दृष्टिकोन : गुजरातमध्ये नरेंद्र मोदींनी शेवटची खेळी खेळण्यात घाई केली का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, आर. के. मिश्रा
- Role, ज्येष्ठ पत्रकार
गुजरात निवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेचा मुद्दा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. एक दिवसात ते अनेक सभा घेत आहेत.
खरं तर यासाठी त्यांच्यावर टीका होते आहे तसंच निवडणुकांमुळे संसदेच्या अधिवेशनाला उशीर होत आहे, असा आरोपसुद्धा होत आहे.
पंतप्रधानांची भाषा आणि भाषणं दोन्हीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आपल्या पहिल्याच सभेत पंतप्रधानांनी त्यांच्या गरिबीच्या पार्श्वभूमीचा उल्लेख केला. त्यांनी सभेत स्वत:ला 'गुजरातचा सुपुत्र' असं म्हटलं आहे.
मोदी एका दशकापेक्षा गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांना या निवडणुकीत जास्त कष्ट करावे लागतात आहे का?
बीबीसीनं या विषयी ज्येष्ठ पत्रकार आर. के. मिश्रा यांच्याशी याबाबतीत चर्चा केली. त्यांना विचारलं की 22 वर्षं गुजरातमध्ये राज्य करणाऱ्या भाजपला विजयाबद्दल शंका आहेत का? मिश्रा यांचं विश्लेषण वाचा त्यांच्याच शब्दांत...
गरिबी हा मोदींचा हुकुमाचा एक्का होता. मला वाटलं की ते याचा वापर शेवटच्या 72 तासांत करतील. ते अपील करतील की, "मी एक चहावाला होतो. तुमच्यामुळे मी इथवर पोहोचलो. तुम्हीच मला मुख्यमंत्री, पंतप्रधान बनवलं. आता हा माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे."
पण त्यांनी तर आपल्या प्रचाराची सुरुवातच या मुद्द्यापासून केली. याचाच अर्थ की काहीतरी गडबड नक्की आहे.
काँग्रेसला, विशेषत: राहुल गांधींना जो प्रतिसाद मिळाला आहे, तसा प्रतिसाद भाजपला गेल्या सहा महिन्यांमध्ये मिळालेला नाही. त्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या काळात या सगळ्या गोष्टी आणखी तीव्र होतील.
वस्तुस्थिती आणि कल्पनांचा खेळ
पंतप्रधान एखादी गोष्ट बोलले म्हणजे ती गंभीर असते. पण सध्या अनेक गोष्टी खऱ्या नाहीत. त्यांना कल्पनेची जोड दिली जात आहे.
मोदी सांगतात की ते 'गुजरातचे सुपुत्र' आहेत आणि म्हणून काँग्रेस त्यांच्याबरोबर अशा प्रकारचा व्यवहार करत आहेत. मग तसं बघायला गेलं तर राहुल गांधीचे आजोबासुद्धा गुजरातचेच आहे.
आणि गुजरातमध्ये भाजपचे जे नेते काँग्रेसशी लढत आहेत, मग ते गुजरातचे सुपुत्र नाहीत का?
मोदी इतिहासाला आपल्या सोयीने वळण देत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
उदाहरणार्थ, केशूभाई पटेल यांना हटवण्यात काँग्रेसची काय भूमिका होती? त्यांनी तर वाघेला यांना हटवलं जे आधी भाजपबरोबरच होते. जेव्हा करार झाला तेव्हा वाघेला यांनी अट ठेवली होती की मोदी यांना गुजरातमधून हटवायला हवं.
सत्याची मोडतोड
मोदींनी चिमणभाईंना सुद्धा यात गोवलं आहे. पण चिमणभाईंना हटवण्याची जी मोहीम होती त्यात जनसंघाचीसुद्धा मोठी भूमिका होती.
मी हे नाही म्हणणार की ते खोटं बोलत आहेत. पण ते इतिहासाची चुकीची व्याख्या करत आहेत आणि त्या इतिहासाला चुकीची दिशा देत आहेत.

मोदी गरिबीला एक 'बॅज ऑफ ऑनर' म्हणून मिरवून इतर लोकांना चूक ठरवत आहेत. पण लालबहादूर शास्त्री तरी श्रीमंत होते का?
ही काय भाषा?
गुजरातमध्ये जी भाषा वापरली जाते त्यात कायम विवेक होता. पंतप्रधान तर फारच दूरची गोष्ट आहे, पण मुख्यमंत्री किंवा इतर मंत्र्याच्या स्तरावर वापरल्या जाणाऱ्या भाषेतही विवेक होता, अदब होती.
नेत्यांमध्ये होणाऱ्या गप्पांमध्ये असो वा विरोधकांशी बोलताना, सर्वांच्या भाषेत आदराची भावना असायची. गेल्या 50 वर्षांत तरी अशा प्रकारचं राजकारण किंवा अशा मुदद्याची चर्चा होताना मी पाहिलं नाही.

