आसाराम : होळीच्या पिचकाऱ्यांपासून ते आमरण जेलपर्यंतचा प्रवास

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्रियंका दुबे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
जोधपूर कोर्टाने आसाराम बापूंना अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी दोषी ठरवलं आणि आमरण जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
एके काळी महाराष्ट्रातही आसाराम यांच्या सत्संगांचे कार्यक्रम व्हायचे. त्यामुळे हे नाव नक्कीच अनेकांनी ऐकलं असेल. पण त्यांचा जन्म पाकिस्तानात झाला होता हे अनेकांना माहीत नसेल. त्यांच्याविषयीच्या 7 महत्त्वाच्या गोष्टी :
1. पाकिस्तानात जन्म
एप्रिल 1941मध्ये पाकिस्तानातल्या सिंध प्रांतातल्या बेरानी गावात जन्माला आलेल्या आसाराम यांचं खरं नाव असुमल हरपलानी आहे.

फोटो स्रोत, AFP
सिंध प्रांतातल्या व्यापारी समुदायाशी संबंधित असलेल्या आसाराम यांचं कुटुंब 1947च्या फाळणीनंतर अहमदाबाद शहरात येऊन स्थायिक झालं.
60च्या दशकांत त्यांनी लीला शाह यांना आपलं अध्यात्मिक गुरू मानलं. त्यानंतर लीला शाह यांनी असुमल यांचं नाव आसाराम असं ठेवलं.
1972 मध्ये आसाराम यांनी अहमदाबादपासून जवळपास 10 किलोमीटर दूर साबरमती नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या मुटेरामध्ये त्यांचा पहिला आश्रम सुरू केला. इथून सुरू झालेला आसाराम यांचा अध्यात्मिक प्रकल्प हळूहळू गुजरातमधल्या शहरांमार्गे देशातल्या इतर राज्यांमध्ये पोहोचला.
2. भक्ती आणि संपत्ती
सुरुवातीला गुजरातच्या ग्रामीण भागातले गरीब, मागास आणि आदिवासी वर्गातले आसाराम बापूंचे भक्त बनले. प्रवचन, देशी औषधं आणि भजन-किर्तन या त्रिसूत्रीच्या जोरावर आसाराम यांचा प्रभाव हळूहळू शहरी मध्यमवर्गांमध्ये वाढू लागला.

फोटो स्रोत, AFP
सुरुवातीच्या वर्षांत प्रवचनानंतर प्रसादाच्या नावाखाली मिळणाऱ्या मोफत जेवणामुळे आसाराम यांच्या 'भक्तांच्या' संख्येत वेगानं वाढ झाली. आसाराम यांच्या अधिकृत वेबसाईटनुसार, आज जगभरात त्यांचे 40 लाख अनुयायी आहेत.
नंतरच्या काही वर्षांत आसाराम यांनी आपला मुलगा नारायण साई यांच्यासह देश-विदेशात 400 आश्रमांचं जाळं उभारलं.
आसाराम यांच्या या व्यापक प्रभावामुळे भक्त आणि आश्रमांच्या संख्येच्या बरोबरीनंच त्यांच्या संपत्तीचा आकडाही मोठा आहे. त्यांची जवळपास 10 हजार कोटींची संपत्ती आहे. सध्या केंद्र आणि गुजरात सरकार, कर विभाग, अंमलबजावणी संचालनालय त्यांच्या संपत्तीचा अधिक तपास करत आहेत. या तपासात आश्रमांसाठी बेकायदेशीररीत्या जमिनी गिळंकृत केल्याच्या तक्रारींचाही समावेश आहे.
3. भाजप-काँग्रेस नेत्यांशी जवळीक
भक्तांची संख्या वाढल्यानंतर राजकीय नेत्यांनीही आसाराम यांच्या माध्यमातून एका मोठ्या मतदार समूहावर आपली पकड घट्ट करण्याचा प्रयत्न केला.

