भारतातला मध्यमवर्ग खरंच गरीब आहे का?

मुंबईकर नागरिकांचं 2007 साली घेतलेलं छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नव्या संशोधनानुसार, भारतातले 60 कोटी लोक मध्यमवर्गामध्ये गणले जातात.
    • Author, सौतिक बिस्वास
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

"आतापर्यंतच्या नोंद झालेल्या इतिहासात कधीही लोकांची परिस्थिती इतकी झपाट्याने वर जाणारी नव्हती," असं भारताच्या नवमध्यमवर्गाला मनात ठेऊन लेखक गुरुचरण दास लिहितात.

ते म्हणतात, "या लोकांकडे प्रचंड ऊर्जा आहे, काही तरी करण्याची उर्मी आहे. ते बेधडक आहेत, व्यावहारिक आहेत आणि यश मिळवण्यासाठी काहीही करतील, असं वाटतं. एका विलक्षण आणि स्फोटक बाजारपेठेचा ते सगळे भाग बनले आहेत."

2007 मध्ये याच बाजारपेठेला मॅकेन्झी ग्लोबल इन्स्टिट्यूटच्या अभ्यासकांनी भारताचा 'सोन्याचा पक्षी' म्हटलं होतं.

वास्तव मात्र गंभीरपणे विचार करायला लावणारी आहे.

भारतातल्या मध्यमवर्गीयांची नेमकी संख्या किती आहे, हे अजून पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही. अर्थतज्ज्ञांचा अंदाज आहे की, भारतातली 10 ते 30 टक्के लोक मध्यमवर्गीय आहेत, पण मध्यमवर्गाची गणना कशी होते त्यावर हा आकडा अवलंबून आहे.

या स्थितीकडे थोडं तटस्थपणे पाहणारी 2012ची जनगणना आहे. ज्यानुसार भारतात आयकर भरणारे, म्हणजे फक्त 2 कोटी 90 लाख लोक, मध्यमवर्गीय आहेत.

मग खरा मध्यमवर्गीय कोण?

एखाद्याला मध्यमवर्गीय म्हणताना त्याचं वैयक्तिक किंवा कौटुंबिक उत्पन्न लक्षात घेतलं जातं. जसजशी अर्थव्यवस्था सुधारत जाते आणि वैयक्तिक उत्पन्न वाढत जातं, तसतशी बऱ्याच लोकांची परिस्थिती सुधारून ते मध्यमवर्गात प्रवेश करतात.

अर्थतज्ज्ञ संध्या कृष्णन आणि नीरज हातेकर यांच्या एका अभ्यासानुसार, भारताच्या लोकसंख्येच्या अर्ध्याहून अधिक लोकसंख्या, म्हणजेच जवळजवळ 60 कोटी लोक मध्यमवर्गात मोडतात.

In this picture taken 06 December 2006, an Indian man pulls a cycle rickshaw past office buildings, in Gurgaon, some 30 km south of New Delhi. India's estimated 300-million-strong middle-class is not only gaining from the country's rapidly growing economy but is also driving the consumption boom. India's economy -- the second-fastest growing after China's -- grew 9.2 percent in the second quarter to September.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, The 'new' middle class is fuelled by the expansion of the poor who have moved up

पण या मध्यमवर्गाचं जीवनमान कार, वॉशिंग मशीन, कॉम्प्युटर आणि क्रेडिट कार्डशी जोडलेलं नाही.

अर्थतज्ज्ञांच्या मते, दरदिवशी 130 - 650 रुपये (दोन ते 10 डॉलर, 1 डॉलर = अंदाजे 65 रुपये) कमावणाऱ्या लोकांना मध्यमवर्गीय म्हणता येईल. हे आकडे 1993 साली मोजलेल्या लोकांच्या क्रयशक्तीच्या तुलनेतले आहेत.

पर्चेसिंग पॉवर पॅरिटी (PPP) असं या तुलनेला म्हणतात. याचा अर्थ तुमच्याकडे असलेल्या पैशाने तुम्ही वेगवेगळ्या देशांत काय विकत घेऊ शकता, हे क्रयशक्तीच्या आकड्यांवरून कळतं.

दोन श्रेणीतला मध्यमवर्ग

अर्थतज्ज्ञांनी मध्यमवर्गाला दोन श्रेणींमध्ये विभागलं आहे - साधारण 150 ते 300 रुपये (दोन ते चार डॉलर्स) दररोज खर्च करून राहणारे निम्न मध्यमवर्गीय आणि 390 ते 650 (6 ते 10 डॉलर) खर्च करणारे उच्च मध्यमवर्गीय.

ही आकडेवारी पाहिली तर कृष्णन आणि डॉ. हातेकर यांना हा नवा मध्यमवर्ग जास्त विविधांगी वाटतो. पारंपरिकदृष्ट्या बघायचं झालं तर भारतातल्या मध्यमवर्गात तथाकथित वरच्या जातीतल्या लोकांचं वर्चस्व होतं.

