जल्लीकट्टूचा बैल पाळण्यासाठी तिनं लग्न नाही केलं!

फोटो स्रोत, PRAMILA KRISHNAN
- Author, प्रमिला कृष्णन
- Role, बीबीसी तामिळ
तामिळनाडूच्या मदुराई जिल्ह्यातल्या मेलूर गावात राहतात सेल्वरानी कनगारासू. 48 वर्षांच्या सेल्वरानी इतरांच्या शेतात मजुरी करतात.
पण गावात त्यांची ओळख आहे त्यांच्या बैलासाठी. तामिळनाडूच्या प्रसिद्ध जल्लीकट्टू स्पर्धेत सहभागी होणाऱ्या या बैलाच्या संगोपनासाठी त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे.
लहान वयातच सेल्वरानी यांनी वडील आणि आजोबांनी जोपासलेली कुटुंबाची परंपरा पुढं न्यायचा निर्णय घेतला होता. ती परंपरा म्हणजे, जल्लीकट्टूसाठी बैल पाळण्याची.
जल्लीकट्टू म्हणजे एका मोकाट बैलावर ताबा मिळवण्याचा एक पारंपरिक खेळ. पोंगल सणाच्या काळात तामिळनाडूमध्ये रंगणाऱ्या या स्पर्धेत मोठ्या संख्येनं तरुण सहभागी होतात.
प्राणी अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर सर्वौच्च न्यायालयाने बंदी घातल्यानं दोन वर्षं ही स्पर्धा होऊ शकली नाही. मात्र तामिळनाडूत झालेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं बंदीस बाजूला सारत जानेवारी 2017 मध्ये जल्लीकट्टूच्या आयोजनाला हिरवा कंदील दिला.

फोटो स्रोत, PRAMILA KRISHNAN
भावांची जबाबदारीबहिणीनं स्वीकारली
वडील कनगरासू आणि आजोबा मुत्थुस्वामी यांनी जल्लीकट्टूसाठीचे बैल पाळले, त्यांना लहान मुलासारखं वाढवलं, असं सेल्वरानी सांगतात.
"जेव्हा तिसऱ्या पिढीकडे बैल पाळण्याची जबाबदारी आली तेव्हा माझ्या दोन भावांकडं तेवढा वेळ नव्हता. कुटुंबात बैलांचे मालक हे पुरुषच असतात. पण त्यांचं चारापाणी, गोठ्याची साफसफाई करण्याचं काम महिलाच करतात. माझ्या भावांना आणि त्यांच्या कुटुंबाला हे सर्व शक्य नव्हतं. तेव्हा मी त्यांना सांगितलं की, याची जबाबदारी मी घेते."

फोटो स्रोत, PRAMILA KRISHNAN
त्या रामू नावाच्या बैलाची काळजी घेतात. 18 वर्षांचा रामू या परिसरातला जल्लीकट्टूचा स्टार खेळाडू आहे. आतापर्यंत सात पैकी पाच जल्लीकट्टू स्पर्धांमध्ये रामू जिंकला आहे. आणि त्याला मिळाल रामूने जिंकलेल्या पुरस्कारांमध्ये घरात वापरायचं साहित्य, सिल्क साडी आणि सोन्याचं नाणं यांचा समावेश आहे.
त्या म्हणतात, "रामू माझ्यासाठी माझ्या मुलासारखाच आहे. त्याने माझ्यासाठी अनेक पुरस्कार जिंकले आहेत. पण त्याहीपेक्षा सर्वांत महत्त्वाचं म्हणजे गावात त्याने माझ्या कुटुंबाला सन्मान मिळवून दिला आहे."
हा धष्टपुष्ट, जाडजूड शरिराचा बैल जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा एक रागीट जनावरं असतो. पण तसा तो फार प्रेमळ आहे, हे सांगायला त्या विसरत नाही.

जल्लीकट्टू काय आहे?
- जल्लीकट्टू हा दोन हजार वर्षं जुना खेळ असल्याचं म्हटलं जातं. आजच्या काळातही या खेळाचं आकर्षण कमी झालेला नाही.
- पिंजऱ्यातून बैल सोडल्यानंतर स्पर्धकांना किमान 15-20 मीटरपर्यंत, किंवा बैल तीन वेळा उड्या मारेपर्यंत बैलाच्या खांद्याला धरून ठेवावं लागतं.
- या खेळादरम्यान शेकडो लोकं बैलासोबत पळत असतात. त्याच्या खांद्याला धरण्याचा प्रयत्न करतात. अनुकोचीदार शिंगामध्ये अडकवलेलं पैश्यांचं बंडल किंवा सोनं लुटण्याचा प्रयत्न करतात.

फोटो स्रोत, ARUN SANKAR/AFP/GETTY IMAGES
- स्पेनमधील बुलफायटींगसारखं जल्लीकट्टूमध्ये बैलाला मारण्यासाठी शस्त्र वापरले जात नाही किंवा त्याला मारलं जात नाही. यात फक्त बैलावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातो.
- अलीकडच्या काळात प्राणीमित्र संघटनांनी बैलाची शेपूट पिरगाळणं किंवा शेपूट ओढण्यासारख्या प्रकारांना विरोध करायला सुरुवात केली. सर्वौच्च न्यायालयानं प्राणी अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत या खेळावर बंदी आणली होती.

