प्रेस रिव्ह्यू - 'महिलांचा आत्मसन्मान मंदिरापेक्षा मोठा नाही'

महिला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे.

इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, केरळमधील शबरीमला मंदिराचं 'थायलंड' होऊ देणार नाही. असं वक्तव्य त्रावणकोर देवासम बोर्डाचे अध्यक्ष व काँग्रेसचे नेते प्रायर गोपालकृष्णन यांनी शुक्रवारी केलं आहे.

त्रावणकोर देवासम बोर्डातर्फे शबरीमला मंदिराचा कारभार पाहिला जातो. सुप्रीम कोर्टात मासिक पाळी सुरू असलेल्या महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेश देण्याच्या मुद्द्यावर निकाल प्रलंबित आहे.

याबाबत बोलताना गोपालकृष्णन म्हणाले की, "कोर्टानं मासिक पाळी असलेल्या महिलांना मंदिरात प्रवेश दिला तरी आम्ही शबरीमला मंदिराचं 'थायलंड' होऊ देणार नाही. महिलांचा आत्मसन्मान मंदिरापेक्षा मोठा नाही."

सोनिया गांधी आणि राहूल गांधी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राहुल गांधी लवकरच काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारतील असं सुतोवाच सोनिया गांधी यांनी केलं.

राहुलची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड होणार - सोनिया गांधी

टाइम्स ऑफ इंडियामधील वृत्तानुसार, राहुल गांधी लवकरच काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारतील असं सुतोवाच सोनिया गांधी यांनी शुक्रवारी केलं. सोनिया यांच्याकडून राहुल कार्यभार स्वीकारतील.

तसंच, पक्षातील अंतर्गत निवडणुकीत नव्या पिढीकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

प्रणव मुखर्जी व मनमोहन सिंग

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुखर्जी माझ्यापेक्षा पंतप्रधान पदाचे चांगले दावेदार होते, असं वक्तव्य मनमोहन सिंग यांनी केलं आहे.

प्रणव मुखर्जी पंतप्रधानपदाचे खरे दावेदार होते - डॉ. मनमोहन सिंग

इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, "प्रणव मुखर्जी यांना नाराज होण्याचा पूर्ण अधिकार आहे. कारण, युपीए सरकारच्या काळात पंतप्रधान पद मी 10 वर्षे सांभाळले. मात्र, मुखर्जी माझ्यापेक्षा या पदाचे ते चांगले दावेदार होते."

असं दिलखुलास वक्तव्य माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केलं.

शुक्रवारी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या 'द कोएलेशन इयर्स' या तिसऱ्या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या वेळी ते बोलत होते.

सर्वोच्च न्यायालय

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हुंडाप्रकरणी छळ केल्यास महिलेचा पती आणि नातेवाईकांना तत्काळ अटक होईल - सुप्रीम कोर्ट

तात्काळ अटक कायम?

टाइम्स ऑफ इंडियामधील वृत्तानुसार, सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय पीठानं शुक्रवारी महत्त्वपूर्ण निकाल दिला.

हुंड्याबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या एका निकालात भारतीय दंडविधानाच्या 498 अ कलामाचा लोप होत होता. या कलमान्वये हुंडाप्रकरणी छळ केल्यास संबंधीत महिलेचे पती आणि नातेवाईकांना तत्काळ अटक करता येते.

हुंडा छळप्रकरणी 27 जुलैला सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालात तत्काळ अटकेबाबत वाच्यता करण्यात आली नव्हती.

त्यामुळे या निकालाला सरन्यायाधिशांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठानं आक्षेप घेतला.

मुंबई विद्यापीठ

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एका विद्यार्थ्यानं मुंबई विद्यापीठानं उत्तरपत्रिका गहाळ केल्याबद्दल त्यांच्याकडून तब्बल २० लाख रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

उत्तरपत्रिका गहाळ झाली आता 20 लाख द्या

महाराष्ट्र टाइम्समधील वृत्तानुसार, मुंबई विद्यापीठानं उत्तर पत्रिका गहाळ केल्याबाबत एका विद्यार्थ्यानं उच्च न्यायालयात धाव घेत 20 लाखांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

विद्यापीठानं निकाल लावण्यास उशीर केला आहे, तसंच बहुतांश विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गहाळ केल्याचं महाराष्ट्र टाईम्सनं वृत्तात लिहीलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)