सोशल - 'भाजपच्या काळात अमरनाथ सायलेंट झोन घोषित झाला, ते एक बरं'

फोटो स्रोत, Getty Images
राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) बुधवारी अमरनाथला 'शांतता क्षेत्र' म्हणजे 'सायलेंट झोन' म्हणून घोषित केलं आहे. त्यामुळे मंदिर परिसरात आता घंटानाद, मंत्रोच्चार किंवा जयजयकाराही करता येणार नाही.
शांतता क्षेत्र घोषित केल्याने हिमस्खलन रोखणं आणि निसर्गाचं संरक्षण होण्यास मदत होईल, असं लवादाचं म्हणणं आहे.
तीर्थयात्रेसाठी लाखो लोक दरवर्षी तिथं जातात. त्यामुळे तिथं हिमस्खलन आणि ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होतं. हे ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी मंदिर परिसराला शांतता क्षेत्र घोषित केलं जावं, अशी मागणी होत होती.
हा निर्णय जाहीर केल्यानंतर वादाला तोंड फुटलं. दिल्ली भाजपने यावर आक्षेप घेत NGT हिंदूविरोधी अजेंडा चालवत असल्याची टीका केली. मात्र आता या प्रकरणात NGTने स्पष्टीकरण दिलं असून, अमरनाथमध्ये कोणत्याही प्रकारचं शांतता क्षेत्र घोषित करण्यात आलं नसून केवळ शिवलिंगासमोर शांतता बाळगण्यास सांगण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, बीबीसी मराठीनं याच विषयावर सोशल मीडियावर वाचकांना तुम्हाला या बाबत काय वाटतं असा प्रश्न विचारला होता. त्यातील या काही निवडक प्रतिक्रिया.
"घंटा वाजवल्याने कोणतं प्रदूषण होणार आहे? NGTने आता किती सेंकद प्रार्थना करावी एवढंच सांगायचं राहिलं आहे. मशिदीतून आजानच्या आवाजानं प्रदूषण होत नाही का?" असा सवाल प्रवीण शेंडे यांनी विचारला आहे.
तर विशाल वेताळ यांनी "कृत्रिम आवाज, बांधकाम व प्रकाशाने नैसर्गिक ऊर्जा नष्ट होते." असं म्हणत कोर्टाच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे.

फोटो स्रोत, Facebook
"घंटेच्या आवाजाने अंटार्क्टिकामधील बर्फ झपाट्याने वितळलं आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे." अशी खोचक प्रतिक्रिया राम यांनी दिली आहे.

फोटो स्रोत, Facebook
तर प्रथमेश पाटील म्हणतात, "भाजपच्या काळात हा निर्णय आला ते एक बरं झालं. काँग्रेसच्या काळात आला असता तर भाजपवाल्यांनी धिंगाणा घातला असता."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








