एकाच रक्ततपासणीतून होणार कॅन्सरचं निदान, अनेकांचे जीव वाचण्याची शक्यता!

कॅन्सर चाचणी

फोटो स्रोत, Getty Images/Dan Kitwood

    • Author, जेम्स गॅलाघर
    • Role, बीबीसी आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी

वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडेल असं एक मोठं पाऊल वैज्ञानिकांनी टाकलं आहे. केवळ एका रक्त तपासणीद्वारे कॅन्सरचं निदान होऊ शकेल असं तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दृष्टीनं वैज्ञानिक प्रयत्न करत आहेत.

जॉन हॉपकिन्स विद्यापीठात एक अशी पद्धत विकसित केली आहे ज्यामुळं आठ प्रकारच्या कॅन्सरचं निदान होऊ शकेल.

कॅन्सरचं लवकर निदान करता येईल आणि लोकांचा जीव वाचवता येईल अशी एक चाचणी तयार करण्याचं या संशोधकांचं ध्येय आहे.

हे अभूतपूर्व यश आहे, असं यूकेतल्या तज्ज्ञांनी म्हटलं आहे. असं असलं तरी या चाचणीवर अनेक अंगांनी अभ्यास होणं अद्याप बाकी आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कॅन्सरच्या सुरुवातीच्या टप्प्यात या चाचणीचे निकाल कसे हाती लागतात यावर अजून खूप संशोधन होणं बाकी आहे.

काय आहे कॅन्सरसीक टेस्ट?

सायन्स या विज्ञानविषयक प्रकाशनात या कॅन्सरसीक (CancerSEEK) टेस्टबाबतची माहिती प्रसिद्ध झाली आहे. जर कॅन्सर असेल तर ट्युमरमधून जनुकीय बदल घडलेल्या डीएनए आणि प्रोटीन्सचा स्राव होतो आणि तो रक्तात मिसळतो. कॅन्सर झाल्यावर 16 प्रकारच्या जीन्स आणि 8 प्रकारच्या प्रोटीन्सचा नियमित स्राव होतो. त्याचं निरीक्षण CancerSEEK टेस्टद्वारे करता येतं. त्यामुळे रक्ततपासणीतून कॅन्सर आहे की नाही, हे कळण्यास मदत होते.

कॅन्सर

फोटो स्रोत, Science Photo Library

फोटो कॅप्शन, या नव्या चाचणीमुळं अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

अंडाशय, यकृत, स्वादुपिंड, पोट, अन्ननलिका, फुफ्फुस, स्तन आदी प्रकारचे कॅन्सर असणाऱ्या 1,005 रुग्णांची तपासणी या चाचणीद्वारे करण्यात आली. या रुग्णांचा कॅन्सर हा अद्याप पूर्णपणे विकसित झालेला नव्हता. या सर्व कॅन्सर प्रकारातील 70 टक्के कॅन्सरचं निदान एकाच रक्त चाचणीद्वारे होऊ शकलं.

जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनचे डॉ. क्रिस्तियन टॉमासेट्टी यांनी बीबीसीला सांगितलं की, कॅन्सर रुग्णांसाठी सुरुवातीचा काळ अतिशय महत्त्वपूर्ण असतो. त्यामुळे लवकरात लवकर निदान होणं आवश्यक असतं. या चाचणीमुळं रुग्णांच्या आयुष्यावर सकारात्मक प्रभाव पडू शकतो आणि त्यांचं आयुष्य वाढू शकतं.

लवकर निदान झाल्यास रुग्णाला फायदा

जितक्या लवकर कॅन्सरचं निदान होईल तितकी त्या रुग्णाला बरं होण्याची संधी अधिक प्रमाणात मिळेल. कारण कॅन्सरवरचे औषधोपचार लगेच सुरू करता येतात. नेहमी होणाऱ्या 8 पैकी 5 कॅन्सरच्या प्रकारांत निदान लवकर होण्यात अडचण येते.

