You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'जाने भी दो यारो'चे दिग्दर्शक कुंदन शाह यांचं निधन
चित्रपट दिग्दर्शक कुंदन शाह यांचं शनिवारी सकाळी निधन झालं. 19 ऑक्टोबर 1947 साली जन्मलेले कुंदन शाह 69 वर्षांचे होते.
पुण्याच्या 'फिल्म अॅंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया' अर्थात FTII मधून त्यांनी दिग्दर्शनाचा कोर्स पूर्ण केला. त्यानंतर 1983 साली प्रदर्शित झालेल्या 'जाने भी दो यारो' या चित्रपटापासून त्यांनी चित्रपट क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली.
या चित्रपटासाठी त्यांनी सहाय्यक पटकथा लेखक म्हणून सुद्धा काम केलं होतं.
'जाने भी दो यारो' चित्रपटाच्या माध्यमातून देशातील भ्रष्टाचारावर कटाक्ष टाकण्यात आला होता. 1983 साली आलेल्या या चित्रपटाची जादू आजही लोकांमध्ये कायम आहे.
या चित्रपटात नसीरुद्दीन शाह, रवि वासवानी, भक्ती बर्वे, पंकज कपूर आणि सतीश शाह यांनी काम केलं होतं.
चित्रपटाचं दिग्दर्शन कुंदन शाह यांनी केलं होतं, तर निर्मिती एनएफडीसी ( राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ ) यांनी केली होती.
2012 साली या चित्रपटाची नवीन प्रिंट रिलीज करण्यात आली. तेव्हा या चित्रपटाशी संबंधित असणाऱ्या काही जणांसोबत बीबीसीने चर्चा केली होती. यावेळी त्यातील काही जणांनी चित्रपटाशी संबंधित काही मनोरंजक किस्से सांगितले होते.
दिग्दर्शक कुंदन शाह
नसीरुद्दीन शाह यांनी चित्रपटासाठी होकार दिला, हा माझ्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण होता. खरं तर आमच्यासारख्या लोकांसाठी नसीरुद्दीन शाह हे अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही मोठे कलाकार होते.
मला जेव्हा माहीत झालं की, चित्रपट दुसऱ्यांदा रिलीज करण्यात येणार आहे तेव्हा मी चिंतेत होतो.
वाटलं, आता या चित्रपटाला काण बघेल? पण, मी ज्या-ज्या लोकांशी यासंबंधी चर्चा केली त्यांनी सांगितलं की, ते हा चित्रपट नक्की बघतील. यामुळं मला आश्चर्य झाला आणि आनंदही. कारण इतक्या वर्षानंतरही चित्रपटाविषयी लोकांमधील उत्साह कायम आहे.
ज्यावेळी मी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली तेव्हा क्षणभरासाठीही वाटलं नव्हतं की, हा चित्रपट एवढा चर्चेत येईल. खूप काटकसरीत चित्रपट पूर्ण केला होता. चित्रपटासाठी एकूण 6 लाख 84 हजार रुपयांचं बजेट ठरवलं गेलं होतं.
चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एवढी चणचण होती की, शूटिंगसाठी 60 ते 70 लोक असायचे. पण, जेवण मात्र 35 लोकांसासाठीचं यायचं. मग आम्ही डाळीत पाणी मिसळून खायचो. पोळ्या संपायच्या. मग पाव मागवायचो आणि खायचो. चित्रपटात नसीरुद्दीन शाह यांनी जो कॅमेरा वापरला आहे, तो त्यांचा स्वत:चाच होता. आमच्याकडे प्रॉपर्टीसाठीसुद्धा बजेट कमी होतं.
अजून एक मजेदार बाब म्हणजे, शूटिंगसाठी लायटिंगची गरज पडत असे. पण त्यासाठी आमच्याकडं जनरेटर नव्हता. मग आम्ही वीजेची चोरी करायचो. म्हणजे बघा कसा विरोधाभास आहे... ज्या चित्रपटात आम्ही भ्रष्टाचाला लक्ष्य केलं होतं, त्याच चित्रपटाच्या शूटिंगसाठी आम्हाला वीज चोरावी लागली.
शूटिंगच्या पहिल्या तीन-चार दिवसांतच एवढी तंगी जाणवायला लागली होती की, चित्रपट केव्हा पूर्ण होईल याची सर्व जण वाट पाहायला लागले होते. कारण, पहिले तीन दिवस शूटिंग झालंच नव्हतं आणि पुढच्या दिवसांचं सामान येऊन पडालंही होतं.
