पाहा व्हीडिओ : मुंबईच्या पहिल्या एसी लोकलबद्दल सर्वकाही

व्हीडिओ कॅप्शन, मुंबईत आता गारेगार प्रवास
    • Author, रोहन टिल्लू आणि प्रशांत ननावरे
    • Role, बीबीसी मराठी

कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मुंबईकरांचं एसी लोकलमधून प्रवासाचं स्वप्न अखेर सोमवारी साकार झालं. हे त्यांच्या दैनंदिन प्रवासातलं एक नवीन पर्व असून भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच एसी लोकल ट्रेन धावली आहे.

सोमवारी सकाळी 10.30ला बोरिवलीहून रवाना झालेली पहिलीवहिली एसी लोकल चर्चगेटला पोहोचली.

तिकीट दाखवणारा लहान मुलगा

फोटो स्रोत, PRASHANT NANAWARE

फोटो कॅप्शन, आणि या बालप्रवासानेही हा ऐतिहासिक क्षण अनुभवला

एसी लोकलची पहिली ऐतिहासिक फेरी आज सुरू होत असली, तरी प्रत्यक्षात एसी लोकल प्रवाशांच्या सेवेत येण्यासाठी पुढलं वर्षच उजाडणार आहे. कारण ही लोकल 1 जानेवारी 2018 पासून पूर्णपणे प्रवाशांच्या सेवेत येईल.

तोपर्यंत चर्चगेट-बोरिवली अशाच चाचणी फेऱ्या होतील.

मुंबईतली पहिली एसी लोकल

फोटो स्रोत, PRASHANT NANAWARE

फेऱ्या

विशेष म्हणजे, पश्चिम रेल्वेने या चाचणी फेऱ्यांचंही वेळापत्रक बनवलं आहे. दिवसभरात या लोकलच्या सहा फेऱ्या होतील. त्यापैकी ३ फेऱ्या चर्चगेटहून बोरिवलीच्या दिशेने - सकाळी 9.30, 11.15 आणि दुपारी 1.16, आणि बाकी ३ बोरिवलीहून चर्चगेटकडे येणाऱ्या असतील - सकाळी 10.20, 12.24 आणि 2.11.

नव्या वर्षात या विशेष ट्रेनच्या दिवसभरात 12 फेऱ्या होणार आहेत - ११ फेऱ्या फास्ट असतील आणि एकच फेरी स्लो असेल. तसंच या ११ फास्ट फेऱ्यांपैकी आठ फेऱ्या चर्चगेट ते विरार यादरम्यान असतील, तर तीन फेऱ्या चर्चगेट-बोरिवली असतील.

पण या नव्या फेऱ्यांमुळे सध्याच्या पश्चिम रेल्वेवर फेऱ्यांमध्ये कुठलीही वाढ होणार नाही. या 12 फेऱ्यांनंतरही दिवसभरात 1355 फेऱ्याच असतील, म्हणजे सध्याच्या साध्या लोकलच्या १२ फेऱ्या कमी करून त्या जागी एसी लोकलच्या १२ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

मुंबईतली पहिली एसी लोकल

फोटो स्रोत, PRASHANT NANAWARE

फोटो कॅप्शन, सोमवारी काही महिला प्रवाशांनीही चर्चगेटपर्यंतच्या प्रवासासाठी एसी लोकलचा पर्याय निवडून प्रवास केला.

डबे

या गाडीचे 12 डबे एकमेकांशी आतून जोडले असून, दिल्ली किंवा मुंबई मेट्रोंप्रमाणे या गाडीतही महिलांसाठी काही डबे आरक्षित ठेवले आहेत. पहिला आणि बारावा डबा पूर्णपणे महिलांसाठी आरक्षित असेल.

त्याशिवाय चर्चगेटकडून दुसऱ्या आणि अकराव्या डब्यातील सात सीट ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव असतील. तसंच चौथ्या आणि सातव्या डब्यातील १० सीट दिव्यांग प्रवाशांसाठी ठेवण्यात आल्याचं पश्चिम रेल्वेने जाहीर केलं आहे.

