ब्लॉग : प्रवीण तोगडियाजी तुमचा राजकीय एनकाउंटर कधीच झाला आहे

प्रविण तोगडिया

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, राजेश जोशी
    • Role, रेडिओ एडिटर, बीबीसी हिंदी

खोट्या चकमकीसाठी एखाद्या व्यक्तीला घेऊन जात असतील, तर तिची अवस्था बळीच्या बकऱ्यासारखी असते. हा बळीचा बकरा मोठ्याने ओरडतो पण नंतर आपली सुटका नाही हे कळल्यावर चुपचाप खाली मान घालून गवत खातो.

पुन्हा थोड्या वेळाने तो दोरी तोडण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचे हे प्रयत्नही निष्फळ जातात आणि शेवटी त्याची मान छाटली जाते. काही काळासाठी तो तडफडतो आणि नंतर शांत होतो.

न्यायालयाच्या फाइल्स, चार्जशीट, चौकशीच्या अहवालांचा अभ्यास केल्यावर आपल्या लक्षात येतं की एनकाउंटर हे नेहमीच काही खास निवडक अशा पोलिसांकडूनच करवून घेतले जातात.

त्याचं कारण स्पष्ट आहे, त्यावेळी नेमकं काय झालं याची गोष्ट बाकी कुणालाच कळू नये यासाठी ते खबरदारी म्हणून हा उपाय केला जातो.

एनकाउंटरची पद्धत

हिंदी चित्रपटातही एनकाउंटरची पद्धत दाखवली जाते. हे दृश्य तर अलीकडच्या काळात बऱ्यापैकी प्रसिद्ध झालं आहे. ज्या व्यक्तीचा एनकाउंटर करायचा आहे त्याला पोलीस नंबर प्लेट नसलेल्या गाडीतून नेतात. मग निर्जन रस्त्यावर ती गाडी थांबवली जाते. त्या व्यक्तीच्या हातातली हातकडी काढली जाते आणि म्हटलं जातं "पळ..."

इशरत जहां

फोटो स्रोत, Getty Images

त्या कैद्याला माहीत असतं, आता आपली वेळ आली आहे. तो गयावया करू लागतो. पण तो हा चान्स घेतो आणि सर्व शक्तिनिशी पळू लागतो. काही क्षणातच त्याच्यावर गोळ्या बरसतात.

दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातमी येते पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत कुख्यात गुंड/ नक्षलवादी/ अट्टल दरोडेखोर/ इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी ठार.

सोहराबुद्दीन शेख, त्याची पत्नी कौसर बी, तुलसीराम प्रजापती, इशरत जहां, माओवादी पार्टीचे पॉलिट ब्युरो सदस्य आझाद, उत्तराखंडचे पत्रकार हेम पांडे, उत्तर प्रदेशातील श्रीप्रकाश शुक्ला सारखे हिस्ट्री शीटर, भोपाळ जेल बंद सिमीचे आठ कार्यकर्ते हे खऱ्या किंवा खोट्या 'एनकाउंटर'मध्येच मारले गेले आहेत.

एकेकाळी गर्जना करणारे तोगडिया का पळाले?

विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष प्रवीण तोगडियांचं नाव देखील या लिस्टमध्ये आलं असतं का? ते तर टीव्हीवर रडून सांगत होते. माझा एनकाउंटर झाला असता म्हणून.

प्रवीण तोगड़िया

फोटो स्रोत, Getty Images

जर गेल्या सोमवारी राजस्थान पोलिसांच्या हाती ते लागले असते तर त्यांना देखील अहमदाबादबाहेरच्या एखाद्या छोट्याशा निर्जन वाटेवर पोलिसांनी मोकळं सोडलं असतं आणि म्हणाले असते का? जा तुम्ही स्वतंत्र आहात. लवकरात लवकर इथून पळून जा.

दहा वर्षं जुन्या एका प्रकरणात मला पकडण्यासाठी राजस्थान पोलीस आले होते, असं तोगडिया सांगतात. "पण ही गोष्ट आपल्याला आधीच कळली आणि झेड सुरक्षेचा गराडा सोडून आपण रिक्षात बसून पळून गेलो," असं ते सांगतात. दुसऱ्या दिवशी एका रुग्णालयात ते शुद्धीवर आले.

तोगडियांना एनकाउंटरची खरंच भीती आहे का?

जी व्यक्ती कालपर्यंत हिंदूंच्या शौर्याचं प्रतीक समजली जात असे, मुस्लिमांना बेधडक आव्हान देत असे, महात्मा गांधींमुळे देशात दहशतवाद फोफावला असा प्रचार करत असे तीच व्यक्ती अहमदाबादच्या एका रुग्णालयाबाहेर गळा काढून रडतानाचं दृश्य आपल्याला पाहायला मिळालं.

