सोशल - 'कर्जमाफी हा हक्क?' : शरद पवारांच्या आवाहनावर चर्चेला ऊत

फोटो स्रोत, Getty Images
"बळीराजा संकटात असताना सरकारने सरसकट कर्जमाफी दिली नाही, शेतमालाला किंमत दिली नाही. त्यामुळे तुम्हीही सरकारची कुठलीही देणी देऊ नका, बिलं भरू नका, गावोगावी हा मंत्र पोहोचवा", असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं आहे.
'दमदाटी करून तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न केल्यास सरकार उखडून फेकण्याची ताकद बळीराजात आहे,' असा कडक इशाराही त्यांनी दिला आहे.
शरद पवारांच्या या विधानाबाबत तुम्हाला वाटतं असा प्रश्न आम्ही बीबीसीच्या वाचकांना विचारला होता. त्यावर अनेक वाचकांनी त्यांची मतं व्यक्त केली आहेत. या प्रतिक्रियांचा हा गोषवारा...
मंगेश गहेरवार आणि संदीप पाटील यांनी शरद पवार बरोबर बोलत असल्याचं म्हटलं आहे. "नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही. कर्जमाफीच्या नावाखाली सरकारने लोकांना वेड्यात काढलं आहे. कर्जमाफी नाही तर कुठलेचं हफ्ते, बिलं भरली जाणार नाहीत."
"पवारांसारख्या नेत्याला ज्यावेळी हे म्हणावं लागतं त्यावेळी सरकारने हा प्रश्न गांभीर्याने घ्यायलाच हवा," असंही मंगेश गहेरवार म्हणतात. सौदागर काळे यांनी हे वक्तव्य शेतकऱ्यांना सध्या तरी दिलासा देणारं असल्याचं म्हटलं आहे. "या वक्तव्यातला राजकीय उद्देश बाजूला ठेवला तरी खरी परिस्थिती बीच आहे. व्यवस्थेने शेतकऱ्यांना ओरबाडलं आहे", असं काळे लिहितात.

फोटो स्रोत, Facebook
शरद पवारांच्या वक्तव्याच्या विरोधातही अनेकांनी अपली मतं नोंदवली आहेत.
"१५ वर्षं काँग्रेस-राष्ट्रवादीच्या घोटाळ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या शरद पवारांचं हे वक्तव्य म्हणजे अराजकतेला आवाहन करण्यासारखं आहे. यामुळे राज्याची आर्थिक स्थिती डबघाईला येईल याची जाणीव तरी आहे का पवारांना?" असा सवाल अजय चौहान यांनी केला आहे.

फोटो स्रोत, Facebook
तर सुयोग कुडतरकर म्हणतात, "असंच आम्ही करदाते म्हणालो की, नीट सुशासन आल्याशिवाय आणि आम्ही भरलेल्या सर्व करांचा नीट विनियोग दिसल्याशिवाय कर भरणार नाही, तर भारत भिकेला लागेल."
"शरद पवारांनी स्वतःचं सरकार असताना काही विशेष केलं नाही, पुतण्याला रान मोकळं करून दिलं आणि आता सरकारला शहाणपण शिकवताहेत!", असंही ते लिहितात.
"पवारसाहेब तुम्ही तुमचा पगार का नाही देत... सोयीसुविधांवर पाणी सोडून दाखवा", असं मोहन गवंडे म्हणतात.
ट्विटरवरही अनेकांनी आपली मतं व्यक्त केली आहेत.
नितीन निमकर यांनी तिखट शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, "सरकार कोणा परक्याचं नाही की त्याचं ऐकू नका म्हणायला. 'मला नाही तुला नाही घाल कुत्र्याला', अशी यांची वृत्ती आहे."

फोटो स्रोत, Twitter
धनंज जाधव कर्जमाफी हा हक्क आहे? असा सवाल करत आश्चर्य व्यक्त करतात, तर भरत पाटील यांनी पवारांच्या आवाहनाला पाठिंबा देत, सरकारलाच खडेबोल सुनावले आहेत.

फोटो स्रोत, Twitter
"सरकार लोकांसाठी असतं. त्यांच्या सोयीसाठी असतं. कर्जमाफी हक्क आहे शेतकऱ्यांचा आणि त्यांना तो मिळालाच पाहिजे", असा मुद्दा भरत पाटील मांडतात.
हे वाचलं का?








