सोशल - 'कोहली सचिनला तोडीस तोड आहे, पण 'बाप बाप होता है'

सलग 24 वर्षं क्रिकेटचं मैदान गाजवणारा मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकर चार वर्षांपूर्वी 16 नोव्हेंबर रोजी निवृत्त झाला होता. 2013 मध्ये मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर झालेली वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी क्रिकेटचा देव असलेल्या सचिनच्या कारकीर्दीतली दोनशेवी आणि शेवटची कसोटी ठरली.

रेकॉर्ड्स म्हटलं की डोळ्यांसमोर अगदी आपोआप उभा राहतो तो सचिन तेंडुलकर. टेस्ट असो वा वन डे, जवळपास सगळे मोठे रेकॉर्ड सचिनच्या नावावर आहेत.

पण आता विराट कोहली नावाचं एक तरुण वादळ या रेकॉर्ड्सना चॅलेंज करत आहे. विराटचा करिअर ग्राफ बघता तो सचिनचे रेकॉर्ड मोडेल, असं जाणकार सांगतात. त्यामुळे साहजिकच आता या दोघांची तुलनाही होऊ लागली आहे.

2014 नंतर आपल्या याच दमदार कामगिरीच्या जोरावर विराट कोहलीनं वन-डे आणि टी-20 रँकिंगमध्ये अधिराज्यही गाजवलं आहे.

यावर बीबीसी मराठीने सोशल मीडियावर वाचकांना आपलं मत विचारलं होतं.

त्यावरून सोशल मीडियावर रंगलेल्या चर्चेचा हा आढावा.

एक वाचक पारस प्रभात म्हणतात, "भारतीय क्रिकेट आणि विराट या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. विराट ज्या आक्रमकपणे फलंदाजी करतो, ती पाहता तो सचिनपेक्षाही एक पाऊल पुढे राहील."

प्रसन्न श्रीप्रकाश कुलकर्णी यांनी या दोन्ही खेळाडूंची तुलना करू नये, असं म्हटलं आहे. ते म्हणतात,"सचिनच्या काळातल्या क्रिकेटमध्ये आणि आताच्या क्रिकेटमध्ये कमालीचं अंतर आहे. प्रत्येक खेळाडू वेगळा असतो. विराट आणि सचिनमधला मूलभूत फरक म्हणजे त्यांची शैली भिन्न आहे. त्यामुळे त्यांची तुलना करू नये."

तर भाग्यश्री जगताप यांचं मत प्रसन्न कुलकर्णी यांच्यापेक्षा वेगळं आहे.

"जर सचिन क्रिकेटचा देव असेल तर विराट इंद्र देव म्हणजेच देवांचा देव आहे," असं भाग्यश्री म्हणतात. तसंच, विराट सचिनला नक्कीच मागे टाकेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

मोहित कुलकर्णी यांच्या मते "दोघे तोडीस तोड आहेत. पण "बाप बाप होता है"."

"सचिन क्रिकेटचा देव आहे. त्याची कोणाशीच तुलना होऊ शकत नाही. त्याचे सर्व रेकॉर्ड्स कोणीही तोडले तरीही...," अशी प्रतिक्रिया देताना नंदन कांबळी यांनी आपलं मत मुद्देसूद मांडलं आहे.

"कोहली तसा अग्रेसिव्ह आहे. सचिनचे रेकॉर्ड तो नक्कीच मोडेल. पण कसोटीमध्ये अजून सुधारणेला वाव आहे. निदान इंग्लंडमध्ये तरी जेम्स अँडरसनसमोर कोहलीची परीक्षा अजून बाकी आहे," अशी माहितीपूर्ण प्रतिक्रिया सचिन कडू यांनी दिली आहे.

"सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव मानला जातो. तो एक अद्भुत चमत्कार आहे. चमत्कार हा नेहमी होत नसतो," असं लक्ष्मीकांत मुळे यांनी म्हटलं आहे.

शैलेश झगडे म्हणतात, "देवाची जागा कुणीच घेऊ शकत नाही..."

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)