अर्थतज्ज्ञ म्हणतात की, निम्न मध्यमवर्गीयांमुळेच मध्यमवर्गीयांची संख्या वाढली आहे. हे मध्यमवर्गीय शेती आणि बांधकामासारख्या क्षेत्रांत कार्यरत आहेत, ज्या क्षेत्रांमध्ये आधी गरीबच लोक काम करत होते.

आता या कार्यक्षेत्रात दोन तृतीयांश लोक मध्यमवर्गातून येतात, असं संशोधनात आढळून आलं आहे.

आताचा मध्यमवर्ग हा म्हणूनच वैशिष्ट्यपूर्ण आहे, असं संध्या कृष्णन आणि नीरज हातेकर यांचं म्हणणं आहे.

ते म्हणतात, "आताच्या मध्यमवर्गात बांधकाम व्यवसायासारख्या असंघटित क्षेत्रातले लोक आणि आतापर्यंत वंचित राहिलेल्या जातीसमूहातल्या लोकांचा समावेश आहे."

"सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे सुशिक्षित, उच्चवर्णीय लोकांनाच मध्यमवर्गीय म्हणण्याची पारंपरिक संकल्पना आता राहिलेली नाही."

पण कोणताही मोठा आर्थिक धक्का बसला तर हा नवा मध्यमवर्ग पुन्हा एकदा गरिबीच्या चक्रात अडकू शकतो, हेही ते मान्य करतात.

गुरगावच्या एका रेस्टॉरंटमध्ये 2016 साली घेतलेलं छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारतातल्या उच्चमध्यमवर्गाकडे त्यांच्या चैनीसाठी खर्च करण्याची क्षमता आहे.

पण त्यांच्यातल्या बऱ्याच जणांना सध्या मंदावलेल्या आर्थिक वाढीचा फटकाही बसला आहे. लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, बांधकाम क्षेत्रात लोकांचे पगार कमी करण्यात आले आहेत.

अमेरिकेतल्या ड्युक युनिव्हर्सिटीत राज्यशास्त्र आणि धोरणविषयक विभागात काम करणारे अनिरुद्ध कृष्णा यांच्या मते, "गरिबीजवळच्या आणि नाजूक स्थितीतल्या लोकांना सामावून घेतल्यामुळे मध्यमवर्गाचा बराच विस्तार झाला आहे."

"दर दिवशी किमान 650 रुपयांचं (10 डॉलर) उत्पन्न असणारे मध्यमवर्गीय, असा निकष लावला तर दोन टक्क्यांपेक्षा कमी लोकांनाच या वर्गात स्थान मिळेल," ते म्हणतात.

पण जर तुम्ही दिवसाला अंदाजे 130 रुपये (दोन डॉलर) उत्पन्नाचा निकष लावला तर मात्र घरकाम करणाऱ्या स्त्रिया, वाहनचालक, सुरक्षारक्षक, बांधकाम कामगार, अशा अनेक गटांना मध्यमवर्गात सामील करावं लागेल.

School children in India

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, There are concerns whether there is enough quality education to match the growing demand

डॉ. कृष्णा म्हणतात, "आर्थिक अस्थिरतेपासून दूर जाण्याचं स्वातंत्र्य आणि प्रगती करून वरच्या वर्गात जाण्याची खरी संधी ठरवते की, तु्म्ही मध्यमवर्गीय आहात की नाही."

"त्यामुळे जे लोक मध्यमवर्गात नाहीत, ते नेहमीच तिकडे जाण्याच्या प्रयत्नात असतात. मध्यमवर्गात जाण्याची ही महत्त्वाकांक्षा कोणत्या आकडेवारीवर किंवा एका ठरावीक गोष्टीवर बेतलेली नाही."

डॉ. कृष्णा एक महत्त्वाचा मुद्दा मांडतात. "किती लोकांची महत्त्वाकांक्षा घरकाम करण्याची किंवा बांधकाम कामगार होण्याची असते, याचा अंदाज कसा बांधणार? किंवा कुणास ठाऊक, ते आत्ताच स्वत:ला मध्यमवर्गीय मानत असतील,"

काय आहेत मध्यमवर्गाच्या आकांक्षा ?

देवेश कपूर, निलंजन सरकार आणि मिलन वैष्णव यांनी प्रसिद्ध केलेल्या एका शोधनिबंधात त्यांनी याच आशा-आकांक्षांचा वेध घेतला आहे. संशोधनाअंतर्गत त्यांनी भारतातल्या 70 हजार शहरी आणि ग्रामीण लोकांना विचारलं की, ते स्वत:ला मध्यमर्गीय समजतात का आणि कसे?

