सोशल - जेव्हा ती पुरुषांच्या 'वक्र' नजरेतून मला वाचवायला आली...

    • Author, जियोर्जिना रेनार्ड
    • Role, बीबीसी ट्रेंडिंग

विचार करा तुम्ही कुठल्या तरी पबमध्ये बसून ड्रिंक एजॉय करत आहात, आणि त्याच वेळी तिथे एक अनोळखी पुरुष तिथं टपकतो. तो तुमच्या जवळ येतो, तुमच्याची बोलण्याचा प्रयत्न करतो.

तुम्ही कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी तो तुमचा पिच्छा सोडायला तयार नसतो. मग अशा वेळी तुम्ही काय कराल?

एक तर तुम्हाला तिकडून कुठेतरी दुसरीकडे जाऊन बसावं लागतं किंवा कुणी तरी तिसरी व्यक्ती तुमच्यात येऊन बसण्याची वाट पाहावी लागते.

एखादी नकोशी व्यक्ती जबरदस्ती तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, असा अनुभव जवळपास प्रत्येक मुलीला कधी ना कधी येतोच.

म्हणूनच जेव्हा ब्रिटिश पत्रकार आम्ना सलीम यांनी ट्विटरवर अशाच एका प्रसंगाचा उल्लेख केला तेव्हा सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली पुरुष कसे महिलांच्या मर्जीविरोधात त्यांच्या पर्सनल स्पेसमध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करतात याबाबत सोशल मीडियावर अनेक जणींनी अनुभव व्यक्त केले.

आम्ना यांनी उल्लेख केलेला प्रसंग काही असा :

मुलगा : माझ्याबरोबर फक्त एक ड्रिंक घ्याल का?

मी : नको, थँक्स.

मुलगा : कम ऑन! फक्त एका ड्रिंकसाठी तर विचारतोय.

मी : हे बघा, मी माझ्या बॉयफ्रेंडची वाट बघतीये आणि मला हे पुस्तक वाचायचंय.

मुलगा : तुझा बॉयफ्रेंड तुला मित्र पण बनवू देत नाही का?

... आणि त्याचवेळी, एक मुलगी येऊन मला विचारते, "क्लारा? हाय!" आणि मला मिठी मारून तिने मला हळूच विचारलं की "तू ठीक आहेस ना?"

खरंच काही मुली भारी असतात.

जेव्हा वाचवणाऱ्यासोबतच झालं लग्न

दुसऱ्या एका मुलीनेही असाच एक किस्सा शेअर केला. इटलीमधल्या फ्लोरेन्समध्ये असताना एक माणूस तिच्यासोबत जबरदस्ती डान्स करण्याचा प्रयत्न करत होता. ती सांगते, "मला पण अचानकच एका मुलीने येऊन वाचवलं. ती माझ्याजवळ येऊन अशी काही ओरडली, जशी ती माझी बेस्ट फ्रेंड आहे."

आम्नाच्या ट्वीटवर जॅमियल नावाच्या एका युजरने चांगला रिप्लाय दिला आहे. ती लिहिते, "एकदा ट्रेनमध्ये एक मुलगा अशाच एका मुलीला त्रास देत होता. आणि ती एकटी होती. मग माझ्या भावाने तिचा नवरा असल्याची अॅक्टिंग केली आणि मग तिला सतावणारा मुलगा तिकडून निघून गेला."

ती सांगते, "या गोष्टीला आता 10 वर्षं झाली. माझ्या भावाने जिला वाचवलं ती त्याची आज बायको आहे. त्या दोघांचं खरंच लग्न झालं."

डब्लिनमध्ये राहणाऱ्या एकीने सांगितलं की, ती तर बऱ्याचदा सरळ तोंडावर खरं काय ते बोलून मोकळी होते.

"'अरे यार! मुलीने एकदा सांगितलं ना, की ती तुझ्यात इंटरेस्टेड नाहीये. मग जा ना', मी एकदा एकाला असंच ठणकावलं. त्यामुळे प्रकरण आणखीनच बिघडलं. तो भयंकर रागावला आणि अजून भांडायला लागला. पण सुदैवानं थोड्याच वेळात चालता झाला."

फ्रान्समधल्या सायरा यांनी या सगळ्यावर एक तोडगा सुचवला आहे. त्या म्हणतात, "असा त्रास देणाऱ्या मुलांना असे काही प्रश्न विचारा की त्यांची बोलतीच बंद झाली पाहिजे."

अमेरिकेतल्या नॅथन मूर यांच्या मते, "पुरुषांच्या अशा वागणुकीला समाजच कारणीभूत आहे, जो त्यांना असं वागायला शिकवतो."

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)