पोप फ्रान्सिस यांनी मागितली लैंगिक पीडितांची माफी

फोटो स्रोत, EPA
धर्मोपदेशकांकडून लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या पीडितांची पोप फ्रान्सिस यांनी चिलीच्या दौऱ्यादरम्यान भेट घेतली. सँटियागो येथील व्हॅटिकन मिशनच्या कार्यालयात ही गोपनीय भेट झाली.
अत्यंत खासगी स्वरुपाच्या या कार्यक्रमाचा अन्य तपशील पोपच्या कार्यालयाने जाहीर केला नाही. पण त्यांनी पीडितांची माफी मागितली.
"धर्मोपदेशकांच्या वर्तनाचा फटका बसलेल्या पीडितांच्या व्यथा वेदनादायी आहेत. हा प्रकार अत्यंत लाजिरवाणा आहे," अशा शब्दांत पोप यांनी चिली भेटीदरम्यान आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
लैंगिक अत्याचारप्रकरणी दोषींना पीडितांनी माफ करावं, असंही पोप यांनी म्हटलं होतं.
पण धर्मोपदेशकातर्फे झालेले लैंगिक अत्याचार प्रकरण दाबणाऱ्या एका बिशपला दीक्षा देण्यावरून त्यांच्यावर टीका झाली.
अपरिमित नुकसान
"चर्चची विश्वासार्हता टिकवण्यासाठी लैंगिक अत्याचारप्रकरणी दोषींवर कारवाई होणं गरजेचं आहे. दोषींवर कडक प्रतिबंध लादणं अत्यावश्यक आहे," असं मत फ्रान्सिस यांनी याआधी व्यक्त केलं होतं.
ओसर्नोचे बिशप म्हणून ज्युआन बारोस यांच्या नियुक्तीचा फेरविचार करण्यासंदर्भातील विनंतीला पोप यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही, अशी टीका त्यांच्यावर चिलीत होत आहे.

फोटो स्रोत, EPA
आपले गुरू कॅथलिक प्रिस्ट फर्नांडो कराडिमा यांच्याविरोधातली चौकशी रोखण्याचा प्रयत्न करत बारोस यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला, असं दक्षिण चिलीतील धर्मोपदेशकांचं म्हणणं आहे.
लहान मुलामुलींच्या लैंगिक शोषणाप्रकरणी व्हॅटिकनतर्फे हाती घेण्यात आलेल्या चौकशीत फादर कराडिमा दोषी आढळले होते. त्यांनी या मुलामुलींना तपश्चर्या करण्याचा सल्ला दिला होता. कराडिमा दोषी आढळल्यानं चिलीतल्या कॅथलिक चर्च वर्तुळात खळबळ उडाली होती.
चर्चशी निगडीत व्यक्तींकडून झालेल्या अत्याचारामुळे या मुलामुलींचं कधीही भरून न निघणारं नुकसान झालं आहे, याचं फार वाईट वाटतं आहे, असं पोप यांनी म्हटलं होतं.
लैंगिक शोषणाविरोधात काम करणारे चळवळवादी एका परिषदेच्या निमित्ताने सोमवारी सँटियागोत एकत्र आले होते. धर्मगुरूंकडून होणारे लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी या चळवळवाद्यांनी 'Ending Clerical Abuse' नावाची स्वयंसेवी संस्था स्थापन केली आहे.
पीडितांची माफी मागणं पुरेसं होणार नाही. याप्रकरणी पोप यांनी दोषींवर कारवाई करणं अपेक्षित आहे, असं कार्यकर्ते ज्युआन कार्लोस क्रूझ यांनी सांगितलं.
लैंगिक अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोप फ्रान्सिस यांच्या कारकिर्दीत व्हॅटिकन समितीची स्थापना करण्यात आली. पीडितांना सर्वतोपरी मदत मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
दरम्यान चिलीत घडलेल्या प्रकरणासंदर्भात अधिक पारदर्शकता असायला हवी, असं पीडितांनी सांगितलं.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








