ममता बॅनर्जी यांचा नेमका विचार तरी काय?

फोटो स्रोत, RAVEENDRAN/AFP/GETTY IMAGES
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दोन दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून होत्या. त्यांनी विरोधी पक्षनेते आणि प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना भेटून चर्चा केली.
ममता बॅनर्जी यांनी बुधवारी (28 मार्च) रात्री उशिरापर्यंत 10, जनपथवर सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली. येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करायचा असेल तर सर्व प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षांना एकत्र यावं लागणार आहे, असं त्यांना वाटतं. "2019च्या लोकसभा निवडणुकीत सर्व जागांवर एकास एक लढत व्हावी," असं सोनिया गांधी यांच्याशी झालेल्या भेटी नंतर ममता बॅनर्जींनी सांगितलं.
सुरुवातीला ममता बॅनर्जी या बिगर भाजप आणि बिगर काँग्रेस अशा तिसऱ्या आघाडीच्या तयारीत असल्याची चर्चा चालू होती. पण, सोनिया गांधी यांच्याशी भेट घेतल्यानंतर या चर्चेवर पडदा पडला आहे.

फोटो स्रोत, DESHAKALYAN CHOWDHURY/AFP/GETTY IMAGES
सोनिया गांधी यांच्या भेटीअगोदर ममता बॅनर्जी यांनी भाजपमधील नाराज नेते अरूण शौरी, शत्रुघ्न सिन्हा आणि यशवंत सिन्हा यांच्याशी चर्चा केली.
यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिला आहे. ममता बॅनर्जी या देशहितासाठी हे पाऊल उचलत आहेत, असं शत्रुघ्न सिन्हा यांनी जाहीर केलं आहे.
ममता बॅनर्जी यांनी भेट घेतलेल्या नेत्यांची यादी लांबलचक आहे. गेल्या काही दिवसांत त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव आणि द्रमुक पक्षाच्या कनीमोई यांच्याशी चर्चा केली आहे. त्याचबरोबर, YSR काँग्रेस आणि बिजू जनता दल यांच्याबरोबरच, एनडीए सरकारमधून बाहेर पडलेल्या तेलगू देसम पक्षांच्या खासदारांशीही चर्चा केली आहे.

फोटो स्रोत, BJP @TWITTER
पण अशा झटपट भेटी घेऊन लोकसभा निवडणुकीच्या अगोदर ममता बॅनर्जी सर्व पक्षांची युती करण्यात यशस्वी होतील का? एकमेकांमधील मतभेद दूर करून सर्व पक्ष एकाच व्यासपीठावर येतील का? 'द हिंदू'या वृत्तपत्राचे कोलकाता ब्युरो चीफशुभोजित बागचीयांच्याशी बीबीसी प्रतिनिधी मानसी दाश यांनी या प्रश्नांवर चर्चा केली.
शुभोजीत बागची म्हणतात...
सध्याची राजकीय परिस्थिती बघता लोकसभा निवडणुकींच्या अगोदर विरोधी पक्ष युती करतील. पण या युतीचं नेतृत्व काँग्रेस करणार की इतर पक्ष? हा मुख्य मुद्दा असणार आहे.
ममता बॅनर्जी या प्रादेशिक पक्षांची आघाडी करण्याच्या बेतात आहेत. यासंदर्भात तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाच्या नेत्यांशी त्यांनी अगोदरच चर्चा केली आहे.

फोटो स्रोत, DIBYANGSHU SARKAR/AFP/GETTY IMAGES
आणखी काही पक्षांना ममता एकत्र आणू शकल्या तर त्यांचं उद्दिष्ट साध्य होऊ शकतं.
ममता बॅनर्जी यांना नक्की काय पाहिजे?
पश्चिम बंगाल मधून एकूण 42 खासदार लोकसभेवर निवडून येतात. यामध्ये त्यांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे. मित्र पक्षांना एकत्र घेऊन 60-70 खासदार निवडून आणू शकल्या तर नेतृत्वाची जबाबदारी ममता यांच्याकडे येऊ शकते.
लोकसभा निवडणुकीसाठी अजून भरपूर वेळ आहे. काँग्रेसबरोबर आघाडी केली तर बंगालमध्ये ममता काँग्रेसला किती जागा देतील हा कळीचा मुद्दा ठरणार आहे.

फोटो स्रोत, DIPTENDU DUTTA/AFP/GETTY IMAGES
बंगालमध्ये तृणमूल काँग्रसने स्वत:च्या बळावर निवडणूक लढवली तर ते जास्त जागा जिंकू शकतील. आघाडी झाल्यावर काँग्रेसनं 10-12 जागा मागितल्या तर ममता त्या देणार नाहीत. कारण, काँग्रेस बंगालमध्ये कमकुवत आहे हे त्यांना माहीत आहे.
एकास एक फॉर्म्युला अशक्य
सर्वप्रथम पश्चिम बंगालमध्येच एकास एक फॉर्म्यूला राबवणं अवघड जाणार आहे. कम्युनिस्ट पक्ष बंगालमध्ये आपले उमेदवार उभे करणार. मग बंगालमध्येच जागांची विभागणी करण्यात कसोटी लागणार आहे.
बंगालच्या बाहेर तृणमूल काँग्रेस जागा जिंकू शकत नाही. म्हणून त्याठिकाणी एकास एक फॉर्म्यूला लागू करणं सोपं आहे. त्याचा बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा फायदा होईल.
सध्यातरी 50-60 जागांवर सरळ विजय कसा मिळवता येईल, यावर त्या लक्ष केंद्रित करत आहेत. त्यानंतर आणखी एका पक्षाचा पाठिंबा मिळवू शकतात. थोडक्यात, ममता बॅनर्जी दिल्लीतल्या राजकीय आखाड्याचा अंदाज घेत आहेत. भाजपविरोधी पक्षांच्या भेटी हे त्याचंच सुतोवाच आहे.
भाजप नेत्यांशीही चर्चा
भाजपचे रविशंकर प्रसाद यांचीही ममता बॅनर्जी यांनी भेट घेतली आहे. सत्तेसाठी त्या सर्व दरवाजे उघडे ठेवत असल्याची चर्चा होत आहे. म्हणजे, भाजपला पाठिंब्याची गरज पडली तर त्या पाठिंबा देऊ शकतात.

फोटो स्रोत, ROBERTO SCHMIDT/AFP/GETTY IMAGES
नरेंद्र मोदी यांच्यावर मात्र ममता बॅनर्जी नाराज आहेत. मोदी यांना सोडून दुसरं कुणी नेतृत्व करणार असेल तर ममता भाजपला पाठिंबा देऊ शकतात. पण सध्या तशी परिस्थिती दिसत नाही.
बंगालमध्ये 30 टक्के मुस्लीम लोकसंख्या आहे. मोदी यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देणं हे तृणमूलला घातक ठरू शकतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








