You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
या शहरात मृतांसाठी एक इंचही जागा नाही
- Author, शहनाझ परवीन
- Role, बीबीसी बंगाली, ढाका
ढाक्यामधील अनेक दफनभूमी दाटीवाटीने अस्तित्वात आहेत. या सर्व दफनभूमी तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत, कारण बांगलादेशाच्या राजधानीत मृतांसाठी आता जागा नाही. पण जेव्हा तुमच्या प्रियजनांना पुरलेली जागेवर आणखी कोणी अतिक्रमण करतं तेव्हा तुम्ही काय करू शकता?
सुरैया परवीन आता त्यांच्या वडिलांच्या कबरीला भेट देऊ शकत नाही कारण त्यांच्या जागेवर आता दुसऱ्याच व्यक्तीची कबर आहे.
"मी सगळ्यात मोठी मुलगी असल्यामुळे मी सगळ्या गोष्टींची काळजी घेते. मी काही दिवसांपूर्वीच माझ्या भावाला त्याने कबरीला भेट दिला का, याबद्दल विचारलं होतं." ढाकाच्या उपनगरातील एका छोट्य़ा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सुरैया त्यांचा अनुभव बीबीसीला सांगत होत्या.
सुरुवातीला त्या थोड्या संकोचल्या. पण नंतर त्यांनी सांगितलं की त्यांच्या वडिलांच्या जिथं दफनविधी झाला आहे, त्या जागेवर आता एक नवीन कबर अस्तित्वात आली आहे.
"अन्या एका कुटुंबानं या जागेवर त्यांच्या मृत नातेवाईकाचा दफनविधी केला होता. तिथं सिमेंटचं बांधकामही केलं होतं. ही बातमी माझ्यासाठी प्रचंड धक्कादायक होती," हे सगळं सांगताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते.
"मला जर माहीत असतं तर ती जागा वाचवण्याचा प्रयत्न केला असता. ही कबर म्हणजे माझ्या वडिलांची शेवटची आठवण होती आणि आता मी ती जागा गमावली आहे," असं त्या म्हणाल्या.
काळशी इथल्या दफनभूमीला त्या अजूनही भेट देऊ शकतात. पण आता त्यांच्या वडिलांची कबर तिथे नाही आणि आता आणखी कोणालातरी त्यांच्यावर दफन करण्यात आलं आहे.
सुरैया यांच्याबरोबर हा प्रकार पहिल्यांदाच झालेला नाही. त्यांच्या पहिल्या मुलाची, त्यांच्या आईची, आणि काकांची कबर त्यांना अशाच प्रकारे गमावावी लागली आहे.
सुरैया यांच्या सारखंच अनेकांना राजधानीत आपल्या नातेवाईकांसाठी, मित्रांसाठी असलेली कबरीची जागा गमवावी लागली आहे.
दफन करण्यासाठी जागा शोधणं खरंतर तितकंसं कठीण नाही. दफन करण्यासाठी तात्पुरत्या जागा स्वस्तात मिळतात. पण शहरातील नियमाप्रमाणे एका जागेवर दर दोन वर्षांनी वेगळ्या प्रेतांचं दफन केलं जातं.
त्यामुळे तात्पुरत्या दफनभूमीत अनेक मृतांचं दफन करण्यात येतं.
लोकांना खूप त्रास होतो पण त्यांना दुसरा पर्याय नाही. कधी कधी कुटुंबातील लोकच कबर वाटून घेतात.
मुस्लीमबहुल असलेल्या बांगलादेशात अंत्यसंस्काराचे दुसरे विधी नाहीत कारण इस्लाम त्यांना मान्यता देत नाही.
2008पासून प्रशासनानं एखाद्या कुटुंबाला कायमची कबर द्यायला नकार दिला आहे. सेमी पर्मनंट दफनभूमीसाठी अंदाजे 13 लाख रुपये मोजावे लागतात. बांगलादेशातील दरडोई उत्पन्न 1 लाख इतकं आहे, हे लक्षात घेतलं तर ही रक्कम किती जास्त आहे, हे लक्षात येते.
जुन्या ढाक्याजवळ अससेल्या अझीमपूरमध्ये दफनभूमीतील गवत स्वच्छ करण्यासाठी मजूर लावले जातात. ही शहरातील मोठी दफनभूमी आहे आणि दफनभूमीच्या प्रत्येक दिशेला कबरी आहेत. इथल्या बहुतांश कबरींची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे.
कबरींवर असलेल्या चिन्हांमुळे तिथे दफन केलेल्या लोकांची माहिती मिळते. इथे प्रत्येक इंच आणि इंच जागेचा वापर करण्यात आला आहे.
सबिहा बेगम यांच्या बहिणीने 12 वर्षांपूर्वी आत्महत्या केली आणि त्यांचं इथे दफन केलं. गेल्या दहा वर्षांपासून त्या या कबरीचं रक्षण करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत आणि कबरीची देखभाल करणाऱ्या लोकांना त्यासाठी त्यांना अनेकदा लाच द्यावी लागली आहे.