आतापर्यंत मी काम केलेल्या चित्रपटांत 'जाने भी दो यारों'चं सर्वांत गरीब फिल्म युनिट असल्याचं ओम पुरींनी म्हटलं होतं.
ज्यावेळी चित्रपटातील सर्वात गाजलेला असा महाभारताचा सीन शूट होत होता, त्यावेळी आम्हाला समजत नव्हतं की, या सीनसाठी संवाद कसे लिहावेत?
यामुळं मी आणि सतीश कौशिक चिंतेत होतो. त्यावेळी आमच्यासोबत असलेले दुसरे लेखक रंजित कपूर म्हणाले की, काही चिंता करायची गरज नाही. चला माझ्यासोबत. मग त्यांच्यासोबत जाऊन आम्ही फुटपाथवर विक्रीला ठेवलेलं 'द्रौपदी चीरहरण' हे अडीच रुपयांचं पुस्तक विकत घेतले आणि मग त्यातून प्रेरणा घेऊन उर्वरित संवाद लिहिले.
यातही आम्ही लिहिलेले संवाद वेगळेच होते आणि शेवटी एडिट होऊन अंतिम झालेला सीन वेगळाच काहीतरी होता.
पंकज कपूर, अभिनेता
मी या चित्रपटात तरनेजाचा भूमिका केली होती. चित्रपटाच्या शूटिंगसाठीची जागा शोधण्यासाठी आपल्याला रेकी करायची आहे असं कुंदन शाह एकदा म्हणाल्याचं मला चांगलंच आठवतं.
मला वाटलं, कुंदन कार घेऊन येतील आणि मग आम्ही रेकी करायला जाऊ. पण, कुंदन आले ते एसटी बसमध्ये. शेवटी आम्ही धक्के खात-खात जागेवर पोहोचलो.
त्यानंतर चार घंट्यांनी कुंदन यांनी मला कोल्ड ड्रिंक प्यायला दिली. तेव्हा मी मनातल्या मनातल्या म्हटलं, आज तर माझं भाग्यच खुललं. चक्क कुंदन यांनी मला कोल्ड ड्रिंक पाजली होती.
मी जेव्हा माझ्या भूमिकेविषयी त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करायचो तेव्हा ते हिशोब लावण्यात मग्न दिसायचे.
समोर चालून हा चित्रपट 'कल्ट' हे स्टेटस मिळवेल याची आम्हाला तेव्हा शक्यताही वाटली नव्हती. आणि जर आम्हाला तसं वाटलं असतं तर हा चित्रपट इतका उत्कृष्टही बनवता आला नसता.
चित्रपटातील गाजलेला महाभारताचा सीन सतीश कौशिक आणि रंजित कपूर यांनी मिळून लिहिला होता.
मला वाटतं, आज पूर्वीपेक्षाही जास्त यश चित्रपटाला मिळेल. कारण, तेव्हा आम्ही सर्व नवीन होतो. आमच्यापैकी बहुतेकांना जास्त कोणी ओळखतही नसे. शिवाय त्या काळात या प्रकारच्या चित्रपटांकडे लोकांचा ओढाही कमी असायचा. आज मात्र नवीन विषयांवर आलेल्या चित्रपटांना लोक चांगला प्रतिसाद देत आहेत.
माझा मुलगा शाहीद कपूर नेहमी विचारतो की, या काळात 'जाने भी दो यारो'सारखे चित्रपट का बनत नाहीत? यामुळेच मला वाटतं की, युवकांना हा चित्रपट खूप आवडेल.
सतीश शाह, अभिनेता
मला या चित्रपटासाठी पाच हजार रुपये मिळाले होते. सर्वांत जास्त मानधन, 15 हजार रुपये नसीरुद्दीन शाह यांना मिळालं होतं. कारण, त्यावेळी त्यांचं इंडस्ट्रीत बरंच नाव होतं.
आम्ही चित्रपटात काम करण्यासाठी यामुळं तयार झालो होतो कारण, आमच्यातील बहुतेक जण त्यावेळी नवीन होते. कुणाकडेही काम नसायचं. इंग्रजीत म्हण आहे ना, 'बेगर्स कान्ट बी चूसर्स' तशी आमची परिस्थिती होती.
पण, एका महान चित्रपटाचा आम्ही भाग होतोय असं त्यावेळी आम्हाला वाटलं नव्हतं.
आजच्या काळात असा चित्रपट बनवणं अशक्य आहे. आता कुठं इतके सारे कलाकार तेही एवढ्या जास्त दिवसांसाठी वेळ काढू शकतील. चित्रपटाची कथा, पटकथा, दिग्दर्शन सर्व काही उत्कृष्ट होतं.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)