#5मोठ्याबातम्या : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपामध्ये लोकप्रिय मात्र पक्षात इतरांचं स्थान काय?’

"भारतीय जनता पार्टीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा लोकप्रिय आहेच, मात्र दुःखद बाब ही आहे की पक्षात इतर लोकांना बाजूला सारण्यात आलं आहे." हे वक्तव्य केलं आहे भाजप खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी. त्यांनी तसं ट्वीट केलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
लोकसत्तानं दिलेल्या वृत्तानुसार, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ट्वीट करून सुब्रह्मण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
गेल्या काही महिन्यांपासूनच स्वामी यांनी मोदी सरकारचं कामकाज आणि आर्थिक धोरणांवर टीका सुरु केली आहे. जीडीपीचे आकडे जाहीर झाल्यानंतर या आकड्यांमध्ये फेरफार करण्यात आल्याचं वक्तव्य स्वामी यांनी केलं होतं.
मराठीला अभिजात भाषेच्या दर्जासाठी दिल्लीत मसापचं आंदोलन
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तातडीनं मिळावा यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीनं राजधानी नवी दिल्लीत अनोखं आंदोलन करण्यात आलं.
प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधत मराठी प्रजेच्या मनातलं हे गाऱ्हाणं दिल्लीतल्या राज्यकर्त्यांच्या कानावर टाकण्यासाठी हे आंदोलन होतं.

फोटो स्रोत, Getty Images
एबीपी माझानं हे वृत्त दिलं आहे.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची सदसद्विवेक बुद्धी मोदी सरकारला व्हावी, अशी प्रार्थना यावेळी आंदोलकांनी महाराष्ट्र सदनातल्या शिवाजींच्या पुतळ्यासमोर केली.
साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वात मसापचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, मसापचे सातारा अध्यक्ष विनोद कुलकुर्णी यांच्यासह अनेक कार्यकर्ते यासाठी दिल्लीत दाखल झाले होते.
27 फेब्रुवारी या मराठी भाषादिनाच्या आधी हा प्रलंबित निर्णय व्हावा, नाहीतर भविष्यात हे आंदोलन आणखी तीव्र करु असा इशाराही यावेळी देण्यात आला.
कुटुंबाचा आत्महदनाचा प्रयत्न
मुंबईत शिवाजी पार्कमध्ये ध्वजवंदन आणि संचलन सुरु असताना शुक्रवारी एका कुटुंबानं आत्मदहनाचा प्रयत्न केला. सुदैवानं मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो टळला. परभणीच्या खान कुटुंबातल्या 8 जणांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यांच्यासोबत रॉकेलही आणलं होतं.
दैनिक लोकमतच्या वृत्तानुसार, अखिला बेगम यांच्या पतीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. संबंधित पोलिसांवर कारवाई करावी, तसंत आर्थिक मदत मिळाली नाही म्हणून खान कुटुंबीय आत्मदहनाच्या प्रयत्नात होते.
खराब खेळपट्टी खेळ थांबवला
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ खराब खेळपट्टीमुळे वेळेआधीच थांबवण्यात आला.

फोटो स्रोत, Getty Images
टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, तिसऱ्या दिवशी टीम इंडियानं २४७ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २४१ रन्सचं आव्हान आहे. या स्कोअरमुळे भारताला विजयाच्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.
खराब खेळपट्टीमुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. दिवस अखेरीस दक्षिण आफ्रिकेनं १७ रन्सवर एक विकेट गमावली होती.
दक्षिण आफ्रिकेला अद्यापही विजयासाठी २२४ रन्सची आवश्यकता आहे आणि त्यांच्याकडे ९ विकेट्सही आहेत. मॅच रेफ्री सकाळी खेळपट्टीची स्थिती पाहून निर्णय घेणार आहेत.
U-19 वर्ल्डकप : उपांत्य फेरीत भारत-पाक भिडणार
भारतानं उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेशवर १३१ धावांनी दणदणीत विजय मिळवत आयसीसी अंडर-१९ वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत मुसंडी मारली आहे.
आता उपांत्य फेरीत भारताला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी दोन हात करावे लागणार आहेत. ३० जानेवारीला ख्राइस्टचर्च इथं हा सामना रंगणार आहे.

फोटो स्रोत, Getty Images
महाराष्ट्र टाइम्सच्या वृत्तानुसार, भारतानं बांगलादेशपुढे विजयासाठी २६६ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं.
या आव्हानाचा पाठलाग करताना ४२.१ षटकांत बांगलादेशचा संपूर्ण संघ १३४ धावांत माघारी परतला. भारताचा युवा तेजतर्रार गोलंदाज कमलेश नागरकोटीनं ३ विकेट घेऊन बांगलादेशी फलंदाजीचं कंबरडं मोडलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