कॅन्सर सेल

फोटो स्रोत, SPL

सुरुवातीच्या टप्प्यात स्वादुपिंडाच्या (Pancreatic Cancer) कॅन्सरची लक्षणं ओळखू येत नाहीत आणि त्यांचं निदानही लवकर करता येत नाही. त्यामुळे स्वादुपिंडाचा कॅन्सर झालेले रुग्ण आजार कळल्यानंतर वर्षभरात दगावतात. रुग्ण दगावण्याचं हे प्रमाण 5 पैकी 4 रुग्ण एवढं मोठं आहे.

अशा प्रकारच्या कॅन्सरग्रस्त रुग्णांमध्ये ट्यूमरचं निदान होणं आणि ट्यूमर काढून टाकण्याची शस्त्रक्रिया ही 24 तासांत होते. तरच रुग्ण वाचण्याची शक्यता असते, असं डॉ. टॉमासेट्टी म्हणाले.

"कॅन्सरसीक टेस्टचा हा प्रयोग ज्यांना कॅन्सर झालेला नाही अशा लोकांवर केला जात आहे. हीच या चाचणीच्या उपयुक्ततेची खरी कसोटी ठरेल. ब्रेस्ट कॅन्सर (स्तनांचा) आणि कोलोरेक्टल (आतड्याचा) कॅन्सरच्या निदानासाठी अनुक्रमे मॅमोग्राम आणि कोलोनोस्कोपी ही तपासणी केली जाते. आम्हाला अशी आशा आहे की ही नवी चाचणी या जुन्या चाचण्यांना पूरक ठरेल", असंही डॉ. टॉमासेट्टी म्हणाले.

एखाद्या व्यक्तीची वर्षातून एकदा रक्त तपासणी केली जाईल आणि त्याला कॅन्सर आहे की नाही याचं निरीक्षण कॅन्सरसीक टेस्ट द्वारे केलं जाईल असं त्यांनी सांगितलं.

सर्व प्रकारच्या कॅन्सरसाठी एक चाचणी

वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरसाठी एकच चाचणी असावी याबद्दल सायन्स जर्नलमध्ये प्रबंध प्रसिद्ध करण्यात आला आहे. कॅन्सरसीक टेस्ट ही अनोखी टेस्ट आहे कारण जनुकीय बदल आणि प्रोटीन्सच्या रचनेत झालेले बदलही या चाचणीद्वारे तपासता येतात.

कॅन्सर चाचणी

फोटो स्रोत, Getty Images/Dan Kitwood

अचानकपणे होणारे जनुकीय बदल आणि प्रोटिन्सचं विश्लेषण या चाचणीच्या साहाय्याने करता येतं त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरचं निदान या चाचणी द्वारे करता येतं.

या चाचणीची क्षमता प्रचंड आहे. या नव्या शोधामुळं मला खूप आनंद झाला आहे असं संशोधकांच्या टीम पैकी एक असणारे डॉ. गर्ट अटार्ड यांनी बीबीसीला सांगितलं. अटार्ड हे लंडन येथील कॅन्सर रिसर्च इंस्टिट्यूटमध्ये संशोधक आहेत.

ते पुढे सांगतात, "ही अशा प्रकारची एकमेवाद्वितीय चाचणी असेल. कारण एका रक्त तपासणीतून कॅन्सरचं निदान करणं शक्य होऊ शकतं. या चाचणीमुळे स्कॅनिंग किंवा कोलोनोस्कोपी सारख्या किचकट प्रकियांची गरज उरणार नाही. फक्त रक्त तपासणीद्वारे कॅन्सरचं निदान करण्याची पद्धत विकसित होण्याच्या आम्ही अगदी जवळ आलो आहोत. आम्हाला तंत्रज्ञानाचं पाठबळ मिळालं आहे."

निदान झालं, पण पुढे काय?

