इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंचं काय होणार?

फोटो स्रोत, Reuters
पंतप्रधान म्हणून पहिल्या कार्यकाळात स्थानिक प्रसारमाध्यमांनी बेंजामिन नेतान्याहू यांचं वर्णन जादूगार असं केलं होतं. अवघड परिस्थितीतून मार्ग काढण्याच्या त्यांच्या कौशल्यामुळे त्यांना ही बिरुदावली प्राप्त झाली होती.
1996मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवार शिमोन पेरेस यांना नमवत नेतान्याहू यांनी अनपेक्षित विजयाची नोंद केली होती. तेव्हापासून त्यांच्या जादुई करिष्म्याची चर्चा आहे.
नेतान्याहूंचं नशीब म्हणा किंवा कौशल्य. पण आता ते सगळं ओसरू लागलं आहे. नेत्यान्याहूंच्या कुटुंबावर भ्रष्टाचाराचे आरोप गेली अनेक वर्ष होत आहेत. यापैकी अनेक आरोपांचं स्वरूप अफवा आणि टोमण्याचं होतं. पण आता या आरोपांचा फास ठोस पुराव्यांनिशी घट्ट आवळत चालला आहे.
नेतान्याहू आणि त्यांच्या कुटुंबीयांची चार प्रकरणांत चौकशी करण्यात येत आहे. यापैकी दोन थेट नेतान्याहू आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित आहेत. अन्य दोन प्रकरणं नेतान्याहूंच्या अगदी जवळच्या आणि विश्वासार्ह व्यक्तींशी संबंधित आहेत.
हॉलीवूड उद्योजक अरनॉन मिल्चन तसंच ऑस्ट्रेलियास्थित उद्योगपती जेम्स पॅकर यांच्याकडून प्रचंड रकमेची गिफ्ट्स स्वीकारल्याचा आरोप नेतान्याहू आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आहे. गिफ्ट्ससाठीची रक्कम आणि अन्य तपशील दुर्लक्षित करण्यासारखे नाहीत, असं इस्राईलचे कायदे सांगतात.
नेतान्याहूंच्या पत्नी सारा यांच्यावर 113, 100 डॉलर्स रकमेच्या गिफ्ट्स स्वीकारल्याचा आरोप आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानी कुटुंबीयांसाठी सातत्याने शाही मेजवान्यांचं आयोजन केल्याचाही आरोप आहे. साधारणत: इस्राईलला भेट देणाऱ्या विदेशी देशांच्या प्रमुखांसाठी अशा मेजवान्यांचं आयोजन केलं जातं.

फोटो स्रोत, AFP/Getty Images
इस्राईलमधील प्रसारमाध्यमांनी एवढी दौलताजादा करण्याबाबत नेतान्याहू यांच्या पत्नी सारा यांच्या चंगळवादी जीवनशैलीला जबाबदार धरलं आहे. पंतप्रधानांच्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वाईट वागणूक देण्याचा आरोपही सारा यांच्यावर आहे.
नेत्यान्याहूंच्या धोरणांना सकारात्मक प्रसिद्धी मिळावी म्हणून 'येडिओत अहनारोत' या वर्तमानपत्राशी डील केलं असा सारा यांच्यावर आरोप आहे. या बदल्यात त्यांनी या वर्तमानपत्राचा प्रतिस्पर्धी 'इस्रायल हायोम' या वर्तमानपत्राची ताकद संपवण्यासाठी प्रयत्न केले. 'इस्रायल हायोम' हा अमेरिकन सिनेटर शेल्डन अडेलसन यांच्या मालकीचा पेपर आहे. या पेपरची भूमिका नेहमीच उदारमतवादी राहिलेली आहे.
'येडिओत अहनारोत' वर्तमानपत्राचे प्रकाशक अरनॉन मोझेस आणि नेतान्याहू यांच्या कर्मचारीवृंदाचे प्रमुख अरी हरो यांच्यातील गुप्त दूरध्वनी संभाषण उघड झाल्यानं हे प्रकरण उजेडात आलं आहे. हरो आता साक्षीदार आहेत.
नेतान्याहू यांचे भाऊ आणि वकील डेव्हिड शिमरॉन यांचीही चौकशी सुरू आहे. जर्मनीच्या 'थ्यासीन क्रुप' कंपनीकडून युद्धनौका खरेदीप्रकरणी डेव्हिड यांना चौकशीला सामोरे जावे लागत आहे. इस्राईल नौदलाच्या माजी प्रमुखांसह अनेकांना या खरेदीप्रकरणी ताब्यात घेण्यात आलं आहे. अनधिकृत दबावगट, अप्रत्यक्ष लाच आणि आता साक्षीदार झालेले प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी या सगळ्यांचा यामध्ये समावेश आहे.
आणखी एकाप्रकरणात नेतान्याहूंच्या लिकूड पक्षाच्या केंद्रीय समितीचे माजी प्रमुख श्लोमो फिल्बर यांच्यावर संशयाची सुई आहे. 2015च्या निवडणुकीनंतर श्लोमो यांची दूरसंचार खात्याच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली.
ब्रॉडबँड क्षेत्रात सुधारणांचा प्रस्ताव आणणाऱ्या माजी महासंचालकांना पदावरून बाजूला सारत नेतान्याहू यांनी श्लोमो यांची वर्णी लावली. इस्राईलमधील टेलिकॉम क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असणाऱ्या बेझेकला गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप श्लोमो यांच्यावर आहे. मात्र श्लोमो यांनी या आरोपांचा इन्कार केला आहे.
ज्यू विचारांशी प्रतारणा
नेतान्याहू यांची वर्तणूक इस्राईलच्या निर्मितीचा मुख्य गाभा असलेल्या ज्यू विचारांशी प्रतारणा करणारी असल्याची भावना आहे. उजव्या तसंच डाव्या विचारसरणीच्या लोकांमध्ये नेतान्याहूंविषयी नाराजीची भावना आहे.
इस्राईलचे संस्थापक डेव्हिड बेन गुरिअन नेगेव्ह जिल्ह्यातील किबुट्झ स्डे बोकूर गावात एका लहानशा घरात राहत असत. चंगळवादी गोष्टींपेक्षा आपलं ग्रंथालय सुसज्ज असण्यावर त्यांचा भर असे.

