#5मोठ्याबातम्या : उन्नाव बलात्कार प्रकरण : आत्मसमर्पण न करताच परतले भाजप आमदार

कुलदीप सेंगर

फोटो स्रोत, TWITTER

फोटो कॅप्शन, कुलदीप सेंगर

भाजपचे उत्तर प्रदेशमधले आमदार कुलदीप सेंगर यांच्यावर एका 16 वर्षीय तरुणीने बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणी आत्मसमर्पण करण्यासाठी रात्री आपल्या 100 समर्थकांसह ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या घरी पोहोचले होते. बीबीसी हिंदीनं ही बातमी दिली आहे. यासह दिवसभरातल्या 5 मोठ्या बातम्या.

1. उन्नाव बलात्कार प्रकरण: आत्मसमर्पण न करताच परतले भाजप खासदार

पोलीस अधिकारी घरी नसल्यानं कुलदीप सेंगर यांनी तिथून निघून गेले. मात्र त्यापूर्वी प्रसारमाध्यमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, "मी बलात्काराचा आरोपी नाही. माझ्याविरोधात चुकीचा प्रचार केला जात आहे."

उत्तर प्रदेशातल्या बांगरमऊ मतदारसंघातून भाजपचे सेंगर आमदार आहेत.

"माझ्याविरोधात खोटी माहिती पुरवणाऱ्या लोकांचा इतिहास पाहण्यात आलेला नाही. मी न्यायव्यवस्थेचा आदर करतो. तसंच मी फरारी नाहीये. मी कुठेही गेलेलो नाही, हे सांगण्यासाठीच मी इथे आलो आहे" , असं सेंगर म्हणाले.

2017मध्ये एका तरुणीचा बलात्कार केल्याचा आरोप सेंगर यांच्यावर आहे. याप्रकरणी पीडित तरुणीची एफआयआर पोलिसांनी नोंदवून घेतली नव्हती. त्यानंतर तरुणीच्या घरच्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

त्यानंतर मात्र आमदाराकडून दबाव येत असल्याचं परिवाराचं म्हणणं आहे, असं बातमीत स्पष्ट केलं आहे.

2. शिवसैनिकांच्या खूनप्रकरणी आमदार कर्डिले यांना क्लीन चिट?

अहमदनगर येथील 2 शिवसैनिकांच्या खून प्रकरणातील आरोपी आणि सध्या अटकेत असलेले भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांची हकालपट्टी करावी, या शिवसेनेच्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही. दिव्य मराठीनं ही बातमी दिली आहे.

मृत संजय कोतकर यांचे आई-वडील आणि पत्नी

फोटो स्रोत, PRAVIN THAKARE/BBC

फोटो कॅप्शन, मृत संजय कोतकर यांचे आई-वडील आणि पत्नी

उलट मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना सबुरीचा सल्ला देत कर्डिले यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई केली जाणार नसल्याचे संकेत दिले आहेत.

दरम्यान कर्डिले यांच्या हकालपट्टीवर मुख्यमंत्र्यांनी मौन पाळलं असलं तरी दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे, असं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितलं आहे.

3. दहावीच्या पुस्तकांत कमळ फुलवले

दहावीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात अभ्यास मंडळानं कमळ फुलवल्याचा आरोप केला जात आहे. आर्थिक सुबत्तेसाठी भाजपशिवाय पर्याय नसल्याचे भासवण्याचा प्रयत्न पक्षाने यात केला आहे. सकाळनं यासंदर्भात बातमी दिली आहे.

कमळ

फोटो स्रोत, Reuters

दहावीचा अभ्यासक्रम यंदा बदलला आहे. इतिहास व राज्यशासास्त्र या विषयांच्या पुस्तकांत राष्ट्रीय आणि प्रादेशिक माहिती देताना भाजप कशाप्रकारे आर्थिक सुधारणांवर भर देतो हे पटवण्याचा प्रयत्न केला आहे.

घराणेशाहीवरून काँग्रेसला चिमटा काढताना कुटुंबाचा प्रभाव राहण्यासाठी नातेवाईकांना निवडणुकीत उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला जातो, असं पुस्तकात म्हटलं आहे.

4. इरफानच्या तब्येतीबद्दल अफवा?

महिन्याभरापूर्वी अभिनेता इरफान खान याने आपण neuroendocrine tumourचा उपचार घेण्यासाठी विदेशात जात असल्याचं ट्वीट केलं होतं.

इरफान खान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इरफान खान

तेव्हापासून इरफानच्या तब्येतीसंबंधी अनेक तर्कवितर्क लावण्यात येत होते. पण आता इरफानच्या प्रवक्त्यानेच त्याच्या चाहत्यांना यासंबंधीच्या खोट्या बातम्यांपासून दूर राहण्याचं सांगितलं आहे. हिंदुस्थान टाईम्सनं ही बातमी दिली आहे.

5. कावेरी निदर्शनामुळे आयपीएलचे सामने चेन्नईबाहेर

चेन्नई सुपर किंग्ज्स आणि कोलकाता नाईट राईडर्स यांच्या मॅचदरम्यान कावेरी पाणीप्रश्नावरुन करण्यात आलेल्या निदर्शनामुळे आयपीएल आणि चेन्नई सुपर किंग्ज्स यांना चेन्नईतून पाय काढता घ्यावा लागला आहे. आता चेन्नईचे उवर्रित सामने पुण्यात होणार आहेत. द इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.

बातमीनुसार, चेन्नईचे पोलीस आयुक्त ए. के. विश्वनाथन आणि चेन्नई सुपर किंग्ज्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांच्यात बुधवारी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

या निदर्शनामध्ये सामना सुरू असताना चेन्नईच्या खेळाडूंच्या दिशेने बूट फेकण्यात आल्याचं बातमीत म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)