1990 पासून 2000च्या दशकापर्यंत त्यांच्या भक्तांच्या यादीत भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि नितीन गडकरी यांसारखे दिग्गज नेते सामिल झाले होते.
यांच्याबरोबरीनं दिग्विजय सिंह, कमलनाथ आणि मोतीलाल व्होरा यांसारखे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुद्धा भक्तांच्या यादीत होते.
तसंच, भाजपचे विद्यमान आणि माजी मुख्यमंत्री सुद्धा आसाराम यांचं दर्शन घेण्यासाठी वारंवार जात राहिले आहेत. यात शिवराजसिंह चौहान, उमा भारती, रमण सिंह, प्रेमकुमार धूमल आणि वसुंधराराजे यांचा समावेश आहे. या सगळ्या नेत्यांपेक्षा 2000मध्ये आसाराम यांचं दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्यांच्या यादीत महत्त्वाचं नाव होतं ते म्हणजे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं.
मात्र, 2008मध्ये आसाराम यांच्या मुटेरा इथल्या आश्रमात दोन लहान मुलांच्या हत्या झाल्याचं प्रकरण समोर आलं आणि राजकीय नेत्यांनी त्यांच्यापासून दूर राहण्यास सुरुवात केली.
4. 2008चं मुटेरा आश्रमकांड
5 जुलै 2008ला आसाराम यांच्या मुटेरा आश्रमाबाहेरील साबरमती नदीच्या सुखलेल्या पात्रात 10 वर्षीय अभिषेक वाघेला आणि 11 वर्षीय दीपेश वाघेला यांचे अर्धे जळलेले आणि विकृत अवस्थेत असलेले मृतदेह आढळले.

फोटो स्रोत, PTI
अहमदाबादमध्ये राहणाऱ्या या चुलत भावंडांच्या मृत्यूच्या काही दिवस आधीच आसाराम यांच्या भक्तांनी तिथल्या 'गुरुकुल'मध्ये त्यांना प्रवेश दिला होता.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारनं डी. के. त्रिवेदी आयोगाची नियुक्ती केली होती. पण, आजतागायत या आयोगाचाचा अहवाल सर्वांसाठी खुला करण्यात आलेला नाही.
याच दरम्यान, 2012मध्ये गुजरात पोलिसांनी मुटेरा आश्रमाच्या 7 कर्मचाऱ्यांवर मुलांच्या हत्येचे आरोप निश्चित केले. या प्रकरणाची सुनावणी अद्याप अहमदाबादच्या सत्र न्यायालयात सुरू आहे.
5. जोधपूर बलात्कार प्रकरण
ऑगस्ट 2013मध्ये आसाराम यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करणारं शाहजहांपूरमधलं पीडित कुटुंब घटनेपूर्वी आसाराम यांच भक्त होतं. पीडितेच्या वडिलांनी स्वतःच्या खर्चातून शाहजहांपूर इथला आश्रम बांधला होता.

फोटो स्रोत, Getty Images
शिक्षणाचे चांगले संस्कार व्हावेत या आशेत त्यांनी आपली दोन्ही मुलं आसाराम यांच्या छिंदवाडा इथल्या गुरुकुलमध्ये शिक्षणासाठी पाठवली होती.
7 ऑगस्ट 2013 ला पीडितेच्या वडिलांना छिंदवाडा इथल्या गुरुकुलमधून फोन आला. तुमची 16 वर्षीय मुलगी आजारी पडली आहे, अशी त्यांना बतावणी करण्यात आली. दुसऱ्या दिवशी जेव्हा पीडितेचे आई-वडील छिंदवाडा इथल्या गुरुकुलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की, तुमच्या मुलीला भूतबाधा झाली आहे. ज्याला आसाराम घालवू करू शकतात.
14 ऑगस्टला पीडितेचं कुटुंब आसाराम यांना भेटण्यासाठी त्यांच्या जोधपूर इथल्या आश्रमात पोहोचलं. 15 ऑगस्टला संध्याकाळी 16 वर्षीय पीडितेला 'बरं' करण्याच्या बहाण्यानं आपल्या खोलीत बोलवून तिच्यावर आसाराम यांनी बलात्कार केला. असा उल्लेख या प्रकरणाच्या चार्जशीटमध्ये स्पष्टपणे करण्यात आला आहे.