फोटो स्रोत, GPO/Getty Images
माजी पंतप्रधान आणि लिकूड पक्षाचे नेते मेनॅकम बेगिन आपल्या पत्नीसह तेल अवीव समुद्रकिनाऱ्याजवळच्या एका लहानशा घरात राहत असत.
पण नेतान्याहू यांच्या पक्षाकडूनच आता भ्रष्टाचाराविरोधात जाहीर प्रदर्शनं होत आहेत.
आंदोलकर्त्यांनी व्लादिमीर जबोटिनस्की यांचं उदाहरण देत विरोध तीव्र केला. कधीही पैशाच्या मागे न लागता काम करणाऱ्या आणि भ्रष्टाचाऱ्यांची निर्भत्सना करणाऱ्यांमध्ये व्लादिमीर यांचं नाव आघाडीवर आहे.
1980मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक निर्बंधातून मुक्त झालेल्या इस्राईलमध्ये अनेक अब्जाधीश तयार झाले. राजकारण्यांना स्वत:ची कारकीर्द घडवण्याची संधी मिळाली. यानिमित्ताने राजकारण्यांना बड्या उद्योजकांच्या सहकार्याने आर्थिकदृष्ट्या सधन होण्याचा मार्गही गवसला.
नेतान्याहूंच्या आधीचे पंतप्रधान इहुद बराक आणि एरियल शेरॉन यांची विविध प्रकरणी चौकशी सुरू आहे. इहुद ओल्मर्ट दोषी आढळल्याने त्यांना तुरुंगवास भोगावा लागला.
ज्यू तसंच इस्राईलच्या निर्मितीवेळच्या मू्ल्यव्यवस्थेशी प्रतारणा असल्याचं वातावरण आहे.
दरम्यान नेतान्याहू यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. डोनाल्ड ट्रंप यांच्याप्रमाणे नेतान्याहू यांनी पोलीस तसंच विरोधी पक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
नेतान्याहूंविरोधात हाती घेण्यात आलेल्या शोधपत्रकारिता मोहिमा डाव्या विचारसरणीच्या माध्यमांचं काम असल्याचं चित्र आहे.
पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर नेतान्याहू यांनी वृत्तवाहिन्यांना प्रदीर्घ मुलाखत दिली. मी निर्दोष आहे आणि इस्राइलप्रति माझी निष्ठा कायम आहे, असा दावा नेतान्याहू यांनी केला.
"माझ्यावरील आरोप म्हणजे माझी वैयक्तिक तसंच कुटुंबाची प्रतिमा मलिन करण्याचा कुटील डाव आहे," असं नेतान्याहू यांनी सांगितलं.
पदावर कायम राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. युतीचं सरकार नागरिक तसेच देशाप्रति कटिबद्ध राहून काम करेल, असंही नेतान्याहू यांनी सांगितलं.
विरोधी पक्षांनी नेतान्याहू यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
नेतान्याहूप्रणित युती सरकार इस्राइलमध्ये गेले दशकभर सत्तेत आहे. आरोपांप्रकरणी नेतान्याहू यांना न्यायालयात हजर राहावे लागणे, म्हणजे सरकारच्या अस्तित्वाला धोका असल्याचं मत सरकारमधील उजव्या विचारसरणीच्या नेत्यांना वाटतं.

फोटो स्रोत, Reuters
शिक्षणमंत्री नफ्ताली बेनेट यांना नेतान्याहू यांचे राजकीय स्पर्धक मानले जातात. काही किरकोळ गोष्टींसाठी पंतप्रधान पदावरील व्यक्तीला दूर का करावे, असा सवाल बेनेट यांनी केला. नेतान्याहू यांना राजीनामा देण्याची गरज नाही असं कायदेमंत्री अयालीत शकीद यांनी सांगितलं.
नेत्यान्याहू यांच्यावरील आरोपांमुळे जनतेसमोरही पेच निर्माण झाला आहे.
नेतान्याहू यांना पंतप्रधानपदी राहण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी भावना आहे. मात्र अरबविश्वात सातत्याने होणाऱ्या घडामोडींदरम्यान शांतता राखण्याच्या दृष्टीने नेतान्याहू आवश्यक आहेत, असं मानणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
इस्राईलचा कट्टर शत्रू इराणनं सीरियामध्ये इस्राईलच्या विरोधात जमवाजमव केली आणि लेबनॉनमध्ये शस्त्रपुरवठा सुरूच ठेवला तर मात्र नागरिक नेतान्याहू यांच्या उणिवांकडे दुर्लक्ष करतील, कारण या परिस्थितीमध्ये सुरक्षेचा मुद्दा अग्रक्रम घेईल.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








