You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'पुणे विद्यापीठ : दक्षिणेतलं हार्वर्ड आहे की रेस्टॉरंट?' सोशल मीडियावर चर्चेला ऊत
विद्यार्थी शाकाहारी असला पाहिजे, या निकषामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वादाच्या भोवऱ्यात सापडलं. सोशल मीडियावर यासंदर्भातल्या चर्चेला ऊत आला.
दरम्यान शेलार मामा सुवर्णपदक पारितोषिकावरून निर्माण झालेल्या वादानंतर सावित्रीबाई फुले विद्यापीठाने या पुरस्काराला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत देण्यात येणाऱ्या ह.भ.प. योगमहर्षी राष्ट्रीय कीर्तनकार रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलारमामा सुवर्णपदक पुरस्कारासाठीच्या निकषांमध्ये विद्यार्थी शाकाहारी असला पाहिजे, या निकषाचा समावेश होता.
तसंच योगासनं, ध्यानधारणा करणाऱ्या विद्यार्थ्याचा या पारितोषिकासाठी प्राधान्याने विचार व्हावा, अशी अटही विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात होती. या निकषांसंदर्भात वाद झाल्यानंतर विद्यापीठाच्या वेबसाईटवरून परिपत्रक काढून टाकण्यात आलं.
विद्यापीठाच्या या पारितोषिकासंदर्भातल्या परिपत्रकाची चर्चा सोशल मीडियावर मात्र चांगलीच गाजली आणि त्यावर अनेकांनी टीका केली.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यासंदर्भात म्हणाले, "शेलार मामा सुवर्णपदकावरून वाद झाला. या पुरस्काराला स्थागिती देण्यात आली आहे."
"शेलार यांच्या कुटुंबीयांशी चर्चा करून या पुरस्काराच्या निकषांत बदल केले जातील. यामागे कोणाच्याही भावना दुःखावण्याचा हेतू नव्हता. अशा स्वरूपाचे विविध 40 दिले जातात, त्यांच्याही अटी आणि शर्थी तपासण्यात येतील", असंही कुलगुरू डॉ. करमळकर म्हणाले.
दरम्यान बीबीसी मराठीने या विषयावर वाचकांना सोशल मीडियावर प्रतिक्रिया विचारल्या होत्या.
यावर टीका करताना काही वाचकांनी हा निकष म्हणजे सुसंस्कृत मूर्खपणा असल्याचं म्हटलं आहे. तर काही वाचकांनी शेलारमामा माळकरी असल्याने हे सुर्वणपदक त्यांच्या अटीनुसार द्यावं, असं मत व्यक्त केलं आहे.
बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर झालेल्या या चर्चेचा हा गोषवारा.
रामेश्वर पाटील म्हणतात, "पुणे विद्यापीठ दक्षिणेतील हार्वर्ड म्हणून ओळखलं जायचं. पण आता या विद्यापीठाचं रुपांतर एका हिंदू मदरश्यामध्ये झालं आहे."
दुसरीकडे या निकषाचं समर्थन करताना गिरीश कुलकर्णी यांनी ही योजना भारतीय संस्कृतीला उत्तेजन देणारी असल्याचं म्हटलं आहे.
हा निकष सुसंस्कृत मूर्खपणा असल्याचं प्रकाश दळवी यांनी म्हटलं आहे.
वा अजीतोव म्हणतात, "अशी मानसिकता पुणेरी पाट्यांपूर्ती ठीक आहे. मात्र ही विकृती जेव्हा शिक्षणात शिरते तेव्हा सर्वांनाच भस्मसात करून टाकते."
"कोणी काय खाल्लं आहे हे टेस्ट कसं करणार?" अशी विचारणा निलेश पवार यांनी केली आहे.
हितेन पवार म्हणतात, "विशिष्ट समूहाकडून पुरस्कृत श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची ही एक विकृत प्रवृत्ती आहे. शाकाहार आणि ध्यानधारणा नियमित केल्यानं बुद्धिमत्ता सिद्ध होत नाही."
अभिराम साठे आपल्या प्रतिक्रियेत स्पष्ट म्हणतात, "परीक्षेत अव्वल येणं, मद्यपान न करणं, मांसाहार न करणं, रोज प्राणायाम करणं, व्यसन न करणं या गोष्टी वाईट आहेत का? ट्रस्ट खाजगी आहे. पुरस्काराच्या अटी मान्य नसतील तर अर्ज करू नका. आग्रह नाही."
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या या प्रकरणात होत असलेल्या राजकीय हस्तक्षेपावर वैभव देशपांडे टीका करतात.
सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरे यांनी हस्तक्षेप करणं मूर्खपणाचं असल्याचं वैभव देशपांडे म्हणतात.
ते म्हणतात, "माळकरी मांसाहार करत नाहीत. हा वारकरी पंथ जुना आहे. माळकरी बनण्याची सक्ती कुणावरही नसते. माळकरी असलेल्या शेलारमामांनी या सुवर्णपदकासाठी त्यांच्या काही अटी घातल्या आहेत. त्या अटींनुसार ते द्यावेत, असं त्यांनी सांगितलं असेल तर विद्यापीठाला ते पाळणं बंधनकारक आहे. राजकारणापासून अलिप्त अशा वारकऱ्यांना यात आणू नका."
"हे विद्यापीठ आहे की रेस्टॉरंट," अशी विचारणा विजय पोखरीकर यांनी केली आहे.
"मी पूर्ण शाकाहारी आहे पण या निर्णयाचा मी जोरदार निषेध करतो," असं सुभाष जोशी यांनी लिहिलं आहे. पारस प्रभात लिहितात की, लोकांनी काय खावं हा वैयक्तिक विषय आहे.
सागर शिंदे म्हणतात, "पुरस्कार पात्रतेसाठी केलेले सगळे अटी नियम चांगले आहेत. पण मांसाहार करणाऱ्या विद्यार्थ्यांना नाकारण्याची एकच अट चुकीची आहे. बाकी कोणी काय खावे काय नाही हे भारताच्या विविध ठिकाणांवर अवंलबून आहे."
कौस्तुभ जोशी म्हणतात, "गेली अनेक वर्षं ही नोटीस लागते आहे आणि हा ट्रस्ट असे पुरस्कार देतो, अशी माझी माहिती आहे. तुम्हाला त्यासाठी अर्ज करायचा नसेल तर तो तुमचा हक्क आहे."
(पुण्याहून सागर कासार यांच्या अतिरिक्त माहितीसह)
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)