You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोशल - 'सलमान खान सुपरस्टार असला तरी कायद्यापुढे तो सामान्य माणूसच!'
वीस वर्षापूर्वीच्या काळवीट शिकार प्रकरणात पाच वर्षं तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या सलमान खानची आजची रात्र जोधपूर मध्यवर्ती कारागृहात घालवणार आहे. शुक्रवारी त्याच्या जामीन अर्जावर जोधपूर सेशन्स कोर्टात सुनावणी होणार आहे.
1998 साली 'हम साथ साथ हैं' च्या चित्रिकरणाच्या वेळी घडलेल्या या प्रकरणात जोधपूर कोर्टाने सलमान खानला दोषी ठरवलं, मात्र सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम यांची निर्दोष सुटका केली आहे.
दरम्यान, आज सलमानला झालेल्या शिक्षेविषयी आम्ही वाचकांना त्यांच्या प्रतिक्रिया विचारल्या होत्या.
अनेकांनी कोर्टाचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी सलमानचं संजय दत्त तर होणार नाही ना? असा प्रश्न विचारला आहे.
"असं ग्राह्य धरलं की त्याने खरंच पाच वर्षं शिक्षा भोगली आणि तो बाहेर आला, तरी पाच वर्षांनी त्याचा "माज" उतरलेला नसेल ही काळ्या दगडावरची रेघ आहे," असं मत सुशील कुमार बुरकुल यांनी व्यक्त केलं आहे. तसंच, "सलमान खान सोबतच्या जोडीदारांनाही शिक्षा होणं गरजेचं आहे, कारण नाही म्हटलं तरी सर्वांनीच काळवीटाचं मांस यथेच्छ चाखलं आहे," असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
"इथे किंचित चुकतोय का आपण? तो एक प्रसिद्ध नट असला तरी कायद्यापुढे सामान्य माणूसच आहे. आपण, म्हणजेच फक्त मीडिया नाही तर आपण सगळेच या गोष्टीला इतकं महत्त्व का देतो," असं प्रश्न सुवर्णा दामले यांनी विचारला आहे.
"त्याने गुन्हा केला, त्याची शिक्षा त्याला मिळाली. इतकं साधं गणित आहे. तसंच, या घटनेमुळे लोकांना वन्यजीव संरक्षण कायदा आणि वन्य प्राण्यांशी संबंधित असलेले इतर कायदे समजले का? तर नाही, सफारी करताना, झू पाहताना आपल्या कोणत्या वागणुकीमुळे आपल्याला शासन होऊ शकतं हे कळलं का? नाही," असंही त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.
"20 वर्षांनंतर झालेल्या पाच वर्षाच्या शिक्षेत सलमान घरी किती आणि जेलमध्ये किती काळ राहतो, हे पुढे पहायला मिळेलच," असं मत रोहीत गवाळे यांनी व्यक्त केलं आहे.
काळवीट प्रकरणात सलमानला झालेली शिक्षा योग्यच आहे, असं मत हर्षल जाधव यांनी व्यक्त केलं आहे. परंतु ज्याप्रकारे मुक्या प्राण्यांच्या हत्येमध्ये सलमानला शिक्षा झाली त्याचप्रकारे "हिट अँड रन" प्रकरणातही शिक्षा झाली असती तर अजून आनंद झाला असता, असं ही त्यांनी पुढे नमूद केलं आहे.
तुषार व्हनकटे यांनी "एक तर या शिक्षेची नीट अंमलबजावणी होणार का? की सुट्टी घेऊन सलमान सतत बाहेर येणार?" असा शंका उपस्थित केली आहे. तसंच, "हिट अँड रन केसमध्ये कोणीच कसं सापडलं नाही? गाडी auto drive होती का?" असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
"काळवीट शिकार प्रकरणी "टायगर" दोषी, तैमुरचे पप्पा आणि तीन आत्त्या निर्दोष मुक्त! जंगलात उत्साही वातावरण," अशी मिश्किल प्रतिक्रिया प्रदीप पाटील यांनी दिली आहे.
"साखळदंड हत्तीचं जितकं नुकसान करू शकत नाही त्याहीपेक्षा कित्येक पटीने एक बारीकशी मुंगी महागात पडते. त्याने सशर्त माफी मागितली असती तर गोष्टी सोप्या झाल्या असत्या. दोन काळविटांच्या बदल्यात तो दोनशे काळविटांची काळजी सहज घेऊ शकतो पण इगोमुळे सोपा मार्ग अवघड केला," असं मत गौरी चौधरी यांनी व्यक्त केलं आहे.
तर "दंड लावून सोडून द्या किंवा त्या बदल्यात हजार काळविटांच्या पालन पोषणाची शिक्षा द्यायला पाहिजे," असा सल्ला विजय कांबळे यांनी दिला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)