त्यांना स्वत:ची ओळख कशी सांगावीशी वाटते, याबद्दलही त्यांनी लोकांना विचारलं. ज्या वर्गात तुम्ही मोडता त्यावरून तुमचं वर्णन करणारी जी विशेषणं वापरली जातात त्याबद्दल त्यांना काय वाटतं याचीही चाचपणी या अर्थतज्ज्ञांनी केली.

साबणाचे फुगे विकण्याचं यंत्र विकणारा तरुण

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारतातल्या लाखो तरुणांकडे अजूनही कौशल्यांची कमतरता आहे.

देशभरातल्या 24हून अधिक राज्यांमध्ये, सर्व वयोगट, उत्पन्नगट आणि सामाजिक गटातल्या 40 ते 60 टक्के लोकांचं म्हणणं होतं की, ते मध्यमवर्गातले आहेत.

खरं सांगायचं तर, खेडेगावापेक्षा शहरातले लोक स्वत: ला जास्त मध्यमवर्गीय म्हणवतात. अजूनही 70 टक्के भारतीय लोक खेड्यांमध्ये राहतात, ही वस्तुस्थिती इथं लक्षात घ्यायला हवी.

पण खालच्या उत्पन्नगटाल्या 45 टक्के लोकांनीही स्वत:चा उल्लेख 'मध्यमवर्गीय', असा केला. त्याचं प्रमाण श्रीमंत वर्गापेक्षा फक्त तीन टक्क्यांनी कमी आहे.

सर्वेक्षणात भाग घेतलेल्या लोकांना त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेबाबत, मुलाबाळांच्या जीवनमानाबाबत आणि एकंदरच देशाच्या प्रगतीबाबत प्रश्न विचारण्यात आले.

तर या शोधपत्राच्या लेखकांना कळलं की स्वत:ला मध्यमवर्गीय मानणारे लोक त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीबाबत जास्त सुरक्षित आणि आशावादी आहेत. बेरोजगारी, वाढती विषमता आणि कमी होणारी रोजंदारी सारख्या समस्या उद्भवल्या तरी ते बिनधास्त आहेत.

'स्टेटस'ला महत्त्व

या अभ्यासातून लोकांना जितकी उत्तरं मिळालं, तितकेच प्रश्नंही उपस्थित झाले.

मध्यमवर्ग या 'स्टेटस'ला महत्त्व देणारा वर्ग आहे. हे 'स्टेटस' आपल्यालाही मिळावं, असं गरिबांना वाटतं का?

किंवा आणखी महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या भाषागटांतल्या लोकांनी या प्रश्नांचा अर्थ त्यांच्या परीने लावलेला असू शकतो.

काहीही असलं तरी ही दोन्ही संशोधनांतून काही गोष्टी स्पष्ट होतात.

पहिलं म्हणजे, देवेश कपूर, निलांजन सरकार आणि मिलन वैष्णव यांच्या मते, महत्त्वाकांक्षी मध्यमवर्गात आदर्शवाद बाळगण्यापेक्षा स्वत:चा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावण्यावर अधिक भर देण्यात येत आहे.

दुसरं म्हणजे, हा मध्यमवर्ग आता आपलं मतही एकदम व्यावहारिक पद्धतीने व्यक्त करत आहेत. जाती-धर्माच्या राजकारणापलीकडे जाऊन आता या वर्गातले लोक चांगलं प्रशासन आणि नोकरीच्या संधी मिळाल्या नाहीत, तर शासन किंवा एखाद्या नेत्याप्रती आपली निष्ठा बदलू शकतात.

2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या भाजपला लोकांनी जोरदार समर्थन दिलं. कारण या पक्षाने त्यांना आशा दाखवली. पण दोन्ही संशोधनातले लेखक म्हणतात की, मध्यमवर्गीयांचा हा पाठिंबा कोणत्याही सरकारला गृहित धरून चालणार नाही.

कुठे आहेत संधी ?

मध्यमवर्गीय होण्याची पात्रता असलेल्या या लोकांमध्ये भविष्यासाठी छोटी गुंतवणूक करण्याची क्षमता आहे. ते नवा व्यवसाय सुरू करू शकतात. त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकतात. पिण्याचं स्वच्छ पाणी आणि चांगलं अन्नही ते पुरवू शकतात.

पण हे सगळं नुसतं बोलणं आणि करणं यात फरक आहे. चांगला व्यवसाय करण्याच्या संधी खरंच आहेत का, किंवा चांगलं शिक्षण मिळण्याचे मार्ग आहेत का, हा प्रश्नच आहे, असं मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक अभिजीत विनायक बॅनर्जी यांना वाटतं.

" हे वातावरण जर असंच गढूळलेलं राहिलं तर यातून चांगली पिढी निर्माण होणार नाही. या गोष्टी सुधारत नाहीत, तोपर्यंत तरी भारतातला हा नवमध्यमवर्ग कमजोरच राहणार आहे ", ते नोंदवतात.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)