फोटो स्रोत, Getty Images
हे खालच्या दर्जाचं राजकारण आहे. असं चित्रं उभं केलं जात आहे की भाजप हाच एक राष्ट्रवादी पक्ष आहे आणि इतर सगळे राष्ट्रविरोधी पक्ष आहेत.
हे कोणत्या प्रकारचं राजकारण आहे? तुम्ही निवडणुकीचे मुद्दे घेऊन जाता पण ते खासगी मुद्दे घेऊन येतात. ते सांगतात, "मी चहा विकत होतो, गरीब होतो." मग बाकी सगळे भाजपा नेते श्रीमंत होते का?
हे असं बोलून तुम्ही राजकीय वादविवादाचं गांभीर्य संपवत आहात.
ते राहुल गांधीच्या मंदिरात जाऊन नमस्कार करण्यावर हल्ला करतात, पण हे लोकंसुद्धा मौलवींच्या प्रचाराला गेले होतेच की.
मोदींनी एकट्याने विकास केला नाही
गुजरातमध्ये जो विकास झाला आहे, त्याचं श्रेय फक्त मोदी स्वत:च घेऊ शकत नाही. गुजरातचा विकास झाला आहे तो गुजराती लोकांमुळे. प्रत्येक सरकारने राज्याला पुढे नेण्यासाठी कष्ट घेतले आहेत.
माधवसिंह सोळंकी यांच्या काळात गुजरातमध्ये पहिला टोल रोड सुरू झाला. पहिलं सरकारी इंडस्ट्रिअल इस्टेट मनुभाई शाह यांच्या काळात आलं जेव्हा ते केंद्रीय मंत्री होते.
गुजरात एक प्रगतिशील राज्य आहे. तिथले विकासाला प्रोजेक्ट करून, त्याचा गवगवा करून मोदी पंतप्रधान झाले आहेत. त्याला खूप प्रसिद्धी देण्यात आली. ग्लोबल समिट झाले.
पण तिथं सतत विकास होतो आहे आणि त्यात सगळ्यांचंच योगदान आहे.
गेल्या निवडणुकांमध्ये मोदींनी सांगितलं होतं की ते पाच वर्षांत 50 लाख घरं तयार करतील. त्यांना विचारा की तीन लाख तरी घरं झाली आहेत का?
आणि कुपोषणाचं काय? कुपोषणात गुजरात सगळ्यांत पुढे आहे.
तीन निवडणुका झाल्या पण मेट्रो आली नाही
खरंतर भाजपकडे नरेंद्र मोदींशिवाय दाखवण्यासारखं काहीच नाही.
2001 मध्ये नरेंद्र मोदी अहमदाबाद मध्ये मेट्रोच्या नावावर लढले होते. आज 2017 सालीसुद्धा मेट्रो आलेली नाही.
पण मेट्रोच्या नावावर त्यांनी कमीत कमी तीन निवडणुका जिंकल्या आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
खरंतर यावेळी भाजपाला दाखवण्यासाठी कोणताही हुकुमाचा एक्का नाही.
म्हणून हे सगळे मुद्दे भाजपाला समोर आणण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण वस्तुस्थितीच्या बळावर फारसं काही होताना दिसत नाही.
20 वर्षांत आपलं सरकार एक कालव्याचं जाळं तयार करू शकलं नाही. आजसुद्धा तुम्ही अगदी कमी पाणी वापरू शकता. त्यासाठी कोणाला दोषी धराल? काँग्रेसला?
पाण्याचा हा प्रश्न सोडवता आला नाही आणि त्यात आता तुम्ही गरीब व्यक्तीची चेष्टा करत आहात म्हणूनच इतक धडपड करायची वेळ आली आहे.
बेरोजगारी वाढते आहे
हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी अल्पेश ठाकोर यांच्याकडे खूप पैसा होता म्हणून ते नेते झाले नाहीत. त्यांना लोकांचा पाठिंबा मिळाला म्हणून ते नेते झाले आणि हेच अनेकांना खुपतं आहे.
त्यांचा आवाज ऐकला गेला नाही. उलट सरकारने हार्दिक पटेलवर देशद्रोहाचा आरोप लावला.

फोटो स्रोत, TWITTER@HARDIKPATEL
म्हणून आज सगळे हे भाजपाच्या समोर येऊन उभे ठाकले आहेत. त्यामुळे ते गोंधळून गेले आहेत.
ज्या पक्षाने 1985 साली निवडणुका जिंकल्या त्यांच्या उणीवा काढतात आहे. तुम्ही सांगा तुम्ही काय केलं आहे?
आपण स्वत: ओढलेली रेष मोठी करू शकत नाही, म्हणून दुसऱ्याने काढलेली रेष कमी करण्याचा हा प्रकार आहे.
मागच्या काही वर्षांत लोकांमध्ये निगेटिव्ह वोटिंगची पद्धत वाढते आहे. 'हे नाही तर अजून कोणी येतील', या मनोवृत्तीने मतदान होण्यास सुरुवात झाली आहे.
ग्रामीण गुजरातेत भाजपाची पकड ढिली
भारतीय जनता पक्षाचा ग्रामीण भागातील प्रभाव कमी झाला आहे. म्हणून ते शहरी भागात जास्त लक्ष घालत आहेत. विकाससुद्धा त्या भागातच जास्त झाला आहे.

फोटो स्रोत, INDRANIL MUKHERJEE/AFP/GETTY IMAGES
गुजरातमध्ये भाजपाचा जोर फक्त विरोधी पक्षाच्या वोट बँकेला तोडणे आणि शहरी भागातल्या मतदारांवर लक्ष ठेवणे दोनच गोष्टीवर आहे.
(ज्येष्ठ पत्रकार आर के मिश्रा यांच्याशी बीबीसी प्रतिनिधी प्रज्ञा मानव यांच्याशी झालेल्या चर्चेवर आधारित.)
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








