'भाषण ठोकून टाळ्या मिळवणारा नेता सरकार चालवू शकत नाही'

गांधी नेहरू घराण्याचे वंशज आणि सोनिया गांधी यांचे सुपुत्र राहुल गांधी यांनी सोमवारी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूकीचा अर्ज भरला.

राहुल हेच काँग्रेसचे भावी अध्यक्ष असतील असं जवळजवळ निश्चित झालं आहे.

त्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीनं त्यांच्या वाचकांना प्रश्न विचारला होता की, राहुल गांधी अध्यक्ष झाले तर काँग्रेसचं भवितव्य बदलेल का? वाचकांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या, त्यातल्याच या काही निवडक प्रतिक्रिया.

दादाराव पंजाबराव लिहीतात की, "पप्पू आता शहाणा झाला आहे हे विरोधकही मान्य करतील. गुजरात निवडणुकीत त्यांचं नेतृत्व प्रामुख्यानं समोर आलं आहे. त्यांचा युवा जोश काहीतरी बदल घडवून आणू शकेल."

"लोकांचा अजूनही गांधी परिवारावर विश्वास आहे हे मान्य करावं लागेल," असं डॉ. विशाल पाटील म्हणतात. "ज्या ज्या वेळेस काँग्रेस रसातळाला गेली त्या त्या वेळेस ती गांधी परिवारानं तारली आहे हा इतिहास आहे," असंही ते पुढे लिहितात.

ज्या तऱ्हेनं राहुल यांनी भाजपाच्या नाकी नऊ आणलेत ते पाहून तर असं वाटतं आहे की काँग्रेसचं भवितव्य बदलेल अशी प्रतिक्रिया हेमंत बोरकर यांनी दिली आहे.

रामेश्वर पाटील यांचं देखील हेच मत आहे. "आजच्या परिस्थितीवरून एवढं तर लक्षात येतं आहे की, भाषण ठोकून टाळ्या मिळवणारा नेता सरकार चालवू शकत नाही. त्यामुळे काँग्रेसचं भवितव्य नक्कीच बदलेल."

तर विजय बोरखडे यांना राहुल गांधी 2019 साठी पर्याय वाटतात.

काँग्रेसमध्ये अनेक मोठे आणि लायक नेते आहेत. त्यांना संधी दिली तरच काँग्रेसमध्ये बदल घडू शकतो असं मत व्यक्त केलं आहे निहाल किरनळ्ळी यांनी.

आशिष सुगत्ययन यांना शशी थरूर हे एकमेव व्यक्ती काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी लायक वाटतात.

मारोती कदम यांना राहुल हे जनतेतलं नेतृत्व नाही घराणेशाहीचं नेतृत्व आहे असं वाटतं.

"काँग्रेसकडे लोकनेत्याची कमतरता आहे. याकडे त्या पक्षानं लक्ष दिलं पाहिजे." अशी सूचना आदमी या अकाऊंटनं ट्वीट केलं आहे.

"काँग्रेसनं काही काळ इतर नेत्यांना संधी द्यावी, नाहीतर हा पर्याय आहेच," असं मत सागर नाईक यांनी व्यक्त केलं आहे.

तुम्ही ही क्विझ सोडवली आहे का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)