पोलीस दल

फोटो स्रोत, TAUSEEF MUSTAFA

फोटो कॅप्शन, पोलीस कारवाईचं प्रतिनिधिक छायाचित्र (संग्रहित)

ज्या राज्यात हिंदू हृदय सम्राट तोगडिया यांनी हा स्वर काढला त्या राज्यात हिंदुत्ववादी भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, ज्या राजस्थान पोलिसांच्या भीतीने ते पळून गेले असं सांगत आहेत त्या ठिकाणी देखील भाजपचं सरकार आहे.

ज्या केंद्र सरकारकडं त्यांनी अंगुलीनिर्देश केला आहे त्या ठिकाणी देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये प्रशिक्षण घेतलेले तीन स्वयंसेवक भारतीय प्रजासत्ताकाच्या तीन सर्वोच्च पदांवर विराजमान आहेत.

इतकंच काय, पूर्ण देशात तोगडियांनी विश्व हिंदू परिषदेच्या लाखो स्वयंसेवकांना तयार केलं आहे. विश्व हिंदू परिषदेच्याच बजरंग दलातील सदस्यांना स्वसंरक्षणासाठी त्रिशूळ आणि बंदूक चालवण्याचं ट्रेनिंग दिलं जातं.

तोगडियांच्या रडण्याकडं कुणी लक्ष का दिलं नाही?

बजरंग दलातले युवक गावांगावांमध्ये आणि छोट्या छोट्या वस्त्यांमध्ये 'हिंदूंच्या रक्षणा'ची जबाबदारी घेत असतात. त्यांना हवं तेव्हा कुणालाही 'लव्ह जिहाद'चं लेबल लावून ते लोकांना लावू शकतात. कुणाचीही गाडी अडवून ते झडती घेऊ शकतात, गरब्यामध्ये सामील होणाऱ्या मुसलमान युवकांना ते रोखू शकतात, कुणालाही धमक्या देऊ शकतात, कुणालाही देशद्रोही घोषित करू शकतात.

प्रविण तोगडिया

फोटो स्रोत, Getty Images

पण मातृभूमी आणि हिंदू धर्मावर जीव ओवाळून टाकणारे हे युवक आपल्या हिंदू हृदय सम्राटाच्या रक्षणासाठी डोक्यावर भगवी पट्टी आणि हातात त्रिशूळ घेऊन पुढे का सरसावले नाहीत?

प्रवीण तोगडियांचे अश्रू पाहून देशातील कोणत्याच कोपऱ्यातून आवाज आला नाही, "हे पाहून ज्या हिंदूचं रक्त उसळलं नाही, त्याचं रक्त हे रक्त नसून पाणी आहे." किती स्वयंसेवकांनी असं म्हटलं की हिंदू नेता प्रवीण तोगडिया यांच्याविरोधात कट रचणारे लोक हे हिंदूद्रोही आणि राष्ट्रद्रोही आहेत.

कुणी चकार शब्द काढला नाही. याचं कारण आहे की त्यांचा राजकीय एनकाउंटर कधीच करण्यात आला आहे.

सत्तेवर ताबा

तोगडिया जोपर्यंत पाकिस्तान, मुस्लीम, महात्मा गांधी, काँग्रेस, ओवेसी आणि ख्रिश्चन यांच्याविरोधात बोलत राहतील तोपर्यंतचा त्यांचा काही उपयोग आहे असं म्हणता येईल. जोपर्यंत त्यांच्या बोलण्यामुळं हिंदू-मुस्लिमांचं ध्रुवीकरण होऊन त्याचं मतांमध्ये रुपांतर होईल तोपर्यंत त्यांचा काही फायदा राहील.

पोलीस दल

फोटो स्रोत, Getty Images

योगी आदित्यनाथांचं उदाहरण या ठिकाणी समजून घेण्यासारखं आहे. एका बाजूने ते एखाद्या हिंदू साधूसारखं वर्तन करत राहिले आणि दुसऱ्या बाजूने त्यांनी मतांच्या राजकारणावरही आपली पकड मजबूत ठेवली. त्यामुळेच तर मुख्यमंत्री बनताक्षणीच स्वतःवर असलेली दंगल पसरवण्याची केस त्यांनी मागे घेतली.

पण तोगडियांची गोष्ट वेगळी आहे. निवडून आलेल्या सरकारवर आपला ताबा असावा असं त्यांना वाटतं. सत्तेचं नियंत्रण विधानसभेच्या हातात नाही तर त्याही वर असलेल्या 'गुरुसभे'च्या हातात आहे असं जर ते बोलत असतील तर त्यांना असं वाटणारच की, एखाद्या शहराच्या बाहेर निर्जन रस्त्यावर ते उभे आहेत आणि त्यांना 'पळा' असं म्हटलं गेलं आहे. पण त्यांना वाचवण्यासाठी 'जय श्रीराम'च्या घोषणा देणारा बजरंग दलाच्या युवकांच्या तांड्याची चिन्हं दूर दूरपर्यंत दिसणार नाहीत.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)