पण खरा प्रश्न हा आहे की एकदा रोगाचं निदान झालं तर पुढे काय करायचं.

कॅन्सर चाचणी

फोटो स्रोत, Getty Images/Dan Kitwood

"कधीकधी तर कॅन्सरसहित जीवन जगण्यापेक्षा उपचार घेणं अधिक त्रासदायक ठरू शकतं. जेव्हा आपण कॅन्सरचं निदान वेगळ्या पद्धतीनं करतो त्यावेळी आपण हे गृहित धरू शकत नाहीत की प्रत्येकाला उपचाराची आवश्यकता असेल," असं अटार्ड म्हणतात.

"जर कॅन्सर सुरुवातीच्या टप्प्यात असेल तर त्याचं निदान होणं हे कठीण असतं. त्याची काही लक्षणं आपल्याला समजल्यानंतर त्याचं खात्रीशीर निदान होण्यास पाच ते सहा वर्षं लागू शकतात," असं यूके कॅन्सर रिसर्च संस्थेचे रिचर्ड माराइसचे संशोधक यांनी म्हटलं.

"कॅन्सरचं सुरुवातीच्या काळात निदान होणं हे फायदेशीर ठरू शकतं. हा रोग पूर्ण पसरण्याच्या आधी जर त्याचं निदान झालं तर रुग्णाला वाचवण्यासाठी किंवा त्याचं आयुष्य सुधारण्यासाठी मदत होऊ शकते. महत्त्वाची बाब म्हणजे या संशोधनामुळे कॅन्सरचं निदान सुरुवातीच्या टप्प्यात होईल अशी आम्हाला आशा आहे," असं माराइस म्हणतात.

प्रयोगानंतरच कळेल चाचणीची उपयुक्तता

कॅन्सर सुरुवातीच्या टप्प्यात असताना ही चाचणी किती परिणामकारक ठरते यावर अभ्यास होणं गरजेचं आहे, असं केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या कॅन्सर विभागातील प्राध्यापक पॉल फरोह यांनी म्हटलं.

कॅन्सर चाचणी

फोटो स्रोत, Getty Images/Dan Kitwood

"कॅन्सर प्रगत अवस्थेमध्ये असल्यावर या चाचणीचे निकाल योग्य येत आहेत. पण याचा अर्थ असा नाही की कॅन्सरच्या सुरुवातीच्या टप्प्यातील निकालही तंतोतंत बरोबर येतील. या चाचणीची कॅन्सरच्या पहिल्या टप्प्यातील निदानाची शक्यता फक्त 40 टक्केच आहे", असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं.

क्वीन मेरी युनिव्हर्सिटी ऑफ लंडनच्या सेंटर फॉर कॅन्सर प्रिव्हेन्शनमध्ये काम करणारे डॉ. मंगेश थोरात यांनी एका महत्त्वपूर्ण मुद्द्याकडे लक्ष वेधलं आहे. ते म्हणतात, "चाचणी ही निश्चितपणे चांगली आहे पण चाचणीला अनेक मर्यादा देखील आहेत."

डॉ. मंगेश थोरात यांच्या मते, निदानाच्या पद्धतीमध्ये या चाचणीमुळे काय बदल होईल याचा विचार करण्यापूर्वी या चाचणीवर अजून अभ्यास होणं आवश्यक आहे.

"तसं पाहायला गेलं तर ही चाचणी प्रायोगिक आहे. व्यापक स्तरावर या चाचणीचे काय निकाल येतात हे पाहावं लागेल. अनेक लोकांवर ही चाचणी घेतल्यास काय निकाल येतात हे तपासून पाहणं आवश्यक आहे", असं मत थोरात यांनी व्यक्त केलं.

या चाचणीची किंमत अंदाजे 500 पाउंड म्हणजे 30,000 रुपयांपेक्षा कमी आहे. कोलोनोस्कोपीची किंमत देखील अंदाजे तितकीच आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)