पाहा व्हीडिओ : धुरक्यानं मुंबईचं कसं खंडाळा झालंय बघा!

    • Author, राहूल रणसुभे
    • Role, बीबीसी मराठी

मुंबईमध्ये दोनच ऋतू - उन्हाळा आणि पावसाळा, असं पु. ल. देशपांडे यांनी आपल्या 'असा मी असामी' या पुस्तकात म्हटलं आहे.

हिवाळा मुंबईकरांच्या वाट्याला खरंतर येतच नाही. कडक हिवाळा, कधी कधी होणारी बर्फवृष्टी, आणि धुकं ही उत्तर भारताची मक्तेदारी. पण या हंगामात मुंबईकरांच्या नशिबीही धुक्याची चादर आहे. ही अनपेक्षित सकाळ उगवली ती 9 डिसेंबरला.

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ असो की बांद्रा टर्मिनसचं रेल्वे स्टेशन किंवा अगदी मरिन ड्राईव्हची चौपाटी, पहाटेपासूनच मुंबई शहरावर धुक्याचं आच्छादन आहे.

आणि त्याचा परिणाम जनजीवनावरही जाणवत आहे.

धुरकटलेली मुंबई

एरवी धुक्याचं चित्र आल्हाददायक असलं तरी शहरातली वाहतूक सेवा सकाळी विस्कळीत झाली होती. लोकल ट्रेन संथगतीने धावत होत्या.

मुंबईतल्या धुक्याचं नेमकं कारण काय, हे जाणून घेण्यासाठी बीबीसीने भारतीय हवामान विभागाच्या मुंबई कार्यालयाचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर यांच्याशी संपर्क साधला.

पहिली गोष्ट त्यांनी स्पष्ट केली ती म्हणजे, "मुंबईतलं धुकं हे धुकं नसून धुरकं आहे. म्हणजे असं की, जमिनीपासून वर गेलं तसं तापमान कमी होतं. पण जमिनीच्या आसपास तापमान वाढलेलं असतं. त्यामुळे धुलिकण, आणि हवेतलं बाष्प वर वातावरणात तरंगतं. यात हवेतली आर्द्रता मिसळते."

"आणि हवा कमी असल्यामुळे, शिवाय तिचा वाऱ्याचा वेग कमी असल्यामुळे हे धुलिकण वातावरणात तरंगत राहतात. यातून जे तयार होतं ते धुरकं."

ओखी वादळाचा परिणाम

अलिकडेच आलेल्या ओखी वादळामुळे परिस्थिती आणखी बदलली आहे. त्याविषयी होसाळीकर यांनी अधिक माहिती दिली.

"ओखी वादळ मुंबईपासून 200 किमीच्या अंतरावरून गुजरातच्या दिशेनं गेलं. त्या दिवशी मुंबईत दिवसभर पाऊस पडला. त्यामुळे हवेतील आर्द्रता वाढली."

"याचा परिणाम म्हणून दुसऱ्या दिवशी शहरातलं तापमान 8 ते 9 अंश सेल्सिअस पर्यंत घसरलं. त्यानंतर मागील दोन-तीन दिवसांपासून मुंबईत सरासरीपेक्षा कमीच तापमान आहे. त्यामुळे हे धुरकं तयार झालं आहे."

आणखी एक गोष्ट होसाळीकर यांनी स्पष्ट केली - "मुंबईत खरा हिवाळा अजून सुरू झालेला नाही. ही फक्त तापमानातली घट आहे. त्यामुळे तापमानात अचानक झालेल्या बदलांसाठी मुंबईकरांनी जुळवून घ्यायला हवं आहे."

त्यासाठी अगदी सकाळी बाहेर न पडण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

धुरकं जाईल कधी?

सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी धुरकं जाणवतं. आणि मुंबईच्या पलिकडे कल्याण, बदलापूर आणि अंबरनाथ या भागात त्याचं प्रमाण खूप आहे.

धुलिकण आणि वायू प्रदूषण त्यात मिसळत असल्यामुळे तब्येतीसाठी हे धुरकं नक्कीच धोकादायक आहे.

मग हे धुरकं जाणार कधी? आणि कसं?

मुंबई हवामान विभागाचे प्रभारी संचालक सुनील कांबळे बीबीसी मराठीला सांगतात, "सध्या मुंबईत कमी दाब आणि संथ गतीने वारे वाहत आहेत. त्यामुळे धुरकं जमा झालेलं दिसत आहे. पण धुरकं नैसर्गिक पद्धतीने जाणं अपेक्षित आहे. थोड्या दिवसात वारे वाहू लागले की धुरकं निघून जाईल."

धुरक्यात काय काळजी घ्याल?

जेव्हाही दिल्लीत किंवा उत्तर भारतात कुठेही धुरकं पसरतं तेव्हा भीती असते त्याच्याबरोबर पसरणाऱ्या रोगांची. पण मुंबईत मात्र डॉक्टरनी धुरकं फारसं हानीकारक नसल्याचा निर्वाळा दिला आहे.

ज्यांना श्वसनाचे किंवा दम्याचा विकार आहे, त्यांनी जरा जपून रहावं, असा सल्ला डॉ. गिरिष जयवंत यांनी दिला आहे.

"हवेतल्या अशुद्धींमुळे विषाणू संसर्गाचा धोका आहे. तेव्हा डॉक्टरांकडे लगेच जा. श्वसनक्रियेत कुठलाही त्रास जाणवला तरी डॉक्टरची मदत घ्या," असं त्यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)