ब्लॉग : या TRPच्या लढाईत निरागस बालपण होरपळत आहे का?

- Author, दीपक शर्मा
- Role, बीबीसी
जवळपास 400 न्यूज चॅनेल्सचा समावेश असणाऱ्या भारतीय टेलिव्हिजनच्या मार्केटमध्ये TRP टिकवण्यासाठी जितका दबाव असतो, तितका जगभरात कुठेही नाही. याबाबतीत पाकिस्तानही भारतापेक्षा वेगळा ठरत नाही.
पाकिस्तानातही TRP रेटिंगच्या नादात संपादकीय भान घसरतं. म्हणूनच जेव्हा पाकिस्तानी न्यूज अँकर किरण नाझ आपल्या 7 वर्षांच्या मुलीला समोर बसवून बलात्काराची बातमी वाचते तेव्हा त्याचीच बातमी होते. नाझच्या या बातमीला भारतीय टेलिव्हिजन चॅनेल्सही उचलून धरतात.
मध्यमवर्गाला दिखाऊपणा करण्याची खूप हौस असते. घर, गाडी आणि वस्तूंचाच नाही तर स्वतःच्या पोटच्या मुलांचाही देखावा करतात. रोजच्या गरजांसाठी झगडा आणि सुखासीन आयुष्याची स्वप्नं पाहणाऱ्या कुटुंबांसाठी मुलं म्हणजे सर्वांत मोठा ऐवज असतो.
बालपणी आपल्यापैकी अनेकांना पाहुण्यांसमोर अमुक अमुक सादर कर, असं सांगितलं जायचं. त्यावेळी लाज वाटायची तेही आठवत असेल. आपल्या मुलांना आवडतं गाणं, कविता किंवा नाच सादर करताना पाहून कित्येक आई-वडिलांच्या चेहऱ्यावरचा अभिमानही तुम्ही पाहिला असेल.
खरं तर हा अभिमान आणि मुलांविषयीच्या अपेक्षा बालमनावर बंधनं टाकतात. लहान शहरं आणि वस्त्यांमधल्या मुलांना आजही निखळ बालपणात तुलनेने अधिक स्वातंत्र्य आहे.
अजूनही काही ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धती आहे. अशा ठिकाणी प्रत्येक वेळी स्वतःला अव्वल सिद्ध करणं फारसं महत्त्वाचं नाही.
TRPचा खेळ
रिअॅलिटी टीव्हीच्या जमान्यात खरं तर सगळं झपाट्याने बदलतंय. देशाच्या कानाकोपऱ्यातल्या आणि समाजातल्या दुर्लक्षित घटकांमधून आलेले आंचल ठाकूर आणि बुधिया सिंग टीव्हीवर चमकायला फारसा वेळ लागत नाही. इतकं सगळं वेगाने सुरू आहे.
जोरदार TRP कमवणाऱ्या कार्यक्रमांना वर्ग, जात, जमात, वर्ण किंवा रंग यांच्याशी काही देणं-घेणं नसतं. मनोरंजनाच्या या व्यापारात प्रतिभेच्या कहाण्या काही कमी नसतात. आणि असे कार्यक्रम पाहणारे प्रेक्षक दूरदूरपर्यंत असतात. पण प्रेक्षक टिकवून TRPची शर्यत जिंकण्यासाठी कार्यक्रमांना सनसनाटी आणि भावनांची फोडणी देत राहावी लागते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
चकचकीत चेहरे आणि भावनिकता विकणाऱ्या या कार्यक्रमांचा लहान मुलंही एक हिस्सा आहेत. म्हणूनच टॅलेंट कार्यक्रमांमध्ये अनेकदा मुलांची कला आणि त्यांचं बोलणं याचा त्यांच्या वयाशी ताळमेळ नसतो. त्यांचे गुण असामान्य वाटतात.
आता तर ऑनलाईन शॉपिंगचा फायदा सांगण्यासाठी मोठ्यांच्या पेहरावात आणि आविर्भावात लहान मुलांना वापरलं जातं.
यूट्यूबवर किरण नाझने आपल्या मुलीला सोबत घेऊन केलेल्या फेसबुक लाईव्हचा व्हीडिओ उपलब्ध आहे. हा व्हीडिओ तिने 1 जानेवारीला अपलोड आहे. त्यात मेकअप रूमसारख्या एका खोलीत ती मुलगी आयेशा सोबत दिसतेय. व्हीडिओत नाझ टेलिव्हिजनवर होणाऱ्या आपल्या कार्यक्रमाविषयी माहिती देते आहे आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया वाचते आहे.
या सगळ्या प्रकारात त्या छोट्या मुलीचा काहीही संबंध नाही. ती तिथे का आहे? याचं उत्तर प्रेक्षकांना मिळत नाही.
किरण नाझच्या नव्या व्हीडिओला मात्र चारच दिवसात आठपट जास्त लाईक मिळाले. छोटी आयेशा पहिल्या व्हीडिओत जशी आईच्या लोकप्रियतेशी अनभिज्ञ आहे तशीच दुसऱ्या व्हीडिओतही आईला वाटणाऱ्या चिंतेशी. अर्थातच, काय चाललं आहे याची तिला कल्पनाही नाही.
"आज मी किरण नाझ नाही, तर आज मी आई म्हणून इथे आहे. म्हणूनच मी माझ्या मुलीसोबत बसली आहे," असं म्हणत व्हायरल झालेल्या या बुलेटिनच्या सुरुवातीलाच नाझ प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते.
भावुक वाक्यांचा स्क्रिप्टमध्ये पुरेपूर वापर आहे. पण अधूनमधून फ्रेमच्या बाहेर जाणाऱ्या आयेशाचा खोडकर स्वभाव सतत दिसत राहतो. एका चिमुकलीच्या बलात्काराच्या बातमीने चिंतित आईच्या तगमगीचा आयेशावर काहीही परिणाम झाला नाही.
मुलीच्या सगळ्या हालचाली सांभाळत नाझने कॅमेरासमोरचं आपलं बोलणं तितक्याच भावुकपणे सुरू ठेवलं.

