पाहा फोटो : शेतकऱ्यांच्या लाँग मार्च मुंबईत धडकला, 12 मार्चला घालणार विधानभवनाला घेराव

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय किसान सभेनं विधान भवनला घेराव घालण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शेतकरी लाँग मार्चनं मुंबईत ये आहेत. 6 मार्चला दुपारी या लाँग मार्चला सुरुवात झाली असून 12 मार्चला मुंबईत हे शेतकरी पोहोचतील.

नाशिकहून निघालेल्या लाँग मार्चमध्ये वार्तांकनासाठी सहभागी झालेले पत्रकार पार्थ मीना निखिल यांनी बीबीसी मराठीला या मोर्चाबाबत माहिती दिली. ते सांगतात की, "मोर्चात पहिल्या दिवशी 25 हजार शेतकरी सहभागी होते. मुंबईत येईपर्यंत ही संख्या 50 हजार होणार आहे. मोर्चात 96 वर्षांच्या आजोबांसह महिलाही मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या आहेत."

शेतकऱ्यांच्या या लाँग मार्चमध्ये आदिवासी शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत. वनजमिनींचा संपूर्ण ताबा शेतकऱ्यांना मिळावा अशी प्रमुख मागणी त्यांच्याकडून होत आहे. याचबरोबरीनं, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, शेतकऱ्यांसाठी पेंशनची तरतूद केली जावी, बोंड अळीग्रस्त आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना विनाशर्त तातडीनं मदत मिळावी या मागण्याही त्यांनी केल्या आहेत.

नाशिकहून निघालेला हा मार्च शनिवारपर्यंत ठाण्याजवळील भिवंडी इथे पोहोचला होता. यावेळी मार्चमध्ये मोठ्या संख्येनं शेतकरी होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील फलक उंचावून हे शेतकरी सरकारचा निषेध करत होते.

लाँग मार्चमध्ये आदिवासी समाजातील लोककलाकारही सहभागी झाले आहेत. आदिवासी समाजाचे पारंपरिक असलेले पावरी हे वाद्य वाजवणारे हे दोन लोककलाकार. त्यांच्यासह वासुदेव यांसारखे अन्य लोककलाकारही सहभागी झाले आहेत.

शेतकऱ्यांचा हा लाँग मार्च एकूण आठवडाभर चालणार असूनही महिलांनीही मोठ्या संख्येनं मार्चमध्ये सहभाग नोंदवला आहे. निषेधाचे फलक घेऊन महिलाही आघाडीवर आहेत.

भारतीय किसान सभेचे पदाधिकारी जे. पी. गावीत म्हणाले की, "शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी विधान भवनाला घेराव घालण्यात येईल. सरकारनं वेगळा मार्ग अवलंबला तर शहीद म्हणून घरी येऊ. मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाही."

सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, त्या शिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा भारतीय किसान सभेनं नाशिकमध्ये दिला आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी संप केला होता. त्यानंतर शेतकरी आत्महत्या, बोंड अळीची समस्या, कर्जमाफी, गारपीट अशा मुद्द्यामुळे हा लाँग मार्च लक्षवेधी ठरला आहे.

हे वाचलं का?

हे पाहिलं का?

भारतीय किसान सभेच्या या लाँग मार्चमधून बीबीसी मराठीने केलेलं फेसबुक लाईव्ह तुम्ही इथं पाहू शकता.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)