'हो! तोंड बंद ठेवायला पॉर्नस्टारला पैसे दिले!' : ट्रंप यांच्या वकिलांची कबुली

2006 मध्ये ट्रंप याच्याशी आपले संबंध असल्याचा आरोप या अभिनेत्रीने 2011 मध्ये केला होता.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2006 मध्ये ट्रंप यांच्याशी आपले संबंध असल्याचा आरोप या अभिनेत्रीने 2011 मध्ये केला होता.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याशी असलेल्या कथित संबंधांवर कुठेही बोलू नये, म्हणून आपण एका पॉर्नस्टारला वैयक्तिकरीत्या 1,30,000 डॉलर्स दिल्याची कबुली ट्रंप यांच्या वकिलांनी 'द न्यूयॉर्क टाइम्स'कडे दिली आहे.

अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टॉर्मी डॅनिएल्स नावाच्या पॉर्नस्टारला ट्रंप यांच्याशी कथित संबंधाबद्दल वाच्यता करण्यापासून रोखण्यासाठी हा करार करण्यात आला होता.

ट्रंप यांच्यासोबत संबंध असल्याचं स्टॉर्मी यांनी 2011ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. ट्रंप यांनी त्या दाव्याचं जोरदार खंडन केल्याचं त्यांचे खासगी वकील मायकल कोहेन यांनी सांगितलं आहे.

"क्लिफोर्ड (स्टेफनी ग्रेगोरी क्लिफोर्ड, असं या स्टॉर्मी यांचं खरं नाव आहे) यांच्याशी झालेल्या व्यवहारांत ट्रंप ऑर्गनाझेशन किंवा ट्रंप कँपेन सहभागी नाहीत. तसेच दोन्हीपैकी कुणीही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मला या पैशांची परतफेड केलेली नाही," असं द न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या निवेदनात वकील मायकल डी. कोहेन यांनी म्हटलं आहे.

ट्रंप यांच्या कँपेनसाठी अवैध मार्गानं राजकीय योगदान दिल्याबद्दल काही संघटनांनी तक्रार केली होती. यावर निवडणूक आयोगालाही मी हेच सांगितलं आहे, असं ते म्हणाले आहेत.

"किल्फॉर्ड यांना देण्यात आलेले पैसे हे कायदेशीरच आहेत. तो ट्रंप यांच्या निवडणूक प्रचारासाठीच्या खर्चाचा किंवा निवडणूक निधीचा भाग नव्हता," असं कोहेन म्हणाले आहेत.

पैशांचा खाजगी व्यवहार का करण्यात आला याचं उत्तर देणं टाळल्याचं वृत्तपत्रानं म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पैशांचा खाजगी व्यवहार का करण्यात आला याचं उत्तर देणं टाळल्याचं वृत्तपत्रानं म्हटलं आहे.

दरम्यान, आता ट्रंप यांच्याच वकिलांनीच हे प्रकरण उघडकीस आणल्याने आता किल्फॉर्ड कुठलीही गोपनीयता बाळगण्यास बांधील नाही, असं किल्फॉर्ड यांच्या मॅनेजर जिना रॉड्रिग्स म्हणाल्या.

"आता तर सगळंकाही उघड आहे, म्हणून आता स्टॉर्मी तिची बाजू मांडण्यास मोकळी आहे," असं रॉड्रिग्स यांनी असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेला बुधवारी सांगितलं.

गेल्या महिन्यात एका सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित डॅनिएल्स

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गेल्या महिन्यात एका सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित डॅनिएल्स

मेलनिया ट्रंप यांनी त्यांचा मुलगा बॅरोनला जन्म दिल्यानंतर ट्रंप यांच्याशी लैंगिक संबंध होते, असं स्टॉर्मी यांनी 2011मध्ये 'इनटच' या नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.

2016च्या निवडणुकीदरम्यान या प्रकरणाची चर्चा न करण्यासाठी एका कराराअंतर्गत त्यांना पैसे देण्यात आल्याचं वृत्त वॉलस्ट्रीट जर्नलने प्रसिद्ध केल्यानंतर ही माहिती पुढे आली.

हे पैसे का देण्यात आले आणि ट्रंप यांना याबाबतीत माहीत होतं का, या प्रश्नाचं उत्तर कोहेन यांनी टाळल्याचं द न्यूयॉर्क टाइम्सने म्हटलं आहे.

स्टॉर्मी डॅनिएल्स यांनी ट्रंप यांच्याबरोबर त्यांचे संबध नव्हते, असं सांगणारं निवेदन जानेवारीमध्ये प्रसिद्धीप्रमुखाच्या माध्यमातून दिलं आहे.

त्यानंतर अनेकवेळा त्यांनी सार्वजनिक आणि टीव्हीवरही याबद्दल थेट उत्तर देणं टाळलं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)