"मी माझ्या बहिणीला रोज मिस करते. मी अनेकदा तिच्या कबरीजवळ जाते आणि तिच्याशी बोलते. मी नुकतेच पाहिलेले चित्रपट, ऐकलेली गाणी, यांच्याबदद्दल तिच्याशी बोलते. ती त्या कबरीत जिवंत आहे असं मला वाटतं. माझ्या भावना सांगणं फारच कठीण आहे," असं त्या सांगतात.
दरवर्षी जेव्हा त्यांच्या बहिणीची कबर धोक्यात येते, तेव्हा तिथल्या केअर टेकरचा त्यांना फोन येतो. त्यांच्या बहिणीच्या जागेवर दुसऱ्या प्रेताचं दफन होऊ नये यासाठी ते 'काळजी' घेतात.
"जेव्हा आम्ही तिचं दफन केलं तेव्हा आम्हाला कायमस्वरुपी प्लॉट दिला जाणार नाही, याची आम्हाला कल्पना होती. मला नक्की आठवत नाही पण तिचं दफन केल्यानंतर कदाचित 18 ते 22 महिन्यानंतर त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं की तिची कबर आता काढून टाकणार आहे. मी ती वाचवण्याचे मार्ग शोधू लागले," सबिहा सांगत होत्या.
"पैसा असला तर कबर वाचवता येऊ शकते, असं तिथल्या माणसानं सांगितलं. तेव्हापासून गेली 12 वर्षं ही कबर वाचवण्याचा मी प्रयत्न करत आहे," त्यांनी सांगितलं.
बांगलादेशच्या धार्मिक अभ्यासकांच्या मते इस्लाम एका कबरीत एकापेक्षा जास्त मृतदेह ठेवण्याची परवानगी देतं. पण आपल्या प्रियजनांना दफन केलेली जागा इतरांबरोबर वाटून घ्यायला, फारस कुणी इच्छुक नसतं.
कोणाची काही श्रद्धा असली तरी आता ढाक्यात दुसरा पर्याय नाही.
ढाक्यातील रोझरी या सगळ्यात मोठ्या चर्चमध्ये मोठी दफनभूमी आहे. शहराच्या गजबजाटात या दफनभूमीनं स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
पण इथे गवत नीट कापलेलं आहे आणि ख्रिश्चन धर्मियांचं धर्मचिन्ह रंगवलं आहे. त्यामुळे तिथे अनेक वेदना लपल्या जातात, असं इथले धर्मगुरू कोमोल कोराया यांचं मत आहे.
"अनेक लोक इथे स्थलांतरित होऊन येतात. त्यामुळे परिस्थिती अतिशय कठीण होऊन बसलं आहे. आम्ही दफनभूमीची उत्तम काळजी घेतो. चर्च एक दैवी जागा असल्यामुळे इथे आपलं दफन व्हावं असं अनेकांना वाटतं," असं ते सांगतात.
"आमच्याकडे मर्यादित जागा आहेत. त्यामुळे आम्हाला दर पाच वर्षांनी जागेच्या नियोजनात बदल करावे लागतात. इथं खोदकाम करताना, इथं न सडलेली हाडंही मिळतात," असंही त्यांनी सांगितलं.
ढाकाच्या 300 चौरस किमीच्या परिसरात 1.6 कोटी इतके लोक राहतात. हा आकार लंडनच्या एक पंचमांश आहे आणि लोकसंख्या लंडनच्या अर्धी आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या हॅबिटॅट डेटानुसार ढाका म्हणजे या ग्रहावरचं सगळ्यात जास्त लोकसंख्येची घनता असलेलं शहर आहे. इथं एका चौरस किमीमध्ये तिथे 44000 लोक राहतात.
बांगलादेशात फक्त आठ सार्वजनिक दफनभूमी आहेत. काही खासगी मालकीच्या आहेत. उपलब्ध जागा गरज पूर्ण करण्यासाठी अपुऱ्या आहेत.
शहरात जागा अपुरी असल्याने लोकांना मृतांच्या दफनविधीसाठी मूळ गावी जाण्यासाठी उत्तेजन देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.
"अशा पद्धतीने मूळ गावी जाऊन दफनविधी करतील त्यांना अर्थसहाय देण्याचा विचार सुरू आहे," असं ढाका सिटी कॉर्पोरेशन दक्षिण जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहम्मद बिलाल यांनी सांगितलं.
"ढाक्यातील अनेकांना हा पर्याय स्वीकारायचा असेल. पण त्यात आर्थिक अडचणींमुळे अनेकांना हा पर्याय निवडता स्वीकारण्यात अडचणी येत असतील. आर्थिक कारणांमुळे त्यांना मृतदेह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं शक्य होत नसेल. त्यामुळे मृतदेह नेण्यासाठी त्यांना एक वाहन देण्यात येत आहे. इतर विधींची काळजी घेण्यासाठी काही पैसे देण्यात येतील. असं केल्यानी ढाक्यात दफन होण्याचं प्रमाण कमी होईल," असं ते म्हणाले.
यामुळे अडचणी कमी होण्यास मदत होईल. शिवाय सुरैया आणि परवीन यांच्यासारख्या अनेकांना आपल्या लोकांना स्मृती गमावण्याचं दु:ख कमी होईल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)