टोकन रकमेवर आणला बैल
गेल्या काही वर्षांमध्ये या स्पर्धांमध्ये अनेक जण बैलांकडून तुडविले गेले आहेत, काहींचा मृत्यूही झाला आहे. शिवाय शेकडो प्रेक्षकांसह अनेक जण जखमी झाले आहेत. या स्पर्धेत आता नारळाच्या झाडापासून तयार केलेले संरक्षक कवच वापरलं जात असल्यानं परिणाम कमी जाणवत असला तरी रागीट बैलाच्या हल्ल्यापासून ते पुरेसं संरक्षण देण्यास कमी पडतं.

फोटो स्रोत, ARUN SANKAR/AFP/GETTY IMAGES
रामू दहा वर्षांचा असताना सेल्वरानींनी त्याला आणलं होतं. आधीच्या मालकानं सुरुवातीला तगडी रक्कम मागितली होती. पण सेल्वरानी यांनी त्याला सांगितलं की त्यांना हा बैल आपल्याला जल्लीकट्टूसाठी सांभाळायचा आहे, आणि त्या इतकी रक्कम देऊ शकत नाही. मग त्यानं टोकन रकमेवर हा बैल सेल्वरानी यांना दिला.
लग्न करण्याऐवजी बैल सांभाळण्याचा सेल्वरानी यांचा निर्णय ग्रामीण भारतात अर्तक्य आहे. सेल्वरानी यांच्या कुटुंबाला आणि नातेवाईकांनाही त्यांचा हा निर्णय आवडलेला नव्हता. पण अखेर त्यांनीही सेल्वरानीच्या या निर्णयाला स्वीकारलं.
आता केवळ कुटुंबालाच नव्हे तर मेलूरच्या गावकऱ्यांनाही त्यांच्या या निर्णयाचा अभिमान वाटतो. गरीब परिस्थितीतही बैल पाळण्याच्या त्यांच्या तळमळीची ते प्रशंसा करतात.

फोटो स्रोत, PRAMILA KRISHNAN
त्यांच्या छोट्या घरात एका बाजूला किचन आणि एकाबाजूला एक खोली आहे.
सेल्वरानी यांची शेतमजुरी करून दिवसाकाठी दोनशे रुपयांची कमाई होते. त्या आपल्या कमाईतला पैन् पै वाचवतात, जेणेकरून त्यांचा रामूच्या चाऱ्यापाण्याची व्यवस्था होऊ शकते.
तामिळनाडूतल्या साधारण बैलांना थोडासा हिरवा चारा आणि कडबा खाऊ घातला जातो. पण रामू जल्लीकट्टूचा बैल असल्यानं त्याच्या खाद्यात नारळ, खजूर, केळी, तीळ, शेंगदाण्याची ढेप, बाजरी आणि भात यांचा समावेश असतो.
सेल्वरानी अभिमानानं सांगतात, "रामू स्पर्धेत टिकला पाहिजे यासाठी दररोज त्याच्या जेवणावर 500 रुपये खर्च करते. अनेकवेळा मी स्वतः एक वेळचं जेवण घेते, पण त्याच्यासाठी पैसे वाचवते."
तसं बघायला गेलं तर जल्लीकट्टू वर्षातून एकदाच पोंगलदरम्यान होतो. पण सेल्वरानी यांना वर्षभर रामूची देखभाल करावी लागते. त्या म्हणतात, "मी रामूला गावानजीकच्या तलावावर घेऊन जाते. त्याच्याकडून पोहण्याचा सराव करून घेते. त्यामुळं त्याचे गुडघे मजबूत राहतात. माझा भाचा राजकुमार हा दररोज राजूला फिरायला घेऊन जातो. समोरच्याला कसं चितपट करायचं याचं प्रशिक्षण तो रामूला देत असतो."
"जल्लीकट्टू स्पर्धेच्या आधी मला जनावरांच्या डॉक्टरकडून रामूच्या फिटनेसचं प्रमाणपत्र घ्यावं लागतं. त्यानंतरच तो जल्लीकट्टूमध्ये सहभागी होऊ शकतो," असंही त्या म्हणाल्या.

फोटो स्रोत, PRAMILA KRISHNAN
सेल्वरानींचे नातेवाईक इंदिरा सेल्वराज (52) सांगतात, "अनेक स्पर्धांमध्ये आपल्या नावावर विजय नोंदवल्यानं अनेक लोकांनी रामूला विकत घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासाठी एक लाख रुपये देण्यासही लोक तयार आहेत. पण सेल्वरानी रामूला विकण्याचा विचारही करू शकत नाही."
इंदिरा म्हणाल्या, "स्पर्धेसाठी बैलाला तयार करणं, हे जणू तिच्या आयुष्याचं ध्येयच झालं आहे. तिला रामूची काळजी घ्यायची असते. एक लाख रुपयांमध्येसुद्धा रामूला विकायला आम्ही तिचं मन वळवू शकलो नाही."
"सेल्वरानी यांना मूलबाळ नसल्यानं त्यांच्यासोबतच जल्लीकट्टूचा बैल पाळण्याची परंपरा संपू नये," असं त्यांना वाटतं. सध्या त्या त्यांची 18 वर्षांची पुतणी देवदर्शिनी हिला प्रशिक्षण देत आहेत, जेणेकरून त्यांची परंपरा पुढं सुरू राहील.
रामूची काळजी कशी घ्यायची हे जरी देवदर्शिनीला माहीत असलं तरी संपूर्ण आयुष्यभर बैलाचा सांभाळ करण्याच्या निर्णयाशी ती फारशी सहमत नाही.
"मला त्याबाबत पूर्ण खात्री नाही, म्हणून मी अजूनतरी निर्णय घेतलेला नाही. अजूनही मी शिकतच आहे. आधी मला माझ्या कुटुंबातली पहिली पदवीधर महिला व्यायचं आहे. मग ठरवू."
तुम्ही हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








