प्रेस रिव्ह्यू: महिला आरक्षण विधेयक मंजुरीसाठी बहुमत वापरा

फोटो स्रोत, Getty Images
महिला आरक्षण विधेयकाच्या मंजुरीसाठी तुमच्याकडे असलेल्या बहुमताचा वापर करा, असं आवाहन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलं आहे.
एनडीटीव्हीनं दिलेल्या एका वृत्तानुसार पंतप्रधानांना लिहिलेल्या एका पत्र सोनिया यांनी आवाहन केल्याचं आहे.
गेल्या सात वर्षांपासून हे विधेयक कोणत्या ना कोणत्या कारणामुळं मंजूर होत नसल्याचं त्या म्हणाल्या. विधेयकाच्या मंजुरीसाठी मोदींनी पुढाकार घेतला तर या विधेयकाला काँग्रेसकडून पूर्णपणे पाठिंबा असेल, असंही त्या म्हणाल्या.
'कुणी माझा गळा चिरला तरी चालेल...'

फोटो स्रोत, Getty Images
कुणी माझा गळा चिरला तरी चालेल, पण मी काय करायला हवं हे कुणी दुसरी व्यक्ती सांगू शकत नाही, असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर ला दुर्गा प्रतिमांचं विसर्जन करता येईल, असा निकाल उच्च न्यायालयाने दिला. ममता यांची ही प्रतिक्रिया हिंदुस्तान टाईम्सनं एका वृत्तात दिली आहे.
मोहर्रमच्या दिवशी (1 ऑक्टोबर) दुर्गा प्रतिमांचं विसर्जन करू नका, असा आदेश ममता बॅनर्जी यांनी काढला होता. त्याविरोधात दुर्गा पूजा मंडळांनी न्यायालयात धाव घेतली होती.
मोहर्रमच्या दिवशीही दुर्गा प्रतिमेचं विसर्जन होऊ शकते, असं म्हणत न्यायालयाने ममता यांचा आदेश रद्द केला.
दाऊद पाकिस्तानमध्येच-इकबाल कासकर

फोटो स्रोत, Getty Images
1993 बाँबस्फोटातला मुख्य आरोपी आणि कुख्यात अंडरवर्ल्ड गुंड दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानमध्येच असल्याची माहिती दाऊदचा भाऊ इकबाल कासकरने पोलिसांना दिली.
टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार इकबालने याचबरोबर चार ते पाच पत्तेही दिले आहेत. या ठिकाणी दाऊद सापडू शकतो, असं त्यानं पोलिसांना सांगितल्याचं म्हटलं आहे.
"गेल्या तीन वर्षांपासून आम्ही त्याच्या संपर्कात नाहीत. आपला फोन टॅप होऊ शकतो अशी भीती त्याला वाटते," असं इकबालनं म्हटलं.
रोहिंग्या निर्वासित नाहीत तर बेकायदा स्थलांतरित

फोटो स्रोत, Getty Images
म्यानमारचे रोहिंग्या मुस्लिम हे निर्वासित नसून बेकायदा स्थलांतरित आहेत. त्यामुळं त्यांना भारतात आश्रय दिला जाणार नाही, असं गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.
द हिंदू ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या परिसंवादात बोलतांना ते म्हणाले, "निर्वासिताचा दर्जा मिळविण्याची एक निश्चित प्रक्रिया असते. ती त्यांच्यापैकी कोणीही पूर्ण केलेली नाही. त्यांनी भारताकडे राजाश्रयही मागितलेला नाही. त्यामुळे ते बेकायदा स्थलांतरित आहेत."
नरेंद्र मोदी थापाडे- राज ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images
"पंतप्रधान मोदी हे थापाडे. निवडणुकीपूर्वी दिलेलं कुठलंही आश्वासन त्यांनी पाळलं नाही," असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हंटलं आहे.
त्यांचे फेसबुक पेजचं काल अनावरण करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. "मेक इन इंडियावर ते बोलायला तयार नाहीत. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यासाठी देशभरातून लोखंड जमा करण्यात आलं होतं. तो पुतळा कुठं आहे? प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होणार होते, ते कुठं आहेत?" असे प्रश्न त्यांनी त्यांच्या फेसबुक वर एका व्हीडिओतून विचारले.
दर महिन्याला आपण फेसबुक लाइव्ह करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकवर लाईक करू शकता.)








