त्रिपुरामध्ये 'मोदी सरकार' विरुद्ध माणिक सरकार

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सलमान रावी
- Role, बीबीसी प्रतिनिधी, अगरतळा
त्रिपुरा विधानसभेसाठी रविवारी (18 फेब्रुवारी) आज मतदान होत आहे. पण ही निवडणूक आजपर्यंतच्या निवडणुकांपेक्षा वेगळी आहे. कारण यावेळी संघर्ष आहे तो भाजप आणि डावे यांच्यात.
यंदाच्या निवडणुकीत त्रिपुरामध्ये संघर्षाच्या रेषा स्पष्ट झाल्या आहेत. यावेळचा संघर्ष हा कडवा आणि दोन जणांमधला असणार आहे. गेल्या पाच विधानसभा निवडणुकांमध्ये हा संघर्ष डावे आणि काँग्रेस यांच्यात झाला होता.
त्रिपुरामध्ये भाजपने बदलाचा नारा देत यंदा विधानसभा निवडणुकांमध्ये आपली पूर्ण ताकद लावली आहे. गेल्या गुरुवारी निवडणूक प्रचार थांबण्याच्या एक दिवस आधी त्रिपुराची राजधानी अगरतळा आणि दक्षिण त्रिपुरामध्ये प्रधानमंत्र्यांच्या दोन प्रचारफेऱ्या झाल्या.
त्रिपुराच्या 60 सदस्य असलेल्या विधानसभेसाठीची निवडणूक म्हणूनच लक्षवेधी ठरलेली आहे.
भाजपचा मोदींवर भरवसा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या प्रचारफेऱ्यांना मिळालेला प्रतिसाद पाहता भाजप कार्यकर्त्यांच्या उत्साहात भर पडली आहे. तरी, यावेळी भाजपनं मुख्यमंत्री म्हणून कोणताच चेहरा पुढे केलेला नाही. त्यांना 'मोदी सरकार'वर भरवसा आहे. अनेक राज्यांतून आलेल्या भाजपच्या मोठ्या नेत्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली.
मात्र, दुसरीकडे डाव्या नेत्यांना आपलं 25 वर्षांचं सरकार आणि मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्या प्रतिमेवर विश्वास आहे.

भारतातले सगळ्यांत गरीब मुख्यमंत्री म्हणून जी प्रतिमा माणिक सरकारची तयार झाली आहे, त्या तोडीचा नेता इथल्या पक्षांमध्ये नाही. याच कारणामुळे भाजप आपली नौका पैलतीरी लावण्यासाठी 'मोदी सरकार'कडे डोळे लावून बसला आहे.
शांत जीवन व्यतित करणाऱ्या माणिक सरकार यांना भाजप विकास आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर घेरण्याचा प्रयत्न करत आहे. त्रिपुराच्या सध्याच्या सरकारनं विकास रोखून धरला आहे, असा आरोप आपल्या प्रचारसभांदरम्यान पंतप्रधान मोदींनी माणिक सरकार यांच्यावर केला आहे.
माणिक सरकारवर भिस्त
पण, मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्या निशाण्यावर केवळ मोदी सरकार आहे. त्यांच्या पक्षाचे नेते आपल्या प्रचारांत नोटबंदी आणि जीएसटीच्या मुद्द्यांवर जोर देत आहेत.
अगरतळा इथल्या उशाबाजार इथे आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करताना माणिक सरकार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
मोदींवर टीका करताना ते म्हणाले, "मोदी ज्या विकासाची गोष्ट करत आहेत, तो विकास केवळ धनाढ्यांचा विकास आहे. या सराकारनं रिक्त सरकारी पदांना संपवून टाकलं आहे. त्यामुळे लाखोंनी बेरोजगारांची फौज तयार झाली आहे."

तर, भाजपचे महासचिव राम माधव यांनी डाव्यांवर हिंसक राजकारणाचा आरोप लावला आहे. ते म्हणाले की, "डावे पक्ष केरळप्रमाणेच त्रिपुरामध्येही हिंसेचे राजकारण करत आहे."
त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अनेकदा हल्ले झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच यावेळी त्यांच्या पक्षानं स्थानिक भाषेत 'चोलो पालटाई' म्हणजेच 'चला बदलूयात'चा नारा दिला आहे.
भाजपच्या या घोषणेची टर उडवत माणिक सरकार यांनी एका प्रचार सभेत उपस्थितांना सांगितलं की, या घोषणेचे अर्थ असा की 'चला पक्ष बदलूयात.' म्हणजेच त्यांचा इशारा अशा नेत्यांकडे होता ज्यांनी पहिले काँग्रेस नंतर तृणमूल काँग्रेस आणि आता भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवत आहेत.
तुम्ही हे बघीतलं का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








