#5 मोठ्या बातम्या : गांधी, आंबेडकरांपेक्षा मोदींच्या पुस्तकावर अधिक खर्च

आजच्या वृत्तपत्रांतील मोठ्या पाच बातम्या पुढील प्रमाणे :

1. पुरक वाचन पुस्तक योजनेअंतर्गत मोदींना झुकते माप

पुरक वाचन पुस्तक योजनेअंतर्गत राज्याच्या शिक्षण विभागाने महात्मा गांधी यांच्या पुस्तकांसाठी 3 लाख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रांसाठी 24 लाख तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील पुस्तकांसाठी तब्बल 59 लाख रुपये खर्च केले आहेत. दिव्य मराठीनं या संदर्भात बातमी दिली आहे.

पुरक वाचन पुस्तक योजनेअंतर्गत पुस्तक खरेदीची ई-निविदा नुकतीच मंजूर करण्यात आली आहे.

या निविदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुस्तकाच्या 35 रुपयांप्रमाणे 72 हजार 933 मराठी प्रती, तर 33 गुजराती, 425 हिंदी आणि 7 हजार 148 इंग्रजी भाषेतील प्रतींचा समावेश आहे.

2. जनतेच्या प्रश्नांसाठी सरकारविरोधात आंदोलने करा: उद्धव

सरकारमध्ये असल्याने सरकारविरोधात आंदोलनं करायचे नाही, असं कुणीही सांगितलेलं नाही. जनतेची कामं होत नसतील तर सरकारचे कान उपटले पाहिजेत, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

लोकसत्तानं ही बातमी दिली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी काम करावं, त्यासाठी गरज पडल्यास आक्रमक व्हावं, आंदोलन करावं असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला. शिवसेना भवनात पार पडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

3. 15 फेब्रुवारीपासून बेस्ट कर्मचारी संपावर

बेस्ट समितीच्या सभेत 450 बसगाड्या भाड्याने आणि हंगामी तत्त्वावर कर्मचारी घेण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्याच्या निषेधार्थ बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र टाईम्सनं या संदर्भात बातमी दिली आहे.

हा निर्णय बेस्ट कर्मचाऱ्यांच्या हिताच्या विरोधात आहे, असा आरोप करत बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी बंदची हाक दिली आहे.

4. साक्षीदार 'फितूर' होत असताना तुम्ही गप्प का? : उच्च न्यायालय

गुजरात येथील सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात आणखी दोन साक्षीदार फितूर झाल्याची गंभीर दखल घेताना उच्च न्यायालयाने सीबीआयच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत, असं लोकसत्तातील वृत्तात म्हटलं आहे.

लोकसत्तानं दिलेल्या बातमीनुसार, सुनावणीदरम्यान आवश्यक असलेले सहकार्य सीबीआयकडून मिळत नसल्यामुळे न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. तसंच सीबीआयची हीच भूमिका असेल तर खटला चालवलाच का जात आहे, अस संतप्त सवालही न्यायालयाने यावेळी उपस्थित केला.

5. आत्महत्या रोखण्यासाठी मंत्रालयात जाळी

हर्षल रावते या तरुणाने गेल्या आठवड्यात मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मुख्य इमारतीच्या मधल्या भागात जाळी बसवण्यात आली आहे.

सकाळनं दिलेल्या बातमीनुसार, शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष प्राशन केले होते. तसंच हर्षल रावते तरुणाने मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली होती. त्यामुळे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सरकारनं खबरदारीचे पावलं उचलली आहेत. तसंच मंत्रालयाच्या पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे, असं या बातमीमध्ये म्हटले आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)