अर्थात, कोण खराखुरा बहिष्कार टाकतं.)

पहिली बस अक्षरश: पाच मिनिटात भरली. नागराज मंजुळे स्वेच्छेनं या बसमध्ये दुसऱ्या रांगेत बसले. बीबीसीशी बोलताना त्यांनी आपली "नाराजी कमी झालेली नाही, पण बहिष्कार घालून पुरस्काराचं महत्त्व कमी करणार नाही," असं स्पष्ट केलं.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

प्रसाद ओक अजूनही लॉबीत होते. मी ठरवलं नाही, असं ते म्हणत होते. तेवढ्यात निपुण धर्माधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय गाडीत बसले आणि गाडी विज्ञान भवनाच्या दिशेनं निघाली.

आणि पुढच्या दहा मिनिटांत प्रसाद ओकही पुढच्या बसमध्ये बसले.

स्मृती इराणींच्या हस्ते भर दुपारी या नॉन-फीचर फिल्मसाठी पुरस्कार स्वीकारताना स्वप्नील कपुरे

फोटो स्रोत, PIB website

फोटो कॅप्शन, स्मृती इराणींच्या हस्ते 'भर दुपारी' या नॉन-फीचर फिल्मसाठी पुरस्कार स्वीकारताना स्वप्नील कपुरे

निदान आम्हा मराठी पत्रकारांपुरता हा विषय संपला. मीडिया प्रतिनिधी आपापल्या गाडीत बसून ऑफिसच्या वाटेला लागलेही.

पण काही प्रश्न मनात तसेच राहिले. राष्ट्रपतींनी राष्ट्रीय पुरस्कारांच्या कार्यक्रमाला एकच तास का द्यावा? कलाकारांना अगदी शेवटच्या क्षणी या बदलाची कल्पना का दिली?

कलाकारांचा नेमका विरोध राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीला होता की स्मृती इराणींना? कलाकारांनी एकदा बहिष्काराचा घेतलेला निर्णय एकाएकी का बदलला?

पुढच्या अर्ध्याच तासात टीव्ही प्रसारणामध्ये या कलाकरांना पुरस्कार स्वीकारताना लाखो लोकांनी लाईव्ह पाहिलं. बातम्यांचा आणखी एक दिवस संपला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)