फोटो स्रोत, YOUTUBE GRAB
पीडितेच्या कुटुंबासाठी ही घटना म्हणजे त्यांचे भगवान त्यांचे भक्षक झाल्यासारखी होती. विश्वास गमावल्यामुळे दुखावलेल्या या कुटुंबानं सुनावणीची गेली पाच वर्ष स्वतःच्या घरात जवळपास नजरकैदेत काढली आहेत.
पैशाची प्रलोभनं ते मारून टाकण्याच्या धमक्या मिळाल्या तरी हे कुटुंब आपल्या भूमिकेवर कायम राहिलं.
6. साक्षीदारांवर हल्ल्यांचं सत्र
28 फेब्रुवारी 2014च्या सकाळी आसाराम आणि त्यांचा मुलगा नारायण साई यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या सुरतच्या दोन बहिणींपैकी एकीच्या पतीवर जिवघेणा हल्ला झाला.
15 दिवसांतच दुसरा हल्ला आसाराम यांचे व्हीडिओग्राफर राकेश पटेल यांच्यावर झाला. या हल्ल्यानंतर काही दिवसांतच दिनेश भगनानी नावाच्या तिसऱ्या साक्षीदारावर सुरतच्या कपड्यांच्या बाजारपेठेत अॅसिड हल्ला झाला.

फोटो स्रोत, Getty Images
हे तिनही साक्षीदार या गंभीर हल्ल्यांनंतरही वाचले. यानंतर 23 मे 2014 ला आसाराम यांचे खाजगी सचिव म्हणून काम पाहिलेले अमृत प्रजापती यांच्यावर चौथा हल्ला झाला. पॉईंट ब्लँक रेंजच्या बंदुकीनं सरळ मानेला गोळी लागल्यानंतर 17 दिवसांनी प्रजापती यांचा मृत्यू झाला.
पुढचा हल्ला आसाराम प्रकरणात जवळपास 187 बातम्या लिहीणारे शाहजहांपूरचे पत्रकार नरेंद्र यादव यांच्यावर करण्यात आला. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या मानेवर तिक्ष्ण हत्यारानं वार केले. त्यांचं ऑपरेशन झालं आणि मानेवर 76 टाके पडले. या ऑपरेशननंतर त्यांना नवं आयुष्य मिळालं.

फोटो स्रोत, PTI
जानेवारी 2015मध्ये पुढचे साक्षीदार अखिल गुप्ता यांची मुजफ्फरनगरमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
बरोबर एका महिन्यानंतर आसाराम यांचे सचिव म्हणून काम पाहिलेल्या राहुल सचान यांच्यावर साक्ष दिल्यानंतर लगेच जोधपूर न्यायालयाच्या आवारातच जिवघेणा हल्ला झाला. राहुल त्या हल्ल्यात बचावले. पण, 25 नोव्हेंबर 2015 पासून आजपर्यंत राहुल गायब आहेत.
याच प्रकरणात आठवा हल्ला 13 मे 2015ला महेंद्र चावला या साक्षीदारावर पानिपतमध्ये हल्ला झाला. हल्ल्यात वाचलेल्या महेंद्र यांना आज अपंगत्व आलं आहे.
पुढे तीन महिन्यांनंतर जोधपूर प्रकरणात साक्षीदार असलेल्या 35 वर्षीय कृपालसिंह यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हत्येच्या काही आठवडे आधीच सिंह यांनी जोधपूर न्यायालयात पीडितेच्या बाजूनं साक्ष दिली होती.
7. महागडे वकील
गेल्या 5 वर्षांत या सुनावणी दरम्यान आसाराम यांनी स्वतःला वाचवण्यासाठी देशातल्या सर्वांत महागड्या आणि सुप्रसिद्ध वकीलांची मदत घेतली आहे.
आसाराम यांच्या बचावासाठी वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये आणि जामिनासाठी अर्ज करणाऱ्या वकिलांमध्ये राम जेठमलानी, राजू रामचंद्रन, सुब्रह्मण्यम स्वामी, सिद्धार्थ लूथरा, सलमान खुर्शीद, केटीएस तुलसी आणि यूयू ललित यांच्यासारख्यांचा समावेश आहे.
आजपर्यंत विविध न्यायालयांमध्ये आसाराम यांचे जामिन अर्ज 11 वेळा रद्द झाले आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