पश्चिम रेल्वेवरचं महालक्ष्मी स्टेशन हे बऱ्याचदा अनेकांच्या खिजगणतीतही नसतं. पण या एसी लोकलची दर दिवशीची पहिली फेरी या स्टेशनवरून सुटणार आहे. कारशेडमधून सकाळी सकाळी बाहेर पडणारी ही गाडी महालक्ष्मी स्टेशनातून आपली सेवा 6.58 वाजता सुरू करेल. ही फेरी महालक्ष्मी ते बोरिवली यांदरम्यान स्लो असेल.

मुंबईतली पहिली एसी लोकल

फोटो स्रोत, Western Railway

संरक्षण

गाडीत कोणत्याही प्रकारची गैरवर्तणूक होऊ नये, गाडीला नुकसान होऊ नये, यासाठी गाडीच्या प्रत्येक डब्यात रेल्वे सुरक्षा दलाचे काही जवान तैनात असतील. तसंच गाडीचे दरवाजे स्वयंचलित असल्याने गोंधळ होऊ नये, यासाठी पुढल्या स्टेशनातला प्लॅटफॉर्म कुठल्या बाजूला येणार आहे, याची घोषणा गाडीत होईल.

दरवाजे उघडताना काही समस्या उद्भवली, तर ती तात्काळ सोडवण्यासाठी काही तंत्रज्ञही गाडीत असतील.

त्यामुळे कुटुंबासह सुरक्षित प्रवासाची अनुभूती या एसी लोकलमुळे मुंबईकरांना मिळणार आहे.

प्रकल्पाचा इतिहास

मुंबईत एसी लोकल चालवण्याची घोषणा काँग्रेसच्या आघाडी सरकारच्या काळात, म्हणजे २०१२-१३च्या रेल्वे अर्थसंकल्पात करण्यात आली होती. पण त्यानंतर अनेक घडामोडींमुळे हा प्रकल्प लांबणीवर पडला होता.

चेन्नईच्या इंटिग्रेटेड कोचिंग फॅक्टरीत तयार झालेली ही एसी लोकल 31 मार्च 2016 ला चेन्नईतून मुंबईत येण्यासाठी निघाली होती. ही लोकल 5 एप्रिल 2016, म्हणजेच तब्बल 20 महिन्यांपूर्वी मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडमध्ये पोहोचली.

तेव्हापासून ही लोकल मुंबईकरांच्या सेवेत कधी येणार, याचीच प्रतीक्षा होती.

मुंबईतली पहिली एसी लोकल

फोटो स्रोत, PRASHANT NANAWARE

इतका वेळ का?

एसी लोकल कुर्ला कारशेडमध्ये आल्यानंतर पाच-सहा महिन्यांमध्ये ती प्रवाशांच्या सेवेत येईल, असा विश्वास होता.

कोणतीही नवीन लोकल ताफ्यात आली की, तिच्या चाचण्या घेतल्या जातात. यात जवळपास १६ ते १७ प्रकारच्या चाचण्यांचा समावेश असतो. या चाचण्या सुरू होण्यापूर्वीच एसी लोकलसाठी आवश्यक असलेल्या एका भागाची कमतरता असल्याचं लक्षात आलं होतं.

त्यानंतर बेल्जिअमहून आलेले तंत्रज्ञ या लोकलवर काम करत होते. त्यामुळे ही लोकल प्रत्यक्ष सेवेत येण्यासाठी वेळ लागला.

मध्य रेल्वेच्या 'हाती आली, पण तोंडी नाही लागली'

ही एसी लोकल २०१२-१३मध्ये जाहीर झाली, त्यानंतर ती पश्चिम रेल्वेवरच चालवली जाईल, असं ठरलं होतं. पण तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ही लोकल मध्य रेल्वेसाठी चालवली जाईल, असं जाहीर केलं. त्यामुळे चेन्नईहून ही गाडी कुर्ला कारशेडमध्ये आणण्यात आली. पण अनेक घडामोडींनंतर ही गाडी मध्य रेल्वेऐवजी पश्चिम रेल्वेवरच चालवली जाईल, असं ठरलं.

घ्या या एसी लोकलचा व्हीडिओ अनुभव :

Facebook पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त

आणखी वाचा

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)