फोटो स्रोत, BBC URDU
झैनबच्या बलात्काराची बातमी नाझने सादर केली आणि एका पत्रकाराच्याही आधी मी एक आई आहे, असं सांगणं हे तितकं असमान्य राहिलेलं नाही. शेवटी पत्रकारालाही कुटुंब, जात-पात, नाती, प्रदेश आणि आपले अनुभव यातून जावं लागतं.
पण पत्रकार म्हणून उभं राहिल्यावर या सगळयाच्या पलीकडे आपली ओळख असणं महत्त्वाचं ठरतं. निष्पक्ष माहिती देण्यासाठी प्रेक्षकांसमोर ती ओळख आवश्यक असते, मग ती घटना कितीही भावुक का असेना!
बातमीला लोकप्रियता मिळवून द्यायच्या प्रयत्नात पत्रकारितेचा मूळ सिद्धांत हरवत चालला आहे. "मला या वेदनेची जाणीव आहे आणि म्हणून मी माझ्या मुलीला घेऊन आले आहे. मला हेच सांगायचं होतं की मला माझ्या मुलीचा अभिमान आहे. समाजात आईवडिलांना आपल्या मुलीबद्दल अभिमान असतोच."
या शोविषयी बीबीसीशी बोलताना नाझचं म्हणणं होतं की, "अभिमान नात्याचा असू दे की देशभक्तीचा, तो असाच जागृत ठेवला पाहिजे."
पत्रकारितेचा आत्मा हरवतोय?
सत्याकडे कठोरपणे पाहणं हे पत्रकाराचं लक्षणही असतं आणि कसोटीही. लोकशाहीमध्ये अशी अपेक्षा आपण काही संस्था आणि ठराविक व्यवसायांकडूनच करू शकतो.
झैनबच्या बलात्काराच्या घटनेनंतर बातम्या प्रेक्षकांना TRPसाठी भावुक करण्यामागे लागल्या नसत्या तर कायदेशीर न्यायाविषयी आधी बोललं गेलं असतं.
अनेकदा पाकिस्तानवर टीका करताना सर्वसामान्य भारतीयांचा उत्साह वाढतो. पण बातमीला मुलामा लावून विकण्यात भारतीय न्यूज चॅनेल्स मागे राहिले नाहीत.

फोटो स्रोत, Getty Images
अनेकदा आपण अँकर्सचा अविर्भाव पाहतो तेव्हा ते कधी पहेलवान, कधी शेतकरी, तर कधी वकील, इतकंच नव्हे तर 'थर्ड-डिग्री' देणाऱ्या पोलीसवाल्यांची उसनी भूमिकाही घेताना दिसतात. भक्तीपासून धमाल-मस्तीपर्यंत प्रत्येक मूडमध्ये अवलिया सादर करण्याची कला या अँकर्सला अवगत आहे.
सात वर्षांची झैनब आपल्या गल्ली-मोहल्ल्यात राहणारी सीता किंवा सिंथियाही असू शकते. कदाचित तुमची स्वतःची मुलगीही असू शकते.
भारत-पाक या देशांमधले कटू संबंध झैनबच्या बातमीतल्या संवेदनशीलतेआड आले नाहीत. पण लोक जेव्हा देखाव्यामागची सत्यता समजून घेण्याचा प्रयत्न करतील तेव्हाच खरा बदल होऊ शकतो.
झैनबचे जे गुन्हेगार आहेत, त्यांच्यासारख्या माणसांचं नामोनिशाण नसेल, अशी परिस्थिती आणि अशा येणाऱ्या पिढ्या तयार करण्याचं आव्हान खूप मोठं आहे. त्यासाठी मोठ्यांच्या दुनियेतल्या विद्रुप कहाण्यांपासून निरागस मुलांचं बालपण वाचवणं खूप महत्त्वाचं आहे.
हे पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








